पाटणच्या राजे व्यायामशाळेने सातत्याने युवकांसाठी नानाविध स्पर्धा घेऊन शरीरसंपत्तीचे महत्त्व युवा पिढीला पटवून देण्याचे कार्य साधले आहे. ‘आमदार श्री’ या शरीर सौष्ठव स्पध्रेमुळे पाटणला एक व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे समाधान, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.
पाटण येथील सचिन कुंभार यांच्या राजे व्यायाम शाळेतर्फे आयोजित ‘आमदार श्री २०१२’ या शरीरसौष्ठव स्पर्धा बक्षीस वितरण सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री तथा आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेत कोरेगाव येथील विनायक बर्गे याने ‘आमदार श्री’ होण्याचा बहुमान पटकावला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, पाटण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशचंद्र पिसाळ, मनसेचे राज्य सरचिटणीस रवींद्र शेलार यांची यावेळी उपस्थिती होती.
पहिल्या दहा यशस्वी स्पर्धकांमध्ये आमदारश्री विनायक बर्गे (कोरेगाव), सागर शिंदे (सातारा), फैय्याज शेख (कराड), रामा मैनाक (कराड), अभय सावंत (सातारा), सनी सय्यद (सातारा), सुमीत (सातारा), लवगुण ठाकूर (सातारा), प्रेमजीत ठेकळे (सातारा), महेश पवार (सातारा) तर पाटण ‘तालुका श्री’ विजेते पाटणच्या राजे व्यायामशाळेचे अमोल लोहार, तुषार गुजर, श्रीधर गायकवाड, गजानन व्यायामशाळेचे प्रकाश भिसे, विवेक जाधव, अरूण पाटील यांनी यश मिळविले.
या वेळी पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, चंदू पवार, शहा यांनी काम पाहिले. स्वागत सचिन कुंभार यांनी केले. प्रास्ताविक रविंद्र शेलार यांनी केले. या वेळी पाटणचे उपसरपंच चंद्रकांत मोरे, संजीव चव्हाण उपस्थित होते.