जागतिक मधुमेह दिनानिमित्त शनिवारी शहरातील उडान संस्थेतर्फे आयोजित रॅलीत महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, पोलीस आयुक्त संजयकुमार आदींसह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदविला. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण व तणाव अशा अनेक कारणांमुळे मधुमेहाचे प्रमाण लक्षणीय वाढते आहे. त्यास प्रतिबंध करण्यासाठी शिस्तबद्ध दिनक्रम, नियमित व्यायाम, तसेच सुयोग्य आहार आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी या वेळी आयोजित कार्यक्रमात केले.
बाल मधुमेहींसाठी कार्यरत ‘उडान’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मधुमेह दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना संजयकुमार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘उडान’तर्फे मधुमेह दिनानिमित्त शनिवारी ‘वॉक फॉर हेल्थ’ रॅलीचे आयोजन केले होते. मधुमेहाबाबत समाजात जागरुकता निर्माण व्हावी, या साठी सकाळी साडेसात वाजता जालना रस्त्यावरील सेंट फ्रान्सिस शाळेपासून ही रॅली काढण्यात आली. विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी आदींचा यात सहभाग होता.
महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती विकास जैन, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, ‘उडान’च्या डॉ. अर्चना सारडा, डॉ. संपत सारडा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून रॅलीस प्रारंभ झाला. मधुमेह उपचार व नियंत्रण, तसेच आरोग्याशी संबंधित विविध फलक या विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. महापौर ओझा यांनी मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करून याबद्दल समाजात जागरुकता निर्माण व्हावी, या साठी ‘उडान’ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
‘प्रोटेक्ट अवर फ्यूचर’ या विषयावर घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत २०० मुला-मुलींनी भाग घेतला. रंग-रेषांच्या माध्यमातून भविष्याचे रक्षण करण्यासंदर्भातील कल्पना मुलांनी साकारल्या. या चित्रांचे प्रमोद दाबके, श्याम तापसकर, नीलेश गवळी आदींनी परीक्षण केले. विजेत्या सहा मुलांना रोख पारितोषिके देण्यात आली. ‘उडान’च्या सभासद मधुमेही मुलींनी गाणीही सादर केली. जादूगार अमर यांनी जादूचे प्रयोग सादर केले. मोहसीन या १२ वर्षांपासून मधुमेह झालेल्या मुलाने अनुभवकथन केले. ‘उडान’ची प्रत्यक्ष मदत आणि मार्गदर्शनाने आपण चांगले क्रीडापटू बनू शकलो.
आता आरोग्यपूर्ण जीवन जगत असून, लहान मुलांचा बास्केटबॉल प्रशिक्षक असल्याची माहिती त्याने दिली. ‘वॉक फॉर हेल्थ’ फेरीमध्ये पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी, उद्योजक सचिन मुळे, कवडे, डॉ. भारुका, मुनीष शर्मा आदी सहभागी झाले होते.