हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शक्तिस्थळ ठरलेल्या जगदंबा भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचे केखले (ता.पन्हाळा) येथे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले. तलवारीचे विधिवत पूजन करून पालखीमधून टाळमृदंगांच्या गजरात व ‘जयभवानी जयशिवाजी’ च्या जयघोषात ती शिवभक्त के. एन. पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. सध्या भवानी तलवारीची ही प्रतिकृती शिवभक्तांसाठी जाखले (ता.पन्हाळा) येथे दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूळ भवानी तलवार सध्या लंडन येथील पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. देशात काही मोजके शिवशाहीर व ज्येष्ठ विज्ञान संशोधकांकडे तलवारीची प्रतिकृती उपलब्ध आहे.त्यामध्ये आता नववर्षांपासून या नव्या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचा समावेश झालेला आहे.
१ जानेवारी २००१ रोजी केखले ता.पन्हाळा येथील कृष्णाजी निवृत्ती उर्फ के.एन.पाटील यांनी किल्ले रायगड येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करण्याच्या उपक्रमास सुरूवात केली.प्रत्येक महिन्यातील पहिले सात दिवस समाधी पूजा करण्याच्या या प्रेरणादायी उपक्रमास नुकतीच तपपूर्ती झाली. या सोहळ्याचे औचित्य साधून नवी मुंबई येथील राजर्षी शिवबा विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक विजय खिलारे व सहकाऱ्यांनी लंडन येथील भवानी तलवारीची प्रतिकृती याच मंडळाचे सदस्य असलेल्या शस्त्रसंग्राहक कारागिराकडून बनवून घेतली. १ जानेवारीच्या पहाटे मंगलमय वातावरणात रायगडचे पुजारी म्हणून ओळखले जाणारे जयशिवराय अभियानाचे संस्थापक शिवभक्त के. एन. पाटील यांच्याकडे भवानी तलवारीची प्रतिकृती सुपूर्द करण्यात आली.जगदंबा भवानी तलवारीच्या लोकार्पण सोहळ्यास राजर्षी शिवबा विचार मंडळ व जयशिवराय अभियानाचे शेकडो शिवभक्त उपस्थित होते.