मजुरीवाढीबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास प्रजासत्ताकदिनी तोंडाला काळ्या पट्टय़ा लावून मूकमोर्चा काढण्याचा इशारा बुधवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चावेळी देण्यात आला. बेमुदत यंत्रमाग बंदच्या तिसऱ्या दिवशी कामगारांनी आज प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. दरम्यान सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.     
दरमहा १० हजार वेतन वा दररोज ४०० रुपये पगार या मुख्य मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे वस्त्रनगरीतील खडखडाट थांबला असून बाजारपेठ ठप्प झाली आहे.     
बुधवारी शाहू पुतळा येथे कामगार एकत्र झाले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गाने फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. कामगार नेते कॉ. दत्ता माने, शामराव कुलकर्णी, मिश्रीलाल जाजू, भरमा कांबळे, सचिन खोंद्रे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांचा शिरस्तेदार संजय काटकार व सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर यांना निवेदन देण्यात आले.     
कामगार प्रतिनिधींनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राज्य शासन व यंत्रमागधारकांच्या नाकर्ते भूमिकेबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. तीन दिवसांपासून शहरातील हजारो यंत्रमाग कामगार काम बंद ठेवून रस्त्यांवर उतरला असतानाही त्याकडे शासन डोळेझाक करीत आहे. याच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी थोरात चौक येथे ध्वजारोहण करून नंतर तोंडाला काळ्या पट्टय़ा लावून संपूर्ण शहरातून मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष कॉ. दत्ता माने यांनी केली.    
दरम्यान सर्व श्रमिक संगघटनेच्या वतीने आज शिवाजी पुतळा येथे रास्तारोकोचे आंदोलन केले होते. मात्र त्याऐवजी सहायक कामगार आयुक्त कामगार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे नेते अतुल दिघे, बाबा नलगे, धोंडिराम कुंभार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी भागाभागामध्ये बैठका घेऊन प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला.