सुमारे सहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवर औज बंधाऱ्यात पाणीपातळी खालावली असून सध्या बंधाऱ्यात केवळ चार दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लकआहे. त्यामुळे शहरावर जलसंकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहराला उजनी धरण ते थेट पाईपलाईन योजनेसह औज बंधारा आणि हिप्परगा तलाव अशा तीन उद्भवाद्वारे पाणीपुरवठा होतो. यापैकी औज बंधाऱ्याचा पाणीपुरवठा महत्त्वाचा आहे. मात्र या बंधाऱ्यात पाणी पातळीने तळ गाठल्याने शहरात पाणीकपातीचा कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केल्याचे सांगण्यात आले. पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी औज बंधाऱ्यास भेट देऊन तेथील खालावत गेलेल्या पाण्याच्या पातळीची पाहणी केली. उजनी  धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडेपर्यंत शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करावी लागेल, असे आयुक्त सावरीकर यांनी स्पष्ट केले.
शहराच्या पाणीपुरवठय़ाबाबत पंधरा दिवसांपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यासह पुणे विभागाचे महसूल आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. यात उजनी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचा सकारात्मक विचार झाला. त्यानुसार धरणातून पाणी सोडले गेले पाहिजे. अन्यथा शहरात पाणी प्रश्न मोठय़ा प्रमाणात भेडसावण्याची भीती व्यक्त होत आहे.