आ. निर्मला गावित या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्या वावीहर्ष गावाचा रहिवासी दाखला देऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्या, त्याच गावातील ग्रामस्थांवर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या निकृष्ट कामामुळे ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. गंभीर बाब म्हणजे, या कामाचा ठेका घेणारा ठेकेदारही तीन महिन्यांपासून गायब झाल्यामुळे ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ते काम ग्रामपंचायतीकडे सोपवावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जवळपास ७३ पाणी पुरवठा योजना वेगवेगळ्या कारणांस्तव बंद आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष या गावासाठी २०१०-११ मध्ये ही नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्याचे काम पालघर येथील ठेकेदाराला दिले गेले. ३२ लाख रूपये खर्चाच्या या योजनेवर आतापर्यंत १८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण, नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे योजना चार महिन्यांपासून बंद आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही सर्व रक्कम पाण्यात जाण्याची वेळ आल्याची तक्रार संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांनी केली. पाणी पुरवठा योजना बंद असल्याने संपूर्ण गावाला भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. महिलांना दुरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. या संदर्भात ठेकेदाराशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देतो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. आ. गावित यांनी विधानसभेची निवडणूक या गावाच्या नांवाने लढविली होती. त्याच गावाकडे आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा मधे यांचा आरोप आहे. या योजनेची चौकशी करून अपूर्ण असलेले नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायतीकडे सोपवावे, ठेकेदाराला दिलेला ठेका रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. वावीहर्षप्रमाणे तालुक्यातील जवळपास ७३ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने त्याचा कोणताही लाभ ग्रामस्थांना झालेला नाही. शुद्ध पाणी मिळत नसल्याने पावसाळ्यात आरोग्याचे प्रश्नही उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वसामान्यांशी निगडीत या प्रश्नांकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याची ग्रामस्थांची भावना आहे.