ठाणे महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत सुमारे २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी ५ मार्च रोजी स्टेम जलशुद्धीकरण केंद्र टेमघर व शहाड येथे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही प्रत्येक बुधवारी अशा प्रकारे शट-डाऊन घेतला जाणार आहे. पाटबंधारे विभागाने यापूर्वीच जाहीर केलेल्या पाणीकपातीमुळे स्टेममार्फत होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांचा बुधवार कोरडा राहणार आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांना दररोज सुमारे ५५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करावा लागतो. ठाणे महापालिका स्टेम, एमआयडीसी तसेच स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून हे पाणी या भागांना पुरवीत असते. ठाणे महापालिकेस स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून तब्बल २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो. तसेच ‘स्टेम’च्या माध्यमातून सुमारे १५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मीरा-भाइंदर, उल्हासनगर यांसारख शहरांनाही स्टेम कंपनीमार्फत पाणी पुरविले जाते. दरम्यान, बारवी नदीतून होणाऱ्या पाण्याच्या पुरवठय़ात कपात झाल्याने स्टेम कंपनीमार्फत पाणीकपात जाहीर करण्यात आली असून यामुळे ठाणे शहराला दर बुधवारी शट-डाऊन सहन करावा लागणार आहे. ठाणे शहराला स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा प्रत्येक बुधवारी बंद राहणार असून या वेळी शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामध्ये सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा येथील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्टेमचा पाणीपुरवठा बंद असला तरी ठाणे महापालिकेच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, बाळकूम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, घोडबंदर रोड व खारटन रोड परिसर, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स येथील पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. उंच भागातील इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सूरकर पाडा, जॉन्सन, इटर्निटी या भागांत पाणीपुरवठा सुरू असेल. शहरातील अन्य भागांत मात्र पाणी पूर्णपणे बंद असेल. शिवाय या शट-डाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.