डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे आवाहन
आंतरराष्ट्रीय कौटुंबिक कृषी वर्ष साजरे करीत असतांना भारतीय शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतपोषण शेत, हा उपक्रम जोमाने राबवून भूमातेचे आरोग्य जपावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी वर्धा येथे केले.
शेती तंत्रज्ञानातील अंतिम शब्द समजल्या जाणाऱ्या डॉ. स्वामिनाथन यांनी वर्धेतील रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयात आयोजित विदर्भस्तरीय शेतकरी मेळाव्यात आपले विचार मांडून शेतकऱ्यांना अंतर्मुख केले. आपण भूमाता म्हणतो, पण तसे तिला जपतो काय, असा सवाल करीत ते म्हणाले की, २०१४ हे वर्ष कौटुंबिक कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय झाला आहे. जगात सर्वाधिक शेतकरी कुटुंबे भारतात आहेत. त्यादृष्टीने कुपोषणमुक्त भारताचे आवाहन पेलतांना, प्रत्येक शेतपोषण शेत ही चळवळ राबवावी. जमिनीचे आरोग्य जोपासावे. चांगली शेतजमीन कृषीसाठीच उपयोगात आणावी. सुरक्षित सिंचनासाठी पावसाच्या पाण्याची ग्रामीण व शहरी भागात साठवण अनिवार्य करावी. सामाजिक आर्थिक विपरित स्थितीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त तंत्रज्ञान पोहोचावे. शेतीसाठी चार टक्के दराने वेळेवर व पुरेसे कर्ज उपलब्ध व्हावे. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळण्याच्या हेतूने विमा योजना सुलभ असावी. आर्थिकदृष्टय़ा सक्षम शेतीसाठी किफोयतशीर बाजारपेठ ही गुरूकिल्ली आहे. ती तशी उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांशी आहे. प्रत्येक गावात कृषी जैवविविधता असण्यासाठी साधन केंद्र स्थापन करावे. दारिद्रय़ व कुपोषण निर्मूलनासाठी त्याचा लाभ होईल.
दिवंगत रामकृष्ण बजाज यांच्यासह हंगर प्रोजेक्ट व गांधी जिल्हा योजनेत काम करण्यात आनंद झाला होता, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. वैदर्भीय कोरडवाहू शेतकऱ्यांनी सरळ वाण व झाडांची एकरी संख्या वाढवून अधिक कापूस उत्पादन घ्यावे, असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशवराय क्रांती उपस्थित शेतकऱ्यांना केले. जागतिक कापूस उत्पादनाच्या पाश्र्वभूमीवर बोलतांना ते म्हणाले की, जगातील कापूस उत्पादक देशांमध्ये हेक्टरी झाडांची संख्या १ लाख ११ हजार एवढी आहे. आपल्याकडे संकरित वाणांमुळे ती १८ हजारापर्यंतच असते. त्यामुळेच हेक्टरी कापूस उत्पादनाच्या बाबतीत भारताचा क्रमांक जगात ३३ वा आहे. हे बदलण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी बीज स्वावलंबनाचा मंत्र ठेवावा. सरळ वाणाची पध्दत स्वीकारावी. असिंचित हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी तेच उपयुक्त ठरेल, असा सल्ला डॉ. क्रांती यांनी दिला.
आयोजक शिक्षा मंडळाचे सचिव संजय भार्गव यांनी संस्थेद्वारा संचालित लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. सघन लागवड पध्दतीने कापसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचीा यावेळी डॉ.स्वामिनाथन यांनी सत्कार केला. प्रा.अतुल शर्मा यांनी उपक्रमाची माहिती दिली.
कृषी क्षेत्रात कार्यरत पी.साईनाथ, विजय जावंधिया, डॉ. तारक काटे, डॉ. प्रभून दास, डॉ.अजय परिंदा हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.