राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यासाठी मजबूत पर्याय देण्यासाठी भाजप-सेना युती सज्ज झाली आहे. सरकारच्या विरोधातील सामान्य जनतेतील असंतोष केवळ नकारात्मक मते मिळविणार नाही, तर उत्तम पर्याय देण्यासाठी विकासाचे मॉडेल सादर करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक तथा मेळावा सोमवारी येथे हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे गावडे मंगल कार्यालयात आयोजिला होता. त्यासाठी आमदार फडणवीस हे सोलापुरात आले असता सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकारच्या विरोधाचा लाभ घेण्याची व नकारात्मक मते मिळविण्याची भूमिका नाही, तर जनतेसमोर विकासाचा कार्यक्रम घेऊन जाणार असल्याचा मुद्दा त्यांना आवर्जून स्पष्ट केला.
भाजपने टोलसंस्कृती निर्माण केली आहे हे खरे आहे. टोलसंस्कृतीला आमचा विरोध असण्याचा प्रश्नच नाही. परंतु टोलसंस्कृतीऐवजी राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलधाड सुरू केली आहे. या टोलधाडीला आमचा विरोध आहे. टोलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे अड्डे चालविल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटींचा खर्च झाल्याचे वक्तव्य गोपीनाथ मुंडे यांनी केले असता त्यावर निवडणूक आयोगाने धाडलेल्या नोटिशीला उत्तर पाठविल्याचे नमूद करताना आमदार फडणवीस म्हणाले, मुळात मुंडे यांच्या मूळ भाषणात निवडणूक पुनर्रचनेचा मुख्य मुद्दा होता. त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले म्हणजे वादाचा मुद्दा लक्षात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर येत्या वर्षभरात भाजप-सेना-रिपाइं महायुती सरकारच्या विरोधात मजबूतपणे टक्कर देण्यासाठी रस्त्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या मेळाव्यात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह देवेंद्र फडणवीस तसेच माजी खासदार सुभाष देशमुख, आमदार बाळासाहेब भेगडे, संभाजी पाटील-निलंगेकर, शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.