चार राज्यातील विधानसभा निवडणुका आटोपल्यावर आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काही जाहीर केले जात नाही. गडकरींचा वारसदार अजूनही समोर आला नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमके आहे तरी कुणाचे नाव, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
चार राज्यातील निवडणुकीनंतर नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचे नाव घोषित केले जाणार असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते, मात्र डिसेंबर महिना संपून जानेवारीचा अर्धा महिना संपला आहे. सदस्य नोंदणीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे त्याआधी नाव घोषित केले जाण्याची शक्यता होती, मात्र त्याबाबत पक्षामध्ये मौन पाळले जात आहे. महापौर अनिल सोले यांच्या नावाची शहरात बरीच चर्चा झाली, मात्र गेल्या काही दिवसात त्यांचे नाव मागे पडल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या महापौर परिषदेत त्यांची मेयर कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत महापौर म्हणून राहणार असल्यामुळे तूर्तास त्यांच्या नावाची चर्चा केली जात नाही. विलास डांगरे यांचे नाव समोर करण्यात आले असले तरी पक्षाची ती वेगळ्या प्रकारची खेळी आहे. काँग्रेसकडून प्राचार्य बबनराव तायवाडे आणि बहुजन समाज पक्षातर्फे माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे बहुजन उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार सुरू असून त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी संजय भेंडे यांच्या नावाची चर्चा होती, परंतु पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेंडे नको आहेत. आगामी लोकसभा निवडणुका बघता गडकरी यांचा बहुजन उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. नेमका तो कोण आहे हे मात्र अजून बाहेर आले नाही. गेल्या काही दिवसात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महापौर अनिल सोले यांच्यासह संजय भेंडे, संदीप जोशी, गिरीश व्यास, विलास डांगरे यांची नावे चर्चेत होती, मात्र यापैकी तूर्तास कोणी नाही, असे पक्षामधून बोलले जात असले तरी काहींनी पक्षाने आदेश दिला तर लढणार असल्याचे सांगितले. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गडकरी यांना उमेदावारांबाबत विचारणा करत असतात, मात्र काही दिवस वाट पहा असे सांगून कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे.  
नितीन गडकरी यांच्या सलग चारवेळा निवडून येण्यामुळे सर्वपरिचित झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची येती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जो कोणी उमेदवार देण्यात येणार आहे तो सक्षम असावा, असे यापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व इतर ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात असून केवळ उमेदवाराचे नाव घोषित होण्याची कार्यकर्ते वाट पहात आहेत. पदवीधर मतदारसंघासाठीचा उमेदवार हा नितीन गडकरी यांच्या पसंतीचाच राहील हे स्पष्ट असले तरी बहुजन आहे की दुसरा कोणी, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही धुक्याआड आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उत्तराधिकारी ते ‘विचारपूर्वक’ निवडणार असून त्यांची घोषणा लवकरच दिल्लीवरून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.