वर्षभरापूर्वी त्या महिलेच्या सर्वात मोठय़ा मुलाचा खून झाला. खून करणारे लोक कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत आणि या आरोपींना कडक शिक्षा होईल, अशी ती महिला गेले वर्षभर आशा लावून बसली होती. मात्र गुरुवारी या आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्याने या मातेच्या पदरी निराशा आली. त्यामुळे तिने भरदिवसा न्यायमंदिराच्या परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगला नरडे नावाच्या या महिलेवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हुडकेश्वर भागात राहणाऱ्या मंगला चंद्रकात नरडे यांना तीन मुले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा मुलगा रंजन चंद्रशेखर नरडे हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याने एक नवीन चार चाकी गाडी विकत घेतली होती व तो काही दिवस कळमना बाजारात काम करीत होता. दोघे लहान भाऊ कमवते नसल्यामुळे रंजनवर घराची जबाबदारी होती.
सोनू ठाकरे आणि पंकज नागपुरे हे रंजनचे दोघे मित्र होते. वर्षभरापूर्वी कुठल्या तरी कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे गजानन चौकातील शाहू मोहल्यात रात्रीच्यावेळी या दोघांनी रंजनचा दगडाने ठेचून खून केला. यानंतर हे दोघेही काही दिवस फरार झाले.
मुलाच्या खुनानंतर रंजनच्या आईची प्रकृती बिघडली. मोठा मुलगा गेल्याचे दुख ती सहन करू शकली नाही. दरम्यानच्या काळात कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले. या दोघांची पोलीस कोठडी घेण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली, मात्र निकाल लवकर लागला नाही. दरवेळी खटल्याच्या तारखेला रंजनची आई न्यायालयात जात होती आणि निराश होऊन परत येत होती. बुधवारी या प्रकरणाची शेवटची सुनावणी होती. मुलाच्या खुन्यांना आज ना उद्या शिक्षा होईल अशी आस मंगला नरडे गेल्या वर्षभरापासून लावून बसल्या होत्या. दरम्यानच्या काळात, माझ्या मुलाच्या खुनातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी विनंती त्यांनी अनेकदा पोलिसांना आणि वकिलांना केली होती.
आज जिल्हा सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश चांडक यांनी या खटल्याचा निकाल सुनावताना आरोपी सोनू ठाकरे आणि पंकज नागपुरे यांची निर्दोष सुटका केली. सोनू आणि पंकजच्या चेहऱ्यावर सुटल्याचे हास्य असले तरी त्या अभागी आईच्या नशिबी मात्र दुख होते. आपल्या मुलाच्या खून प्रकरणात न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी न्यायालयात परिसरातच उच्च रक्तदाबाच्या खूपशा गोळ्या घेतल्या व त्यामुळे त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या. बेशुद्धावस्थेतच त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
न्यायालय परिसरात शोकाकुल मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
वर्षभरापूर्वी त्या महिलेच्या सर्वात मोठय़ा मुलाचा खून झाला. खून करणारे लोक कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत आणि या आरोपींना कडक शिक्षा होईल,

First published on: 27-09-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women attemts suside in court area