दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून दारूडय़ा पतीने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर मारून खून केला. पिंपरीतील संजय गांधी वसाहतीमध्ये बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
नंदाबाई भाऊ जोगदंड (वय ४२, रा. संजय गांधीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती भाऊ शामराव जोगदंड (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीचा भाऊ अप्पा भाऊ जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी वसाहतीमध्ये एका पत्र्याच्या खोलीत जोगदंड दाम्पत्य राहत होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. त्यांच्या शेजारी जोगदंडचे नातेवाईक व भाऊ राहतो. जोगदंड हा सुतारकाम करतो.
मात्र, गेल्या चार महिन्यांपासून काम न मिळाल्यामुळे तो इकडे-तिकडे फिरत होता. त्याला दारूचे व्यसन असून कामधंदा नसल्यामुळे दारू पिण्यासाठी तो पत्नीकडे पैसे मागत असे. त्यावरून त्यांच्यात भांडणे होत असत.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून जोगदंड याने बुधवारी पहाटे नंदा यांच्या डोक्यावर सिलिंडर मारला. त्या वेळी घरात एक मुलगा व मुलगी झोपलले होते.
एकदम मोठा आवाज झाल्याने मुलगा जागा झाला. त्याने वडिलांना अडविण्याचा प्रयत्न करून आरडा-ओरडा केला. शेजारच्या खोलीत राहणारा जोगदंडचा भाऊ व नातेवाईक धावत आले. त्या वेळी नंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. सावंत हे अधिक तपास करत
आहेत.