मराठवाडय़ातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा जागतिक जलदिनानिमित्त औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी व्याख्याने व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. मात्र, तीव्र दुष्काळी समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद व जालना या दोन्ही शहरांत जलदिनाचे कार्यक्रम झाले नाहीत. फुटकळ स्वरुपात काही संघटनांनी ‘पत्रकबाजी’ केली. मात्र, प्रबोधनाच्या पातळीवर या जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळच होता. दरम्यान, दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडय़ातील धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद शहर वगळता इतर सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गंभीर होईल. विशेषत: ३० जुलैनंतर स्थिती अधिक बिकट असेल. कारण जायकवाडीसह मराठवाडय़ातील इतर सर्व धरणांच्या पाणलोटात ऑगस्टमध्येच नवीन पाणी येते.
औरंगाबाद शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ३१ जुलै व त्यानंतरही होऊ शकेल, असे सांगितले जाते. सध्या जायकवाडी धरणात १.५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. तो पुढील २१ दिवस पुरेल. त्यानंतर मात्र मृतसाठय़ातून पाणी उचलावे लागेल. एप्रिलनंतर पुढचे ११२ दिवस १६८ दलघमी पाणी रोज वापरता येऊ शकेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण होईल. मात्र, मृतसाठय़ातून पाणी पाणीपुरवठा योजनेपर्यंत आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना महापालिकेने तातडीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी परराज्यातून येणारी यंत्रे अजून मिळाली नाहीत. यंत्रे वेळेवर बसविली तर पाणीपुरवठा सुरळीत राहू शकेल. उर्वरित मराठवाडय़ात मात्र पाणीटंचाईचे स्वरूप अधिक गंभीर होईल.
मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांमध्ये ७५ मध्यम, तर ७९२ लघु प्रकल्प आहेत. मोठय़ा प्रकल्पांमध्ये अवघा ८ टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये ११ टक्के पाणीसाठा आहे. एकूण सरासरी १० टक्के पाणीसाठय़ावर सुमारे ११२ दिवस पुरवठा करावयाचा असल्याने जलसंपदा व प्रशासकीय यंत्रणा अधिक सजग झाल्या आहेत. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, निम्नदुधना हे प्रकल्प कोरडेठाक असून यवतमाळ जिल्ह्य़ातील उध्र्व पैनगंगामधील पाणीसाठा वापरता येऊ शकेल काय, याचीही चाचपणी केली जात आहे. गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील आठपैकी ७ बंधारे कोरडे पडले आहेत. परभणीतील दिग्रस व मुदगल या दोन उच्चपातळी बंधाऱ्यांमध्ये पाणी आहे. आपेगाव व हिरडपुरी येथेही काहीअंशी पाणी आहे. अन्य ठिकाणचे उच्च पातळी बंधारेही कोरडेच आहेत. एका अर्थाने नदी कोरडी असल्याने या वर्षी पाऊस पडल्यानंतरही पाणीटंचाई लगेच दूर होईल, असे चित्र नाही. जलदिनानिमित्त पाण्याचे वास्तव शहरांमध्ये चर्चेत असले तरी दुष्काळी पट्टय़ात मात्र जलदिनही ‘कोरडा’च होता.