ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांचे लेखन विविधांगी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार व समीक्षक प्रभाकर कोलते यांनी नुकतेच मुंबईत केले.  मतकरी यांची शंभर पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल प्रकाशकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते. या वेळी मतकरी यांच्या ‘रंगरूप-रंगभूमी चिकित्सा’ या पुस्तकाचे तसेच मतकरी यांची कन्या सुप्रिया विनोद यांनी लिहिलेल्या ‘अधोरेखित’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात कोलते बोलत होते.  मतकरी यांची पुस्तके ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत, त्यापैकी रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन), अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन), शरद मराठे (नवचैतन्य प्रकाशन), सुनील मेहता (मेहता पब्लिशिंग हाऊस) आदी प्रकाशक उपस्थित होते. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.  या वेळी बोलताना मतकरी यांनी विविध प्रकाशकांसमवेतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला तर रामदास भटकळ यांनी या वेळी सांगितले की, मतकरी यांच्या सारखा लेखक आम्हाला लाभला याचा प्रकाशक म्हणून मला अभिमान वाटतो. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांना सुप्रिया विनोद यांच्या ‘अधोरेखित’या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.