‘‘काचचित्रांकडे पाहून माझ्या लक्षात आले की सपाट भागात केवळ रंगांनी ‘मागे आणि पुढे’ असा परिणाम कसा साधला जातो! मग मीही हिरवी झाडे मागे आणि लाल रंगाची घरे, लाल कपडे घातलेली माणसे पुढे अशा रीतीने माझे रंग वापरू लागलो’’ किंवा ‘‘समुद्रच कशाला, नदी, तळे.. कुठेही जिथे पाणी आहे, तिथे भरपूर व्यवहार सुरू असतात.. लोकजीवन फुलत असते’’ भारतीय लघुचित्रशैलीचा संस्कार न सोडता स्वत:ची वाट चोखाळण्याच्या अब्दुल अझीझ रायबा यांच्या गप्पा स्वतबद्दल असत आणि चित्रांबद्दलही. कुणाशीही बोलताना रंगून जाणारे हे चित्रकार रायबा, गेल्या दोन वर्षांपासून कुणालाही भेटेनासे झाले. वृद्धापकाळात आजारपणाची भर पडली, पत्नीच्या निधनामुळे जणू जीवनेच्छाच गेली. मग शनिवारी बातमी आली : रायबा शुक्रवारीच वारले.

मुंबई सेंट्रलच्या टेमकर स्ट्रीटवर कोकणी मुस्लीम कुटुंबात गेलेले बालपण, आधी दंडवतीमठ-बडिगर यांचे ‘नूतन कला मंदिर’ आणि पुढे (१९४२ ते १९४६) ज. जी. कला महाविद्यालयात घेतलेले कलाशिक्षण, वयाच्या पंचविशीत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ची लाभलेली संगत आणि या चित्रकारसमूहात समावेश होण्याआधी तो समूहच पांगलेला पाहावा लागणे, याच प्रोग्रेसिव्हांना पाठिंबा देणारे रूडी व्हॉन लायडन आणि वॉल्टर लँगहॅमर यांनी पुढेही काही काळ दिलेली साथ आणि त्यातूनच, काश्मीरमध्ये चित्रकलेसाठीच झालेलं दीर्घ वास्तव्य.. हा सारा रायबा यांच्या जडणघडणीचा पट. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमध्ये सुवर्णपदक मिळणे, हे त्या काळात अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाई. रायबा यांना रौप्यपदके दोनदा (१९४७, १९५१) मिळाली, पण सुवर्णपदकाने गुंगारा दिला, तो काश्मीरहून परत येईपर्यंत. सन १९५६ मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले. रायबा मुंबईतच स्थिरावले, कुटुंबवत्सलपणा आणि कलंदरपणा यांची सांगड घालू लागले. या दोन्ही वाटांवरल्या प्रवासात, टेमकर स्ट्रीटवरली इमारत डळमळीत होऊन पडल्यावर रायबा कुटुंबीय नालासोपाऱ्याला गेले आणि रायबा केवळ प्रदर्शनांपुरतेच मुंबईत दिसू लागले.

तागाच्या (तरटासारख्या जाड) कापडाला फेव्हिकॉल पातळ करून, त्यात टेक्श्चरव्हाइट पावडर मिसळून या मिश्रणाचे थर लावल्यास तागाचा शोषकपणा थोडा बुजतो, मग त्यावर तैलरंगांतही चित्रे करता येतात, हे तंत्र रायबांनी शोधले. एक सुकल्यावर दुसरा, असे १५-१६ थर लावून रायबांनी ‘तागाचा कॅनव्हास’ हे दृश्यवैशिष्टय़ सांभाळले. काश्मीर, पोर्तुगीज वसाहती, वसई, मुंबईचे कोळीवाडे अशा जनजीवनांतील स्वप्नवत् सृष्टी टिपणारे रायबा तंत्राचा सतत विचार करीत. १९८०च्या दशकात ते मुद्राचित्रण शिकले, त्यानंतर त्यांनी केलेली मुद्राचित्रे आजही नावाजली जातात. सुघटित आकार, लयदार रेषा, विचारपूर्वक केलेली मोजकी रंगयोजना आणि या साऱ्याला सामावणारा तागाचा कॅनव्हास आता मुके झाले आहेत.