News Flash

डॉ. विजय देव

काही वर्षांपासून सह्य़ाद्री आणि छत्रपती शिवराय हे त्यांचे अभ्यासाचे आणि कुतूहलाचे विषय बनले होते.

डॉ. विजय देव

लौकिक अर्थाने ते एक शिक्षक, राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक. पण या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करता करता ते समाजाच्या विविध अंतरंगात कधी शिरले आणि त्यातून त्यांनी विविध कार्याचे बंध कधी विणले हे त्यांनाही ठाऊक नसेल. शिक्षक, लेखक, व्याख्याते, साहित्य अभिवाचनाची संस्कृती रुजवणारे कलाकार, योगविद्येचे पुरस्कर्ते, संवेदनशील मन असलेले निसर्गभटके आणि उत्तम समाज संघटक अशी चतुरस्र ओळख असलेल्या डॉ. विजय प्रल्हाद देव यांचे काल निधन झाले. त्यांचे निधन हे त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांपासून ते त्यांनी जोडलेल्या सर्वदूर समाजापर्यंत साऱ्यांना चटका लावून गेले, ते त्यांच्या या बहुविध गुणवैशिष्टय़ांमुळे.

राज्यशास्त्र विषयात डॉ. देव यांचे नाव आदराने घेतले जाते. विद्यार्थी आणि समाजाभिमुख शिक्षणाच्या त्यांच्या हातोटीतून तयार झालेले शेकडो विद्यार्थी आज भारतीय प्रशासकीय सेवांमधील उच्च पदांपासून ते राजकीय पटलावरील चारित्र्यसंपन्न नेतृत्वापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. राज्यशास्त्राचा शोध घेतानाच त्यांनी लिहिलेले सुबोध राज्यशास्त्र, पाश्चात्त्य राजकीय विचारवंत, राजकीय विश्लेषण कोश, राजकीय संकल्पना व सिद्धान्त, आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे ग्रंथ आज या विषयात मैलाचे दगड ठरले आहेत. त्यांनी लिहिलेला ‘राज्यजिज्ञासा’ हा संशोधनात्मक ग्रंथ तर आजच्या राजकीय इतिहासापासून ते वर्तमानातील वाटचालीपर्यंत असा विस्तृत पटाचा वेध घेतो. त्यांनी नुकताच लिहिलेला ‘कौटिल्याच्या यथार्थ तुलनेत मॅकिएव्हेली’ हा ग्रंथ दोन थोर राजकीय विचारवंतांच्या विचारांमधील साम्य आणि फरकावरील चर्चा घडवतो.

गेल्या काही वर्षांपासून सह्य़ाद्री आणि छत्रपती शिवराय हे त्यांचे अभ्यासाचे आणि कुतूहलाचे विषय बनले होते. त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी रुजवलेल्या दुर्गभ्रमण चळवळीला अधिक व्यापक रूप देण्यासाठी डॉ. देव यांच्या पुढाकारातून गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना झाली. आमच्याकडे वाचन संस्कृती मोठय़ा प्रमाणात रुजलेली आहे. पण हे कसदार साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी डॉ. देव यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची नवसंस्कृती या मातीत रुजवली. देव हे हाडाचे योगविद्येचे विद्यार्थी. या कलेच्या प्रसारासाठीही त्यांनी मोठे काम केले. विविध सामाजिक संस्था आणि कार्याचे ते आधारस्तंभ होते. सतत नावीन्याचा शोध घेण्याची, त्यातून माणसे जोडण्याची अंगी वृत्ती. त्यांचा कामाचा हा झपाटा एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:22 am

Web Title: dr vijay prahlad dev profile
Next Stories
1 राजेंद्रकुमार जोशी
2 कनिष्क कटारिया
3 ग्रॅहॅम रीड
Just Now!
X