12 December 2017

News Flash

डॉ. विशाल गज्जर

वेगळ्या वाटेने जाणारा हा गुजराती तरुण हॉकिंग व मिलनर यांच्या प्रकल्पात काम करीत आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 16, 2017 2:40 AM

डॉ. विशाल गज्जर

जगातील एक अब्जाधीश युरी मिलनर व ख्यातनाम वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी हाती घेतलेल्या परग्रहावरील संभाव्य जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या ब्रेकथ्रू लिसन प्रकल्पात खरे तर लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत आहेत. या प्रकल्पात अलीकडेच तीन अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू दीर्घिकेत झालेल्या १५ रेडिओ स्फोटांचे संदेश टिपण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या संशोधनात  गुजरातचे वैज्ञानिक विशाल गज्जर यांचा मोठा वाटा आहे. वेगळ्या वाटेने जाणारा हा गुजराती तरुण हॉकिंग व मिलनर यांच्या प्रकल्पात काम करीत आहे.

विसाव्या शतकात आपण अवकाश मोहिमांवर भर दिला. आता एकविसाव्या शतकात परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे खुले पत्र मिलनर व हॉकिंग यांनी प्रसिद्धीस दिले होते. अलीकडच्या काळात पृथ्वीसारख्या अनेक बाह्य़ग्रहांचा शोध लागत असताना परग्रहावरील जीवसृष्टी मग ती कोणत्याही अवस्थेत असली तरी किमान असू तरी शकते, असा दावा केला जात आहे. परग्रहवासीयांनी साद घातली असेल तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी २०१६ मध्ये ब्रेकथ्रू लिसन हा प्रकल्प सुरू करण्यात आला.  परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्याच्या आतापर्यंतच्या प्रकल्पांपेक्षा सर्वात वेगवान व संवेदनशील असा हा प्रकल्प मानला जातो. ३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकेतील १५ रेडिओ स्फोटांचे संदेश हे गूढ आहेत. त्याचे विश्लेषण गुजरातचे विशाल गज्जर यांनी केले आहे. गुजरातमधील बोटाड या लहानशा गावात जन्मलेल्या विशालने या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात मोठी कामगिरी केली आहे. भावनगर येथे शांतीलाल शहा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विशालला नेहमीच विश्वाच्या गूढ गोष्टी साद घालत होत्या. त्याचा मागोवा घेताना त्याने पुणे येथे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेतून पीएचडी केली. पल्सार म्हणजे स्पंदक ताऱ्यांबाबत त्याचा शोधनिबंध होता. त्यानंतर त्याने चीनमधील शिनजियांग खगोलशास्त्र वेधशाळेतून आणखी प्रगत संशोधन केले. त्याच वेळी कॅलिफोर्निया विद्यापीठातील परग्रह जीवसृष्टी संशोधनाबाबतच्या ‘सेटी’ प्रकल्पाबाबत त्याला समजले. त्या प्रकल्पात तो सहभागी झाला, नंतर हॉकिंग यांच्या ब्रेकथ्रू लिसन कार्यक्रमात कामाची संधी मिळाली व आता त्याने रेडिओ लहरी स्फोटांबाबत जे संशोधन केले आहे ते विज्ञानाची क्षितिजे विस्तारणारे आहे. ग्रीन बँक टेलिस्कोप (अमेरिका) व पार्कस टेलिस्कोप (ऑस्ट्रेलिया) या दोन दुर्बिणींच्या मदतीने पृथ्वीला जवळच्या शंभर दीर्घिकातील अब्जावधी ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांवर नजर ठेवली जात आहे, त्यातूनच हे गूढ संदेश मिळाल्याने आशेचे किरण दिसू लागले. आताचे हे रेडिओ संदेश परग्रहावरील जीवसृष्टीचे संकेत देतात, असे विशालनेही ठामपणे म्हटलेले नाही, पण प्रत्येक प्रयत्नातून आपण निसर्गाचे नियम समजून घेण्यात यशस्वी होत असतो, असा त्याचा आशावादी दृष्टिकोन आहे. अज्ञाताच्या प्रांतातील गूढ उकलण्यासाठी प्रत्येक वेळी हवे ते निष्कर्ष हाती लागतील याची शाश्वती नसतानाही सातत्याने संशोधनात गढून जावे लागते. हा दीघरेद्योग विशाल अगदी मनापासून करीत आहे. अशा छोटय़ा टप्प्यांमधूनच जर एक दिवस परग्रहावरील जीवसृष्टी, मग ती कुठल्याही अवस्थेतील असो, सापडल्याचा युरेका क्षण कधी तरी हाती लागेल या आशेवर हा सगळा खटाटोप निरंतर सुरू आहे.

First Published on September 16, 2017 2:40 am

Web Title: dr vishal gujjar profile
टॅग Dr Vishal Gujjar