उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, हा समज राजकीय उद्दिष्टांसाठी रुजू देण्याचे दिवस आले नव्हते, त्या काळात अनेक मुस्लिमेतर, विशेषत: हिंदू व शीख साहित्यिकांनी उर्दू भाषेच्या संवर्धनात मोलाचे योगदान दिले. मुन्शी प्रेमचंद, कृष्ण चंदर, राजिंदरसिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क, फिराक गोरखपुरी (रघुपती सहाय) आणि कवींमध्ये रामप्रसाद बिस्मिल, गुलझार, कमर जलालाबादी (ओमप्रकाश भंडारी) आणि पंडित ब्रिजनारायण चकबस्त अशी काही नावे वानगीदाखल सांगता येतील. याच मालिकेतले एक नाव पंडित आनंद मोहन झुत्शी ऊर्फ ‘गुलजार’ देहलवी यांचे! करोनावर मात करून घरी परतल्यानंतर, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे देहावसान झाले. पुढच्या महिन्यात ते ९५ वर्षांचे झाले असते.

उर्दू शेर व शायरीसाठी प्रसिद्ध असलेले गुलजार देहलवी यांचा जन्म जुन्या दिल्लीतील ‘गली कश्मिरियाँ’ या काश्मिरी पंडितांच्या वस्तीतला. वडील पंडित त्रिभुवन नाथ झुत्शी ‘झार’ देहलवी आणि आई ब्रिज रानी झुत्शी ‘बेज़ार’ देहलवी हे दोघेही उर्दू कवी होते. आनंद मोहन यांनी विविध भाव प्रदर्शित करणारी शायरी लिहिली, पण ते नावारूपाला आले ते ‘इन्कलाबी शायर’ म्हणून. स्वातंत्र्यसैनिकांत त्यांच्या क्रांतिकारी कविता लोकप्रिय झाल्या. त्या म्हणण्यासाठी त्यांना दिल्लीतील राजकीय सभांसह अनेक मुशायऱ्यांमध्ये आमंत्रण असायचे आणि बुलंद आवाजाचे हे शायर, श्रोत्यांच्या फर्माइशी पूर्ण करीत. देहलवी यांच्या दृष्टीने उर्दू केवळ संवादाची भाषा नव्हती; तर, न्याय, ऐक्य व एकमेकांप्रति आदर यावर आधारित समाजाची कल्पना करणारी ती संस्कृती होती. स्वातंत्र्यानंतर प्रामुख्याने मुस्लिमांपुरती मर्यादित राहिलेली उर्दू ‘परकी’ आणि म्हणून संशयाचा विषय बनली. या भाषाविभाजनाचे दु:ख झाल्यामुळे देहलवी यांनी ‘सारे जहाँ से अच्छा..’ या गीताचे विडंबन- ‘सारे जहाँ में रुसवा हिंदोस्ताँ हमारा’ लिहिले होते. ‘मी ब्रिटिशांशी लढलो. त्यानंतर मी धार्मिक ऐक्यासाठी आणि उर्दूच्या संवर्धनासाठी लढतोय’, असे ते म्हणत.

देशातील पहिल्या उर्दू विज्ञान नियतकालिकाचे संपादन करण्याचा मान त्यांना मिळाला, पण तीही वाटचाल सहजी झाली नाही. यासाठी नेहरू व मौलाना आझाद यांची परवानगी १९५७-५८ सालीच मिळूनही, उर्दरूविरोधी नोकरशाहीने अडथळे आणले. अखेर ‘सायन्स की दुनिया’ हे मसिक १९७६ साली प्रकाशित झाले. देशभर आणि विदेशातही उर्दू शाळा सुरू करण्यामागे आनंद यांचे प्रयत्न होते. त्यांना उर्दू शायरी व साहित्यातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता, तसेच २००९ सालच्या ‘मीर तकी मीर’ पुरस्काराचेही ते मानकरी होते.