‘श्री शिक्षायतन विद्यालय’ या कोलकात्याच्या हिंदी-माध्यम शाळेतून त्या शिकल्या आणि शालान्त परीक्षेत (तेव्हाची अकरावी मॅट्रिक) पश्चिम बंगाल राज्य परीक्षा मंडळात पहिल्या दहा क्रमांकांत आल्या, त्यानंतर त्यांचे वडील आप्तेष्टांना सांगत- ‘आमची ईशर मुलींमध्ये तिसरी आलीय’.. तेव्हा ईशर म्हणे, ‘नाही, बोर्डात आठवी’.

कोणत्याही क्षेत्रात काहीएक कामगिरी करण्यासाठी कुणाही व्यक्तीला बुद्धिमत्ता आणि तिचा वापर करणारे स्वकर्तृत्वच उपयोगी पडते, ते ‘मुलींपैकी क्रमांक’ न मोजू देणाऱ्या ईशर यांनीही, पुढे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात केले. त्यामुळेच त्या भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषदेच्या (इंडियन कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स किंवा ‘इक्रिअर’च्या) अध्यक्ष म्हणूनही उत्तम कामगिरी बजावू शकल्या आणि त्याआधी ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’त धोरण-विश्लेषकपदापासून सुरुवात करून, पुढे केंद्र सरकारच्या नागरी पुनरुत्थान विषयक गटात कामगिरी बजावू शकल्या.

ईशर अहलुवालिया  मेंदूतील कर्करोगाशी दहा महिन्यांची झुंज देऊन शनिवारी (२६ सप्टेंबर) त्या निवर्तल्या, तेव्हा अर्थशास्त्राचे क्षेत्र हळहळले. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात आणि पुढे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये (तेही अमर्त्य सेन, सुखमय चक्रवर्ती, जगदीश भगवती अशी मंडळी तिथे शिकवत असताना) त्या शिकल्या आणि विद्यार्थ्यांना मिळणारे कर्ज घेऊन अमेरिकेतील ‘एमआयटी’त (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) संशोधन करून पीएच.डी. झाल्या. येथून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली. ‘एमआयटी अर्थशास्त्र विभागातील पहिल्या महिला पीएच.डी.’ ही ओळख मात्र, ‘मुलींमध्ये तिसऱ्या’प्रमाणेच त्यांनी कधी वागवली नाही.

त्या स्वत: कर्तृत्ववान होत्याच; पण भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वाढदर चढा असताना पती माँतेकसिंग देशाच्या अर्थसचिवपदी होते, तेव्हाही जोडीदाराच्या कर्तृत्वप्रकाशामुळे आपण उजळू नये, याची विशेष काळजी त्या घेत. ‘मी काय करायचे, कसे राहायचे, मुलांनी कसे वाढायचे.. हे त्याला मिळालेल्या संधीमुळे ठरू नये, याची काळजी मी घेतली. आम्हाला आमची आयुष्ये आहेत, एवढे लक्षात ठेवले’ अशी स्पष्टोक्ती त्यांनी ‘ब्रेकिंग थ्रू’ या अवघ्या महिन्याभरापूर्वी प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रपर पुस्तकात याविषयी केली आहे. ईशर यांच्या निधनाने शहरांच्या सर्वागीण विकासाचे भान असलेल्या, शहरविकास आणि विकेंद्रित निर्णयप्रक्रिया यांचा संबंध हिरिरीने मांडणाऱ्या महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञास आपण मुकलो आहोत.