तमिळनाडूच्या उत्तरेकडे असलेल्या तांदराई खेडय़ात एका शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म. बैलगाडीतून शाळेत जात असतानापासून त्यांची गणिताशी गट्टी जमली. गणितीय व भौमितिक कोडी सोडवताना, वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच ते युक्लिडच्या भूमितीने आकर्षित झाले. त्यांचे नाव मुदुमबइ शेशाचुलू नरसिंहन. गणितात मूलभूत अशी कामगिरी त्यांनी पुढे जाऊन केली. या गणिताच्या विविधांगांना स्पर्श करणाऱ्या गणितज्ञाचे नुकतेच निधन झाले. नरसिंहन यांनी बीजगणितीय भूमिती, डिफरन्शियल जॉमेट्री (भूमिती), प्रातिनिधिकता सिद्धांत या गणिताच्या प्रांतात लीलया प्रवास केला. त्याचबरोबर ‘डिफरन्शियल इक्वेशन्स’ या प्रकारातही त्यांनी बरेच काम केले होते. फादर रॅसिन, के . चंद्रशेखरन, एल. श्वार्ट्झ यांनी आपल्या गणितातील कामगिरीस आकार दिला असे ते त्यांच्या आठवणींमध्ये म्हणतात. यापैकी रॅसिन हे चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयात अध्यापक होते, त्यांनी नरसिंहन यांना उच्चशिक्षणासाठी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत शिकायला जा असा सल्ला दिला. त्या वेळी के. चंद्रशेखरन यांनी नुकतीच गणित शाखा सुरू केली होती. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून १९५३ मध्ये पीएच.डी. केल्यानंतर, सहाध्यायी सी. एस. शेषाद्री यांच्यासह त्यांनी आधुनिक गणिताच्या दोन वेगवेगळ्या शाखांचा संबंध जोडून नरसिंहन- शेषाद्री सिद्धांत मांडला. हार्डर या जर्मन गणितज्ञासह त्यांनी विविध आकृतिबंधातील हार्डर- नरसिंहन हा सिद्धांत मांडला. नंतरच्या काळात शेषाद्री हे चेन्नई मॅथॅमेटिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेत काम करीत होते. त्या वेळीही नरसिंहन व शेषाद्री यांची मैत्री व संशोधन कायम होते. बीजगणितीय भूमिती व गुंतागुंतीच्या भौमितिक विश्लेषणात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले. गॉजचा सिद्धांत किंवा डिरॅकचा सिद्धांत हे सर्वाना परिचित आहेत, पण त्यामागची भौमितिक पार्श्वभूमी नरसिंहन सरांनी सांगितली तेव्हा आपण अवाक् झालो, असे त्यांचे विद्यार्थी रामदास सांगतात. एस. रमणन, एम. एस. रघुनाथन, व्ही. के. पातोडी, आर. पार्थसारथी यांच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. गणिताचे अध्ययन करताना आधीच अवघड गणिते सोडवण्यापेक्षा संशोधन प्रश्नांवर लक्ष द्या, साधी सोपी उदाहरणे सुरुवातीला पाहा, असे नरसिंहन सांगत. इटलीत ट्रियस्टेच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरेटिकल फिजिक्स या संस्थेत ते गणिताचे प्रमुख होते. काही काळ ते फ्रान्समध्ये होते. नंतर ते बेंगळूरुला आले. तमिळ साहित्यावर व एकूणच कलेवर त्यांचे प्रेम होते. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७५), पद्मभूषण (१९९०) यांखेरीज किंग फैज्मल आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि रॉयल सोसायटीचे ते फेलो होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2021 रोजी प्रकाशित
एम. एस. नरसिंहन
बीजगणितीय भूमिती व गुंतागुंतीच्या भौमितिक विश्लेषणात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-06-2021 at 01:20 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathematician m s narasimhan profile zws