05 April 2020

News Flash

पी. के. बॅनर्जी

कित्येक वर्षे ज्यांच्या नुसत्या नावाने लाखभर प्रेक्षक मैदानाकडे खेचले जात, ते नाव म्हणजे पी. के. बॅनर्जी.

पी. के. बॅनर्जी

क्रिकेटवेडय़ा भारतीय वाळवंटातले एक फुटबॉलप्रेमी ओअ‍ॅसिस म्हणजे बंगाल. तिथे कित्येक वर्षे ज्यांच्या नुसत्या नावाने लाखभर प्रेक्षक मैदानाकडे खेचले जात, ते नाव म्हणजे पी. के. बॅनर्जी. १९८२नंतर दूरदर्शनवर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे उपान्त्य आणि अंतिम सामने दाखवले गेले. १९८६पासून मात्र प्रत्येक विश्वचषक स्पर्धा भारतात दिसतेच. सुरुवातीच्या काही स्पर्धासाठी तज्ज्ञ टिप्पणी देण्यास पी. के. हमखास उपस्थित असायचे. त्या वेळी एखाद्या फुटबॉलपटूने कशा प्रकारे खेळायला हवे होते, किंवा एखाद्या संघाने कसा उत्तम बचाव केला याविषयीच्या त्यांचे शब्द नेमके आणि मोलाचे असत. त्यामुळेच कदाचित त्यांनी सांगितलेल्या क्ऌप्त्या चटकन समजत. एक खेळाडू, प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द भारतीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी ठरली. १९व्या वर्षी ते कारकीर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळले, वयाच्या १५व्या वर्षी पहिला क्लब सामना. शिकण्यासाठी जमशेदपूरला होते आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ईस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी धरावी लागली. पण त्यांचा वेग आणि कौशल्य वादातीत होते. विंगर (बगलेवरून)व  सेंटर (मध्यावर) अशा दोन्ही स्थानांवर ते सारख्याच सहजतेने खेळायचे. या बहुपैलुत्वामुळेच कलकत्ता फुटबॉल लीगमध्ये १९५८मध्ये ईस्टर्न रेल्वेने अजिंक्यपद पटकावले; तेही ईस्ट बंगाल, मोहन बागान वा मोहमेडन स्पोर्टिगची मक्तेदारी मोडून! या तीन बडय़ा संघांकडून न खेळताही राष्ट्रीय संघात निवड झालेले ते पहिलेच. मेलबर्न ऑलिम्पिक(१९५६) उपांत्यपूर्व सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा ४-२ असा पराभव  भारताने  केला. त्या सामन्यात पी. के. यांनी गोल केला नाही, पण प्रत्येक गोलसाठी मोलाचे पासेस पुरवले. त्या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. जागतिक स्पर्धेतली भारताची फुटबॉलमधली ती आजवरची सर्वोत्तम कामगिरी.  १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ते भारतीय संघाचे कर्णधार होते. फार यश नाही मिळाले; परंतु फ्रान्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी झालेल्या सामन्यातील त्यांनी झळकावलेला गोल संस्मरणीय ठरला. १९६२ एशियाडमध्ये भारताने फुटबॉल सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने बलाढय़ दक्षिण कोरियाला हरवले. पी. के. यांनीही एक गोल केला. पुढे अनेक स्पर्धात त्यांनी भारताचे नेतृत्व केले. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. बँकॉक एशियाडमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने कांस्यपदक जिंकले. हे भारताचे फुटबॉलमधील आजवरचे शेवटचे महत्त्वाचे पदक! म्हणजे पहिली मोठी कामगिरी ते शेवटची मोठी कामगिरी या कालखंडातील महत्त्वाचे किमयागार पी. के. बॅनर्जीच ठरले. आज भारतात फुटबॉलवेडही वाढत असताना, आंतरराष्ट्रीय मैदानावर भारतीय संघाची कामगिरी त्या काळातील भारतीय संघाच्या जवळपासही जाणारी नाही. ही पोकळी पी. कें.च्या निवृत्तीनंतर निर्माण झाली होतीच. त्यांच्या निधनाने तो संदर्भ अधिक खिन्नगडद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:52 am

Web Title: p k banerjee dd70
Next Stories
1 सदानंद फुलझेले
2 एडवर्ड लिमोनोव
3 जयराम कुलकर्णी
Just Now!
X