इंग्रजी आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून बीए करताना, मॅकबेथ आणि हॅम्लेट या नाटकांत महाविद्यालयीन रंगमंचावर छोटय़ा भूमिका केल्या तेव्हापासून ते शेक्सपिअरच्या प्रेमात पडले.. १९५५ मध्येच मॅकबेथचे त्यांनी पंजाबीत भाषांतर केले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून मिळालेली नोकरी करतानाच ते ‘रॉयल शेक्सपिअर कंपनी’चे सदस्य झाले.. आणि अखेर ‘शेक्सपिअरच्या सर्वच्या सर्व नाटय़कृतींचे पंजाबीत एकहाती भाषांतर करणारे’ अशी प्रा. सुरजित हन्स यांची एक ओळख उरली! ‘एक ओळख’;  कारण हे प्रा. हन्स १७ जानेवारीस निवर्तले, तेव्हा कथा, कादंबऱ्या, ‘पंजाबी साहित्यातून पंजाबच्या इतिहासाचे दर्शन’ हे संशोधनपर खंड, ‘जलियाँवाला बाग : एका राष्ट्रीय प्रतीकाचा उदय’ अशी स्वत: लिहिलेल्या एकंदर २५ पुस्तकांची यादीही त्यांच्या नावावर आहे.

साहित्याची आतून समज आणि अपार आवड या दोन गुणांपायी ते सतत लिहिते राहिले. अगदी अलीकडे चार्ल्स डार्विनच्या ‘द ओरिजिन ऑफ स्पीशीज’च्या पंजाबी अनुवादाचे काम त्यांनी हाती घेतले होते. आजारपणामुळे ते थांबले. लेखक म्हणून त्यांनी हाताळलेल्या वैविध्याइतकेच त्यांचे आयुष्यही नाटय़मय होते. लंडनहून १९७३ साली ते भारतात परतले आणि अमृतसरच्या गुरु नानकदेव विद्यापीठात इंग्रजीचे व्याख्याते झाले. पण आठच वर्षांत, १९८१ मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठाच्या इतिहास विभागात अध्यापन सुरू केले आणि १९८६ ते ८९ आणि १९९० ते ९१ या काळात ते इतिहास विभागाचे प्रमुखही झाले. शेक्सपिअरच्या भाषांतराचे काम त्यांनी १९९३ मध्ये, ‘पंजाबी विद्यापीठा’चे अभ्यासवृत्तीधारक (फेलो) या नात्याने सुरू केले. ‘हेन्री तिसरा’ हे शेक्सपिअरचे त्यांनी अनुवादित केलेले ४३ वे पुस्तक, म्हणजे या संपूर्ण प्रकल्पास २० वर्षे लागली. तोवर प्रा. हन्स निवृत्त झालेले होते. प्रकाशकांकडून प्रत्येक अनुवादित पुस्तकाचे आठ हजार रुपये त्यांना मिळत. ‘हे म्हणजे दिवसाला ४० रुपये!’ असे ते विनोदाने म्हणत आणि पैशांपेक्षा, लंडनमधील ३२ ‘बरोज्’पैकी ईलिंग या बरोच्या महापौरांनी २०१३ मध्ये सन्मानपूर्वक भेट दिलेला शेक्सपिअरचा छोटेखानी अर्धपुतळा, ही त्यांना खरी कमाई वाटे!

उतारवयात, २०१४ साली त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका ‘साक्षात्कारी’ ठरला आणि ते विज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. डार्विनच्या भाषांतराची कल्पना आली, ती या साक्षात्कारामुळे. इतिहास आणि साहित्य यांचे नाते जोडणारा हा स्वभाषाप्रेमी आणि आंग्लपंडित अभ्यासक, विज्ञानाशी नाते जोडल्याची खूण मिळण्यापूर्वीच हरपला. मात्र गेल्या सुमारे अर्धशतकात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले होते.