‘फॉरेन पॉलिसी’ या अमेरिकी नियतकालिकाने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. शीतयुद्धाच्या मधल्या टप्प्यापासून सोव्हिएत रशियाशी तगडी स्पर्धा असूनही अमेरिकी परराष्ट्र धोरणाचा दबदबा वाढू लागला होताच; पण व्हिएतनाम युद्धानंतर आकारास येऊ पाहात असलेल्या नव्या जगाची कल्पना ज्या मोजक्यांना आधी लक्षात आली असे (आणि नंतर त्याचे ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ असे सैद्धान्तीकरण करणाऱ्या) सॅम्युएल हटिंग्टन या हार्वर्ड विद्यापीठातील नामवंत प्राध्यापकाने ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाची सुरुवात केली. हटिंग्टन यांचा जगाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन या नियतकालिकातही डोकावला, पण गंभीर तरी वाचनीय अशा शैलीने अल्पावधीतच अमेरिकी आणि जगभरच्या धोरणकर्त्यांचे लक्ष या नियतकालिकाने वेधून घेतले. आता द्वैमासिक म्हणून छापील स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या आणि डिजिटल व्यासपीठावर नियमित आंतरराष्ट्रीय राजकारणाचे करकरीत विश्लेषण करणाऱ्या ‘फॉरेन पॉलिसी’च्या मुख्य संपादकपदी रवी अग्रवाल या भारतीय पत्रकाराची निवड झाली आहे. जोनाथन टेप्परमन यांच्याकडून चाळिशीच्या आत असलेल्या रवी अग्रवाल यांनी सरत्या आठवडय़ात ‘फॉरेन पॉलिसी’ची सूत्रे हाती घेतली. जगभरच्या धोरणकर्त्यांच्या नियमित वाचनयादीत असलेल्या ‘फॉरेन पॉलिसी’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे आता आली असली, तरी गेल्या दोन वर्षांपासून ते या नियतकालिकाच्या व्यवस्थापकीय संपादकपदी होतेच. त्याआधी जवळपास ११ वर्षे ते ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीत कार्यरत होते. तिथे त्यांनी लंडन आणि न्यू यॉर्क, तसेच दिल्ली या महत्त्वाच्या शहरांतून प्रभावी बातमीदारी केली, शिवाय काही काळ ‘सीएनएन’चे ते दक्षिण आशिया विभाग मुख्य प्रतिनिधीही होते.

लंडनमध्ये जन्मलेले, पण बालपण कोलकत्यात घालवलेले रवी अग्रवाल हे हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर. तिथे हार्वर्डच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून चालवल्या जाणाऱ्या ‘द हार्वर्ड क्रिमझन’ या वृत्तपत्रात काम करताना त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले. पुढे ‘सीएनएन’मध्ये रुजू झाल्यावर पर्यावरण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण यांतील घडामोडींविषयी अग्रवाल यांनी सखोल बातमीदारी केली. ‘कनेक्ट द वर्ल्ड’ हा त्यांच्या कल्पनेतून साकारलेला वृत्त-कार्यक्रम असो की उत्तर प्रदेशच्या ग्रामीण  बालकामगारांबद्दलचा वृत्तान्त असो; अग्रवाल यांनी त्यांच्या बातमीदारीची प्रभावक्षमता दाखवून दिली आहे. ‘सीएनएन’वरच दर रविवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘फरीद झकेरिया जीपीएस’ या कार्यक्रमाला चित्रवाणी क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘पीबॉडी अवॉर्ड’ २०१२ साली मिळाला; तेव्हा झकेरियांच्या चमूत अग्रवाल यांचाही समावेश होता, हेही उल्लेखनीयच. २०१८ साली ते ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाशी जोडले गेले, तेव्हा त्यांचे ‘इंडिया कनेक्टेड’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. भारतात मोबाइल फोन व इंटरनेटच्या आगमनानंतर झालेले मूलगामी बदल टिपणारे हे पुस्तक जगभरच्या जाणत्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. गेल्या चार वर्षांपासून उघडपणे अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू घेणाऱ्या ‘फॉरेन पॉलिसी’चे  प्रमुख संपादकपद अग्रवाल यांच्याकडे येणे, हे भारतीय धोरणकर्त्यांसाठीही उपयुक्त ठरावे!