26 February 2021

News Flash

सुप्रियादेवी

सुप्रियादेवी यांचा जन्म म्यानमार (तेव्हाचा बर्मा)मधील मायकिना गावचा.

सुप्रियादेवी

अजोड सौंदर्य, रेखीव चेहरा व भावोत्कट डोळे यांमुळे तिने बंगालीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीवर ५० वर्षे अधिराज्य केले. तिच्या निधनाने एक मंतरलेला काळ सरला आहे. तिचे नाव सुप्रियादेवी. सुप्रिया चौधुरी, मूळची बॅनर्जी. ‘बंगालची सोफिया लॉरेन’ असे तिला म्हटले जायचे ते तिच्या अभिनयगुणांमुळेच. बंगालच्या महामालिकांची जननी हे एक नामाभिधानही तिला प्राप्त होते. पद्मश्री व पद्मविभूषण तसेच ‘बंग विभूषण’ असे अनेक मानसन्मान सुप्रिया यांना मिळाले होते.

या बंगाली अभिनेत्रीने उत्तमकुमार यांच्याबरोबर अनेक हिट चित्रपट दिले; त्यात ‘बासू पोरिबार’, ‘बिलम्बितो लॉय’, ‘शोनार होरिन’, ‘बाघ बोंडी खेला’, ‘चौरंगी’, ‘संन्यासी राजा’ यांचा समावेश होता. उत्तमकुमारसह तिचे नाव ‘गॉसिप’कथांतही जोडले जाई. ‘मेघे ढाका तारा’मधील तिचा अभिनय तर लाजवाबच. ऋत्विक घटक यांच्या या चित्रपटातील शिलाँगच्या पहाडी भागात चित्रित केलेल्या प्रसंगातील सुप्रियाचे आलाप-विलाप दरीखोऱ्यांत घुमले तेव्हा तिच्या अभिनयाची ताकद कळली. सुप्रियादेवी यांचा जन्म म्यानमार (तेव्हाचा बर्मा)मधील मायकिना गावचा. वडील गोपाल चंद्र बॅनर्जी यांनी तिला वयाच्या सातव्या वर्षांपासून नाटकाचे धडे दिले. दुसऱ्या महायुद्धावेळी दोन हजार किमीचा पायी प्रवास करून हे कुटुंब कोलकात्यात आले. ‘बासू पोरिबार’ या चित्रपटानंतर तिला नाव मिळाले. तिचा घटस्फोट झालेला असल्याने ती एकल माता पण त्याचा तिच्या कारकीर्दीवर काही परिणाम झाला नाही. हिंदूीत तिने ‘आप की परछाइयाँ’ (धर्मेद्र), ‘तीन देवियाँ’ (देव आनंद), ‘दूर गगन की छाँव में.’ (किशोरकुमार) हे चित्रपट केले. ‘आम्रपाली’तील तिच्या नृत्याची वैजयंतीमालाने प्रशंसा केली होती. मात्र तिला नावलौकिक मिळाला बंगाली ‘टॉलीवूड’मध्येच. ऋत्विक घटक यांनी १९६० मध्ये तिला ‘मेघे ढाका तारा’मध्ये नीताची भूमिका अन् १९६३ मध्ये पुन्हा कोमल गंधारमध्ये अनसूयाची भूमिका दिली. ‘लालपथोर’मधील जमीनदाराच्या सेवेत असलेली विधवा ते ‘बिलंबिता लॉय’मधील दारूडय़ा नवऱ्याची पत्नी अशा अनेक पदरी भूमिका तिने साकारल्या. तिची लांब मान, खोल आवाज, रेखीव बांधा यांचा वापर ऋत्विक घटक यांनी ‘मेघे ढाका तारा’ व ‘कोमल गंधार’मध्ये कोरियोग्राफीचा एक भाग म्हणून केला होता. अलीकडे मीरा नायर यांच्या ‘दी नेमसेक’मध्ये तिने चरित्र भूमिका केली. तिचा पडद्यावरचा वावर हा एक दरारा होता, त्यामुळेच ‘कल तुम आलेया’, ‘मोन निये’, ‘बोन पलाशीर पडाबोली’, ‘दूर गगन की छाव में, ‘शुधु एकटी बोछोर’ या चित्रपटांत ती वेगळी उठून दिसली. तिच्या जाण्याने एक मनस्वी अभिनेत्री आपण गमावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 2:29 am

Web Title: remembering supriya devi
Next Stories
1 गुरचरण सिंग कालकट
2 एस. सोमनाथ
3 परेश धनानी
Just Now!
X