पृथ्वीवरील जैवविविधतेत आणि ती टिकवण्यातही कीटकांचा वाटा मोठा आहे. त्यांची संख्या नेमकी तर सांगता येणार नाही, पण त्याबाबतचा अंदाज व्यक्त करणेही कठीण. कीटकांच्या दुनियेत रमणारे टेरी एल एर्विन हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची ख्याती कीटकशास्त्रज्ञ अशीच होती. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी पृथ्वीवर नेमके किती कीटक असावेत याचा अंदाज वर्तवण्याचे काम केले. उत्तरायुष्यात ते ‘स्मिथसॉनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’च्या  कीटक संग्रहालयाचे अभिरक्षक म्हणून काम करीत होते. कीटकांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते त्यामुळेच ते एवढे मोठे काम उभे करू शकले. उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन व आधुनिक जैवविविधता विज्ञान यांची सांगड त्यांनी घातली होती. एर्विन यांचा जन्म कॅलिफोर्नियातला. एर्विन यांचा शालेय शिक्षणातला विषय जीवशास्त्रच होता. तरुणपणी त्यांना मासेमारी आवडत असे. कीटकशास्त्रज्ञ जे गॉर्डन एडवर्ड्स यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले होते. मात्र काही काळ ते अणुपाणबुडय़ा तयार करणाऱ्या कारखान्यातील अ‍ॅस्बेस्टॉस विभागात काम करीत होते. जॉर्ज बॉल यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्यांना कीटक अभ्यासाची गोडी लागली. अल्बर्टा विद्यापीठातून त्यांनी कीटक विज्ञानात पीएच.डी. पदवी घेतली, नंतर हार्वर्डमध्ये फिलिप डार्लिग्टन यांच्यासारख्या अमेरिकेतील ख्यातनाम कीटकशास्त्रज्ञांसमवेत काम केले. पनामातील कीटकांचा त्यांचा विशेष अभ्यास होता. काही वेळा त्यांनी झाडांवर कीटकनाशके फवारून कीटकांचे नमुने गोळा केले. त्या वेळी त्यांना एकूण १२०० नमुने सापडले होते! त्यापैकी १६३ हे ल्युहिआ सिमानी झाडावरचे होते. उष्णकटिबंधीय जंगलात झाडांच्या ५०,००० प्रजाती आहेत, त्यामुळे तेथे कीटक व प्राण्यांच्या जगातील चाळीस टक्के प्रजाती आहेत. जगात संधिपाद कीटकांच्या तीन कोटी प्रजाती आहेत, असा अंदाज त्यांनी बांधला होता. अनेकांनी ही संख्या १५ लाख असल्याचे म्हटले होते. त्यामुळे एर्विन यांच्या या अंदाजावरून वाद झाला होता. १९७३ ते १९७५ या काळात ते ‘सोसायटी ऑफ सिस्टिमॅटिक बायॉलॉजिस्ट्स’ या संस्थेचे सचिव होते. ‘झूकीज’ या नियतकालिकाचे संपादन ते करीत असत. त्यांनी एकूण ४०० कीटक प्रजातींच्या माहितीचे संकलन केले होते. त्यांच्या संशोधनामुळे जैवविविधतेकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यांचे ३०० शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांच्या सन्मानार्थ किमान ५० कीटक प्रजातींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. जैवविविधतेतील सौंदर्य त्यांनी कीटकांच्या दुनियेतून जगापुढे मांडले होते.