पहिल्या महायुद्धानंतर, १९१९ साली चीनमधील गुआंग्डाँग प्रांतातले वाँग पितापुत्र ‘जगायला’ घराबाहेर पडले. अमेरिकेत आले. लॉस एंजलिस शहरात राहू लागले. तेव्हा नऊ वर्षांचे असणारे वाँग जेन यू यांची आई आणि बहीण चीनमध्येच राहिल्या, त्या कायमच्या. ‘जेन यू ’ऐवजी ‘टायरस’ हे अमेरिकी नाव घ्यावे लागले. कारण म्हणे, अमेरिकेतच हा मुलगा जन्मला असल्याचे असत्यकथन वडिलांना करता आले पाहिजे. ते असत्य खपून गेले, तरच अमेरिकेत राहाता येणार होते. वडील कष्टकरी मजूरच होते. पोराला कष्ट नकोत म्हणून त्याच्या हातच्या कलेला प्रोत्साहन देऊ लागले. टायरसदेखील चित्रे छान काढी, रंगवी.. पुढे हाच टायरस १९३८ पासून ‘वॉल्ट डिस्ने स्टुडिओ’त चित्रकार म्हणून राहिला आणि १९४२ मध्ये ‘बँबी’ या हरिणीची पहिलीवहिली कल्पनाचित्रे त्याने तयार केली! आज ‘बँबी’ची खेळणी कुठेही मिळतात, ते रूप पहिल्यांदा साकार केले होते टायरस वाँग यांनी.
हे टायरस वाँग १०६ वर्षांचे होऊन, परवाच्या ३० डिसेंबरला वारले. त्यांची कहाणी ही केवळ यशस्वी चित्रकाराची नाही. ती वर्णद्वेषाची, चित्रकार म्हणून जगण्यात निराशाच कशी पदरी येते आणि अखेर चित्रकाराचा ‘चित्रकामगार’ कसा होतो याची.. आणि अशा निराशाजनक स्थितीवर मात करून स्वत्व शोधणाऱ्या आनंदी वार्धक्याची कहाणी आहे.
टायरस यांचे कलाशिक्षण तेव्हाच्या ‘ओटिस आर्ट इन्स्टिटय़ूट’मध्ये (आताचे ओटिस कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) झाले. १९३०च्या सुमारास, पोटासाठी जाहिरातींचे फलक रंगवण्याची कामे ते करू लागले, तरी चित्रकार बनण्याची उमेद होतीच! शिक्षण पूर्ण होताहोता, १९३२ मध्येच ‘आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो’च्या पहिल्यावहिल्या मुद्राचित्रण- महाप्रदर्शनात, अगदी आंरी मातीस, पाब्लो पिकासो, पॉल क्ली.. अशा थोरामोठय़ांसह एका कुठल्याशा भिंतीवर टायरस यांचेही मुद्राचित्र (ग्राफिक प्रिंट) मांडले गेले! तो काळ महामंदीचा होता. अध्यक्ष रूझवेल्ट यांनी या मंदीशी लढताना चित्रकारांसाठी जी योजना आखली होती, त्यात दर महिन्याला दोन चित्रे काढून महिन्याकाठी ९४ डॉलरची कमाई टायरस करू लागले.
डिस्ने यांच्यासाठी काम करण्याची संधी १९३५ मध्ये आली असूनही ‘स्वतंत्र चित्रकार’ बनण्याच्या ईष्र्येने टायरस यांनी ती स्वीकारली नाही. अखेर परिस्थितीचे चटके खाऊन टायरस १९३८ मध्ये वॉल्ट डिस्ने यांना भेटले. त्या वर्षीपासून नोकरी सुरू झाली. वॉल्ट डिस्ने हे स्टुडिओतील सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत, प्रेरणाही देत. पण बाहेर सारे श्रेय एकटय़ा वॉल्ट यांचेच! इतके की, ‘बँबी’ची मूळ कल्पनाचित्रे टायरस यांची आहेत, ही साधी माहितीदेखील कुणाला नव्हती. एकविसाव्या शतकात, डिजिटल झालेल्या डिस्ने स्टुडिओचा इतिहास जुन्या कागदी चित्रांतून खणून काढला जात असताना टायरस वाँग यांच्या नोंदींसह बँबीची चित्रे मिळाली. लॉस एंजलिसमध्येच एक वृद्धसे वाँग म्हणून कोणी राहातात, स्वत पतंग बनवून उडवतात, हे तोवर अनेकांना माहीत झाले होते. तेच हे वाँग, हेही लक्षात आले! मग २०१४ साली ‘वॉल्ट डिस्ने फॅमिली म्यूझियम’मध्ये या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने वाँग यांना चित्रकार म्हणून हरपलेली कीर्ती पुन्हा मिळाली खरी, पण त्यांची ही सर्व चित्रे मालकीहक्काने डिस्ने स्टुडिओतच राहाणार होती. वाँग या असल्या लिप्ताळय़ांतून कधीच बाहेर पडले होते. झाले ते झाले. जगलो ते जगलो. आता छान पतंग करायचे, उडवायचे.. असा त्यांचा जीवनक्रम! अगदी शंभरीनंतरसुद्धा समुद्रकिनाऱ्यावर पतंग उडवणारे वाँग कॅलिफोर्नियाकरांनी पाहिले आहेत. ते त्यांचे आनंदी अस्तित्व आता निमाले.