26 October 2020

News Flash

उदयन पाठक

मिश्रधातूंवरील संशोधनासाठी पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच नागपूरकर आहेत.

उदयन पाठक

धातुशास्त्रातील विशेष संशोधनासाठी अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरियल्स या प्रसिद्ध संस्थेचा पुरस्कार मिळवणारे उदयन पाठक मूळचे नागपूरचे. सध्या पुण्यातील टाटा मोटर्सच्या अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या पाठकांनी वाहननिर्मितीच्या क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केले आहेत. प्रवासी वाहनांना सौरऊर्जा परावर्तित करणारा रंग वापरून आतील तापमान कमी करून प्रवास सुखकारक करणे, थर्मोइलेक्ट्रिक पदार्थाचा वापर करून वाहनांच्या आसनाला गरम किंवा थंड करणे, वंगणासाठी लागणाऱ्या तेल व ग्रिसचे आयुष्य २० किमीऐवजी १ लाख २० हजार किमीपर्यंत वाढवणे, बहुराष्ट्रीय वाहन उद्योगांना लागणारे धातू देशात विकसित करून परकीय चलन वाचवणे, यांसारखी अनेक संशोधने पाठकांच्या नावावर आहेत.

वाहनांची निर्मिती करताना प्रामुख्याने पारंपरिक मिश्रधातूंचा वापर केला जातो. यात भरपूर ऊर्जा खर्च होते. ती वाचवण्यासाठी पाठकांनी धातूमधील निकेल, मॉलीब्डेनम, क्रोमियम या मिश्रकांचे प्रमाण करून नवे मिश्रधातू तयार केले. या नव्या मिश्रधातूंचा वापर करून तयार केलेली वाहने ग्राहकांसाठी नव्या सोयी उपलब्ध करून देणारी ठरली. पाठकांनी याआधी जॉन डीयर, डीजीपी हिनोदय, स्पायर इंडिया, भारत फोर्ज या कंपन्यांच्या संशोधन विभागात काम केले. मात्र त्यांच्या धातुशास्त्रातील संशोधनाला खरी गती मिळाली ती टाटा मोटर्समध्ये. भारतात काळ्या रंगाची वाहने अशुभ समजली जातात. हा रंग उष्णता शोषून घेणारा असतो व ते फायद्याचे असते तरीही ग्राहक या वाहनांकडे बघायचे नाहीत. हे लक्षात आल्यावर पाठकांनी हा रंग अधिक आकर्षक करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा धातूमिश्रित पेंट तयार केला. त्याचा वापर सुरू झाल्यानंतर ही वाहने आकर्षक स्वरूपात बाजारात आली व त्याची मागणीदेखील वाढली. धातूवर वेगवेगळे प्रयोग करणारे पाठक सी. पी. अ‍ॅण्ड बेरार शाळेचे विद्यार्थी. तंत्रनिकेतनमधून पदविका वविश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्थेतून पदवी त्यांनी मिळवली. रेल्वे वाहतूक व्यवस्था आणखी कशी सुधारता येईल, यावर त्यांनी अनेक वर्तमानपत्रांमधून लेखन केले आहे. त्यांनी उदयोन्मुख अभियंत्यांच्या संशोधनासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून पुण्यात अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरियल या संस्थेची शाखा स्थापन केली. या वर्षी पाठक यांच्यासोबतच आयआयटी चेन्नईचे डॉ. कामराज यांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे. या दोघांना येत्या १६ ऑक्टोबरला अमेरिकेतील ओहायो प्रांतातील कोलंबस येथे सोसायटीचे फेलो म्हणून गौरविण्यात येणार आहे. मिश्रधातूंवरील संशोधनासाठी पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच नागपूरकर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:57 am

Web Title: udayan pathak fasm award
Next Stories
1 प्रत्युषकुमार
2 गिरीश पटेल
3 नटवरभाई ठक्कर
Just Now!
X