News Flash

विश्वास मंडलिक

योगाचा प्रसार, शिक्षण आणि एकूणच प्रगतीसाठी योगाचार्य मंडलिक यांचे योगदान विलक्षण आहे.

विश्वास मंडलिक

अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवत उत्तमरीत्या चालणारा उद्योग बंद करण्याचे धाडस कोण करील? योगाचार्य विश्वास मंडलिक यांनी असे धाडस करून स्वत:ला योगशास्त्र प्रचारात अक्षरश: झोकून दिले. मागील साडेपाच दशकांत देश-विदेशातील लाखो लोकांपर्यंत योगा पोहोचवला, रुजविला. योग शिक्षक आणि या विषयावर विपुल लेखन करून त्याची व्याप्ती विस्तारली.

योगाचा प्रसार, शिक्षण आणि एकूणच प्रगतीसाठी योगाचार्य मंडलिक यांचे योगदान विलक्षण आहे. त्याची दखल केंद्र सरकारने पंतप्रधान पुरस्काराच्या माध्यमातून घेतली. देशभरातील १८६ नामांकनातून मंडलिक यांची या महत्त्वपूर्ण पुरस्कारासाठी निवड झाली. योगशास्त्र मानवी जीवनाला नवी दिशा कशी देऊ शकते ते मंडलिक यांनी सिद्ध केले. ते मूळचे नाशिकचे. पुणे येथील महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान पहिल्यांदा योगशास्त्राशी त्यांचा परिचय झाला. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर मुंबईतील बडय़ा कारखान्यात त्यांना नोकरी मिळाली. यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असतांना मध्येच त्यांनी नोकरी सोडून उद्योगाची वाट धुंडाळली. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत वीज रोहित्रदुरुस्तीचा कारखाना सुरू केला. या दरम्यान योगाशास्त्राचा अभ्यास सुरूच होता. उद्योगात रमलेल्या मंडलिक यांनी नंतर योग शास्त्रासाठी पूर्णवेळ देण्याचा निश्चय करीत पुन्हा वाट बदलली. योगसाधना आणि लेखन या छंदावर लक्ष केंद्रित केले. नाशकात १९७७-७८ मध्ये योगा वर्ग सुरू केले. अनंत अडचणींवर मात करीत ज्ञानदानाचे काम आजतागायत अखंडपणे सुरू आहे. प्रशिक्षण वर्गाला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी स्थानिक शाळांना योग शिक्षक देऊन वर्ग सुरू केले. त्या काळात एकाच वेळी ५० ठिकाणी योग वर्ग चालत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना काही प्रमाणपत्र द्यायला हवे, या विचारातून योग विद्या धामची स्थापना त्यांनी केली. या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिक्षकांनी नंतर आपापल्या भागात प्रचारास सुरुवात केली. आज योग विद्या धामची देशात १६० केंद्रे आहेत.  मुलगा गंधार यांच्या मदतीने योगापॉइंट डॉट कॉम संकेतस्थळ सुरू करीत परदेशी विद्यार्थ्यांना योगशास्त्राकडे आकर्षित केले. त्र्यंबकेश्वर येथे योग विद्या गुरुकुलची स्थापना केली. योग अभ्यासावर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कार्याचा सरस्वती पुरस्कार, नाशिकभूषण, दधिची आदी पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना योगज्ञान देऊन त्यांच्या जीवनात आरोग्य, आनंद विकसित करण्याचे तत्त्व घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: yogacharya vishwas mandlik profile
Next Stories
1 डॉ. अतुल गावंडे
2 डॉ. एच. वाय. मोहन राम
3 आर. प्रज्ञानंद
Just Now!
X