News Flash

गाडी सेकंड-हँड घेताय?

प्रत्येकालाच ४ ते ५ लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही.

गाडी सेकंड-हँड घेताय?

एकेकाळी चैनीची असलेली ‘गाडी’ म्हणजे चारचाकी वाहन आता गरजेचे झाले असून, घरापुढे हे वाहन असणे म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. मागील काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरासमोर एक स्कूटर असली की घरमालकाचा एक प्रकारे रुबाब वाढायचा. मात्र आता त्याची जागा घरासमोरील चारचाकी वाहनाने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. लोक शहरात मध्यवर्ती भागात घर घेणे परवडत नाही म्हणून शहरापासून थोडे दूर निर्माण होणाऱ्या नवीन वस्त्यां (टाउनशिप) मध्ये घरे घेतात. अशा ठिकाणी राहताना फक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहता येत नाही अन् वाढत्या रहदारीत दुचाकी असुरक्षित ठरते, तेव्हा अशा ठिकाणी स्वत:ची चारचाकी गाडी ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र प्रत्येकालाच ४ ते ५ लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही. कारण अगोदरच घराचा हप्ता डोक्यावर असतो. अशा वेळेला सेकंड हँड गाडी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’  म्हणून किंवा फर्स्ट बायर (पहिल्यांदा गाडी घेणारा) म्हणून घेत असतो. तर काही तरुण क्रेझ म्हणून, हौस म्हणून एसयूव्ही किंवा मोठय़ा ब्रॅण्डच्या गाडय़ांचा आनंद थोडय़ा पैशात घेण्यासाठी सेकंड हँड गाडय़ा घेतात. मात्र सेकंड हँड गाडी घेताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत अनेकांना माहिती नसते. ती माहिती थोडक्यात समजावून सांगणारा हा वृत्तान्त..

‘अरे एक सेकंड हँड गाडी घेतली आहे, म्हटले नवीन घेण्याआधी या गाडीवर हात साफ करून घेऊ’ अशा प्रस्तावनेसह बरेच जण कार विक्री-दुरुस्ती करणाऱ्यांकडे येतात. विकत घेतलेली सेकंड हँड गाडी एकदा चेक करून द्या असे सांगतात. दुर्दैवाने त्यात जास्त खर्च निघाला की निराश होतात. तेव्हा आपली फसगत होऊ  नये यासाठी सेकंड हँड गाडी घेताना ती काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक ठरते.

वापरलेली गाडी घेताना केवळ स्वस्त मिळाली अथवा ‘वरून चकचकीत वाटली’ या निकषावर अवलंबून राहत खरेदी करू नये. आपण ज्या शहरात राहता तिथे व त्या आसपास ज्या गाडय़ांचे सव्‍‌र्हिस स्टेशन अथवा त्या गाडीचे स्पेअर्स उपलब्ध असतील त्या ब्रॅण्डची गाडी शक्यतो घ्या. बाजारपेठेत मोठे नाव असलेल्या पण फारशी विक्री नसलेल्या मॉडेलच्या गाडय़ा सेकंड हँड म्हणून आकर्षक किमतीला उपलब्ध असतात. अशा गाडय़ा भविष्यात तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. सेकंड हँड गाडय़ांचे व्यवहार करणाऱ्या शोरूम अथवा विक्रेत्याकडे गेल्यावर एखादी गाडी आपणास लगेच पसंत जरी पडली तरी तसे भाव चेहऱ्यावर व्यक्त करू नका; आधी आपल्या बजेट विषयी तिथे काहीही बोलू नका.

सेकंडहँड गाडीची किंमत ठरवताना सर्व प्रथम इन्शुरन्स पॉलिसीवरील आयडीव्ही म्हणजेच इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू किती आहे हे लक्षात घ्यावे. जास्त खप असणाऱ्या गाडीला आयडी व्हॅल्यूपेक्षा १० ते १५ टक्के जास्त किंमत मिळू शकते. त्याचप्रमाणे विशेष न चालणाऱ्या मॉडेल्सची किंमत आयडी व्हॅल्यूपेक्षा कमीसुद्धा असू शकते. योग्य किंमत ठरवण्याच्या दृष्टीने ओएलएक्स, क्विकर, कारवाले अशा वेबसाइट्सचा आपण आधार घेऊ शकता.

बऱ्याच वाहन उत्पादकांनी आता स्वत:च्या सेकंड हँड गाडय़ा विकण्याची दालने उभारली आहेत. त्या माध्यमातून चांगल्या गाडय़ा मिळू शकतात. यातील व्यवहारही निधरेकपणे करता येतात. पण खसगी दलाल (एजंट) आणि त्यांच्या दुकानात विकायला ठेवलेली गाडी उत्तम प्रकारे पॉलीश करून ठेवलेली, उत्तम स्थितीत आहे अशी करून ठेवलेली असते. अशी चकचकीत गाडी म्हणजेच दोषविरहित गाडी /झिरो डिफेक्ट गाडी असे कदापि समजू नये. इथेदेखील (सेकंड गाडी घेताना) संत चोखामेळा यांची ओवी लक्षात घ्यावी.

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा!

काय भुललासी वरलिया रंगा!!

सेकंड हँड गाडी विकत घेताना (उदाहरणार्थ) समजा १ लाख रुपयास मिळाली (कितीही चेक करून घेतलेली असली) तरी नजीकच्या काळात (पुढच्या वर्षभरात) बॅटरी, व्हील बेअरिंग, क्लच अशा गोष्टींमध्ये काम निघून ५ ते १० हजार रुपये खर्च निघू शकतो, हे लक्षात ठेवल्यास मनस्ताप होत नाही. कारण शेवटी ती वापरलेली गाडी आहे हे ध्यानात असू द्यावे. म्हणजे खर्च करताना उगाच सेंकड हँड गाडी घेतल्याचा मनस्ताप होत नाही.

गाडीची कागदपत्रे :

 • आरसी बुक
 • विमा पॉलिसी
 • पीयूसी
 • या सर्व कागदपत्रांची वैधता तपासून घ्यावी. गाडी खरेदी केल्यानंतर आणि आरटीओचे रेकॉर्डमध्ये आपले नाव बदलून घेतल्यापासून ७ दिवसांत इन्शुरन्सची पॉलिसी गाडी घेणाऱ्यांच्या नावे ट्रान्सफर (बदलून) घेणे बंधनकारक आहे. अन्यथा आरटीओ रेकॉर्डवर नवीन मालकाचे नाव अन् इन्शुरन्स पॉलिसी मात्र जुन्या मालकाच्या नावे राहिल्यास आणि दुर्दैवाने सदर गाडीचा अपघात घडल्यास इन्शुरन्स क्लेम दिला जात नाही हे लक्षात घ्यावे.
 • आरसी बुकवर प्रिंट केलेले इंजिन आणि चॅसी नंबर तसेच गाडीच्या बॉडीवर कोरलेले चॅसी नंबर सारखे असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच गाडीवरती एखाद्या बँकेचे कर्ज असल्याची नोंदणी आरसी बुकवर असल्यास ते फेडले असल्याची बँकेची एनओसी किंवा मालक कर्जासहित गाडी विकत आहे का? याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
 • एखादी गाडी पसंत पडल्यावर योग्य त्या सव्‍‌र्हिस स्टेशन अथवा वर्कशॉपमध्ये गाडी तपासून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी ती गाडी ‘लिफ्ट अप’करून चेक करण्यास विसरू नका.

तज्ज्ञ मेकॅनिककडून खालील गोष्टी तपासून घ्या

 • गाडीची बॅटरी (असल्यास गॅरंटी कार्ड चेक करून)बॅटरीचे व्होल्टेज, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी
 • इंजिन ऑइल : क्वालिटी, लेव्हल, लीकेज
 • गिअर ऑइल : क्वालिटी, लेव्हल, लीकेज
 • कूलण्ट : क्वालिटी, लेव्हल, लीकेज
 • स्टीअरिंग फ्लुइड : क्वालिटी, लेव्हल, लीकेज
 • ब्रेक फ्लुइड : क्वालिटी, लेव्हल, लीकेज

फायदे :

 • ज्या लोकांच्या गाडीचे रनिंग फार तर १००० ते १२०० (दिवसाला ३०-४०किमी) आहे अशा लोकांसाठी सेकंड हॅण्ड गाडी किफायतशीर ठरू शकते.
 • नवीन गाडीच्या तुलनेत दोन ते चार वर्षे जुनी गाडी ४० ते ६० % कमी किमतीत मिळते.
 • बहुतांश गाडय़ा या तंत्रज्ञान सिद्ध असतात.
 • डेप्रिसिएशन व्हॅल्यू (घसारा मूल्य) नवीन गाडीच्या तुलनेत कमी असते.
 • पैसे दिले की तत्काळ वापरायला उपलब्ध होऊ शकते.
 • एसयूव्ही किंवा हाय एण्ड गाडय़ांची हौस असणारे लोक नवीन एसयूव्ही परवडत नसल्यास कमी पैशात आपली हौस भागवू शकतात.

तोटे :

 • गाडी खराब निघाल्यास डोकेदुखी ठरू शकते.
 • निवड करण्याकरिता मर्यादित मॉडेल्स उपलब्ध असतात .
 • मनपसंत रंगाची चांगली गाडी मिळेल, असे सांगता येत नाही, त्यामुळे गाडीच्या रंगात तडजोड करावी लागते.
 • पाच वर्षे जुन्या गाडय़ांची उत्पादकांकडून वॉरंटी मिळत नाही.
 • विशेष न चालणाऱ्या ब्रॅण्डची गाडी सेकंड हॅण्ड म्हणून विकत घेतल्यास, स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होऊ शकत नाहीत.
 • पुनर्विक्री करताना फारशी किंमत मिळेलच याची शाश्वती नसते.

गाडीची बॉडी  :

गंज व अपघातानंतरची दुरुस्ती (गाडी अपघातग्रस्त होती का?) याची तपासणी करून घ्यावी. सदर बाबतीत तज्ज्ञ व्यक्ती आपल्यासोबत असणे गरजेचे आहे. ३ ते ४ वर्षे जुनी गाडी असल्यास बॅटरीच्या खाली बॅटरीचे अ‍ॅसिड सांडल्याने चॅसी (अ‍ॅप्रन) गंजलेला अथवा त्या जागी तडा गेलेला असतो, प्रसंगी तेथे पॅचवर्क केलेले आढळते. अ‍ॅप्रन बदलण्यासाठी बऱ्यापैकी खर्च येऊ  शकतो. पुढील डाव्या चाकाच्या आतील बाजूससुद्धा बॅटरीच्या पाण्याने अ‍ॅप्रन क्रॅक झालेला दिसू शकतो. पुढील बंपरखाली असणारा तसेच पुढील सस्पेन्शनला आधार देणारा हा पार्ट क्रॉस मेंबर गंजलेला असू शकतो. तो बदलून घ्यायचे झाल्यास ५ ते ७ हजार रुपये खर्च येऊ  शकतो. दरवाजे, बंपर, फेंडरवर डेन्ट (पोचा) असलेली अथवा हे पार्ट अक्सिडेंट पश्चात बदललेले असतील तरी ती गाडी घ्यायला हरकत नाही. परंतु मूळ ढाचा (फ्रेम) अक्सिडेंट विरहित असल्याची खात्री अनुभवी माणूस /योग्य त्या वर्कशॉपमध्ये जाऊन करून घ्या. केवळ विक्रेत्याने दिलेल्या गाडीच्या इतिहासावर अवलंबून राहू नका. काही लोक इतिहास समोर येऊ नये म्हणून मुद्दाम अपघातग्रस्त गाडीचे काम अधिकृत सव्‍‌र्हिस स्टेशनमधून करण्याचे टाळतात. गाडीवर सव्‍‌र्हिस स्टेशनमध्ये (प्रेशर वॉटर) पाण्याचा फवारा मारून पुढची काच अथवा डिकीच्या (हॅच बॅक) काचेमधून तसेच  दरवाजामधून पाणी गळत नाही ना याची खात्री करून घ्या. गाडीला बाहेरून सीएनजी किट लावलेले असल्यास डिकीचा पत्रा आवर्जून चेक करावा. सीएनजीच्या टाकीखाली (डिकीमध्ये) पत्रा क्रॅक असण्याची शक्यता असते.

क्लच :

शहरी भागात चालणाऱ्या गाडीचे क्लच प्लेटचे आयुष्य ३० ते ४० हजार किलोमीटर असते. क्लच तपासताना गाडी चढण असलेल्या रस्त्यावर नेऊन ट्रायल घ्यावी लागते.

टायर :

टायर चेक करताना त्याचे उत्पादन वर्ष आणि महिना आधी पाहून घ्यावे. टायरवर असणारी नक्षी तपासून घ्यावी. ३ वर्षांहून अधिक जुन्या टायर्सची कार्यक्षमता (रोड ग्रिप) खूप कमी झालेली असते. बारीक बारीक क्रॅक गेलेले असतात. टायरवर हवेचा फुगा आलेला असतो. टायरसंबंधी ट्रायल घेताना गाडी ३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने सरळ रस्त्यावर चालवून पाहावी. टायर खराब असल्यास गाडी चालताना ‘हालत’ असल्याचे जाणवते.

ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2017 1:04 am

Web Title: precautions to take when buying second hand car
Next Stories
1 टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय
2 कोणती कार घेऊ?
3 वाहनखरेदीतील डिस्काऊंट गमक!
Just Now!
X