अभिनेत्री सारिका
माझ्या कारकीर्दीतला नावाजलेला सिनेमा म्हणजे ‘गीत गाता चल’ १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हाही सिनेमा ‘राजश्री प्रॉडक्शन’चा होता. तेव्हा मी १५ वर्षांची होते, अबोध होते, नवखी होते. पण या सिनेमाने मला नाव मिळवून दिलं. माझ्यातल्या अभिनेत्रीला घडवलं. ‘गीत गाता चल’ सिनेमाचे दिग्दर्शक हिरेन नाग असले तरी सेटवर ‘राजश्री प्रॉडक्शन्स’चे संस्थापक ताराचंद बडजात्या आणि त्यांचे प्रॉडक्शन मॅनेजर गुप्ताजी कायम उपस्थित असत. सेटवर अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी, कलाकार-प्रॉडक्शन टीम यांचा आपसांतील समन्वय, कलाकारांचा परफॉर्मन्स अशा सगळ्या बाबींवर त्यांचं लक्ष असे. शूटिंग सुरू असताना कलाकारांचा एखादा शॉट संपला की ताराचंद बाबूजी त्यांना बोलावून घेत. अनेकदा त्यांनी बोलावलं की कलाकारांना धाकधूक वाटे. कारण त्यांचा वचक-दराराच तसा होता. एकदा त्यांनी मलाही बोलावून घेतलं आणि उत्तम सीन केल्याबद्दल चॉकलेट देत माझं कौतुक केलं, तर एकदा एका दृश्यात अनावश्यक हावभाव केले म्हणून रागावलेदेखील!

आणखी वाचा : अभियंता ते लेफ्टनंट गव्हर्नर…असा आहे अरुणा मिलर यांचा प्रवास

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
Meet Lisa Johnson woman who lost job got divorced now travels in private jet must read her Inspiring journey
नोकरी सुटली, मोडला संसार… लाखोंचं कर्ज असतानाही रचला इतिहास! पाहा कोट्यवधींची मालकीण लिसा जॉन्सनचा प्रवास
Delhi high court (1)
“हिंदू महिला मृत पतीच्या मालमत्तेचा उपभोग घेऊ शकते, पण…”, उच्च न्यायालयाने नोंदवलं महत्त्वाचं मत!

ताराचंद बाबूजींच्या तालमीत मी सेटवर अशी प्रथम घडले. त्यांना सिनेमांच्या तांत्रिक अंगाची, नैसर्गिक अभिनयाची जाण होती. कलाकारांचे कपडे, त्यांचा मेकअप कथेला आणि व्यक्तिरेखेला कसे अनुरूप असावेत, क्लोज शॉट, लॉन्ग शॉट, झूम शॉट कसे- केव्हा घ्यावेत, त्या वेळी अभिनय कसा करावा याची अगदी इत्थंभूत माहिती त्यांनी दिली. शिस्तीत, पण तरीही अत्यंत कौटुंबिक वातावरणात त्यांच्या फिल्मचं शूटिंग होत असे. करिअर आणि जीवनाची मूल्यं मी इथंच शिकले. गंमत म्हणजे पुढे २००१ मध्ये ‘हे राम’ या (कमल हसन निर्मित, दिग्दर्शित) चित्रपटासाठी केलेल्या ‘कॉस्चुम डिझायनिंग’साठी मला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला, अर्थात मी डिग्री किंवा कोर्स करून ट्रेण्ड फॅशन डिझायनर झाले नाही. बाल कलाकार ते आता ज्येष्ठ अभिनेत्री असा प्रवास करताना माझ्याकडे जे अनुभवांचे संचित ‘ऑन सेट’ मिळाले त्यातून मी शिकले.

आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!

मी पटापट सिनेमा स्वीकारत नाही. एखादं कथानक किंवा व्यक्तिरेखा आवडली तरच स्वीकारते, पण याचा अर्थ तो चित्रपट धो धो चालेल किंवा माझी भूमिका गाजेल, याची खात्री देता येत नाही. ‘क्लब ६०’ हा सिनेमा मी मोठ्या आवडीने आणि अगदी मनापासून केला. एक तर २०१३ मध्ये सीनियर सिटिझन्सना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट करणं तसं धाडसाचं होतं. त्यात फारुख शेख हा प्रत्यक्ष जीवनातही लोभसवाणा, दिलखुलास, बहुश्रुत व्यक्तिमत्त्व असलेला माणूस त्यात होता. त्याच्या सहवासात दगडदेखील आपल्या भावना व्यक्त करेल इतका खुशमिजाज! त्याच्यासाठी मी हा सिनेमा केला. नाही चालला सिनेमा. पण या सिनेमाने आणि फारुख शेखने माझ्यात वाचनाची आवड पुन्हा निर्माण केली.

आणखी वाचा : नातेसंबंध : हरवलेल्या बाबाची कहाणी

मनमिळावू फारुख दर दिवशी आदाब-नमस्ते असे मेसेज पाठवून दिवसाची सुरुवात आत्मीयतेने करत असे. मी फार बोलकी नाही, पण माझ्या मनाची दारं मी बंद करू नयेत, मी बोलावं- खुलावं- आमच्यात इंटरॲक्शन व्हावं असा त्याचा प्रामाणिक हेतू असे. त्याच्यासोबत या चित्रपटात काम करताना त्याची बहुश्रुतता माझ्या लक्षात आली. जगातील बहुतेक सर्व उत्कृष्ट साहित्य त्याने वाचलं होतं. फारुखमुळे मी पुन्हा एकदा वाचनाकडे वळले. त्याने मला अप्रत्यक्ष सुचवलं, जीवनातील एकटेपणा, मनातील साचलेपण पुस्तकंच दूर करतात. मी जेव्हा चेन्नईला (कमल हासनसोबत) स्थायिक झाले, मुली झाल्या, त्यानंतर अभिनय, वाचन सगळंच मागे पडलं होतं. फारुखने मला पुन्हा एकदा पुस्तकांच्या दुनियेत अलवारपणे आणून सोडलं. आता पुस्तकंच माझे सखे-सोबती झालेत. मी त्यांच्यात रमते! एकटेपणा जावा म्हणून सिनेमातच काम केलं पाहिजे ही भावनाच राहिलेली नाही, म्हणूनच सिनेमात काम करणंही कमी झालं! आवडतील तेच चित्रपट स्वीकारले. वाचन, सिनेमा पाहणं आणि डॉक्युमेंटरीज पाहणं माझा मोठा विरंगुळा ठरले आहेत.

आणखी वाचा : मासिक पाळी दरम्यान ‘या’ चुका टाळाच; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

त्याही पलीकडे करोनाकाळाने माझ्या आयुष्यात एक सरप्राईज आणलं. त्या दोन वर्षांत सुरुवातीलाच घरातील होती नव्हती ती सगळी पुस्तकं वाचून झाली. टीव्हीवरही फार काही नसायचं. खूप कंटाळा, नंतर निराशेचे मळभ दाटायला लागलं. पण त्याच वेळी अचानक मला वेगळा आनंद सापडला… किचनमध्ये मला एक रिकामी प्लास्टिक बाटली सापडली, मी त्याच्यावर रंगकाम केलं आणि त्याचा आकर्षक पेन स्टॅण्ड तयार केला. शीतपेयांचे रिकामे टीन्स घेऊन ते रिसायकल केले. नवीन कलाकृती तयार झाल्या. मग काय, या नवीन छंदाने मला इतकं आपलंसं केलं, की मी अनेक वस्तू तयार केल्या. मित्रमैत्रिणींना दाखवल्या. त्यांनी इतकं कौतुक केलं की कित्येकांनी विकतही घेतल्या. मला एक वेगळा कलात्मक आनंद ‘रिसायकलिंग’ने दिला. नवीन चित्रपटाचं, ‘उंचाई’ चं शूटिंग सुरू झालं आणि माझी ही नवी हॉबी बॅक सीटवर गेली. बघू आता पुन्हा कधी त्या छंदाकडे पुन्हा वळायला मिळतंय. त्याकडे वळेनच, कारण नवनिर्मितीचा आनंदच मोठा!

आणखी वाचा : त्वचा कोरडी पडते? अशी घ्या काळजी…

नुकताच माझा ‘उंचाई’ चित्रपट सर्वत्र रिलीज झाला. त्यापूर्वी ‘बार बार देखो’ (२०१६), ‘पुरानी जीन्स’ (२०१४) आणि ‘क्लब ६०’ (२०१३) रिलीज झाले होते. २०१६ नंतर थेट २०२२ मध्ये, सहा वर्षांच्या गॅपने मी पुन्हा एकदा सिनेमा करतेय, तोही महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आणि सूरज बडजात्या (राजश्री प्रॉडक्शन्स) यांच्या दिग्दर्शनाखाली,‘उंचाई’. एक वेगळा सिनेमा म्हणून मी तो स्वीकारला, प्रेक्षक त्याचा कसा स्वीकार करताहेत, हे पाहायचंय…
samant.pooja@gmail.com