प्राची पाठक
बघा बरं तुमच्या घरातल्या गाळण्या आणि ठरवा काय ते! हो, घरातल्या, खासकरून स्वयंपाक घरातल्या वस्तूंची साफसफाई, नेटकेपणा ही काही केवळ घरातल्या स्त्रियांची जबाबदारी नाही. स्त्री असो की पुरुष, सर्वांना स्वयंपाक घराची आवराआवर, स्वतःचं पोट भरण्याइतका स्वयंपाक हा त्याची आवड असो वा नसो, करता आलाच पाहिजे. ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे. पर्यावरण वाचवा वगैरे अनेक मुद्दे असे घरातूनच सुरू होतात. आपण किती साबण, पाणी, रसायनं साफसफाईसाठी वापरतो ते बघू. सहजच केलेल्या एखाद्या कृतीतून, बदललेल्या सवयीतून वस्तू दीर्घकाळ नेटक्या राहू शकतात, हे सर्वांनी शिकण्यासारखं आहेच. यालाच तर शाश्वत जीवनशैली म्हणतात. ती स्त्रियांची मक्तेदारी नाही. आपल्याच घरातल्या पुरुषांनादेखील याची जाणीव करून देणं, हे ही एक महत्त्वाचं काम आहेच.
घरोघरच्या चहाच्या गाळण्या बघितल्या की त्या घरातल्या मंडळींची स्वच्छता जोखायची एक चाचणी करता येईल! कोणाकडे प्लॅस्टिकच्या गाळण्या असतात, कोणाकडे स्टीलच्या जाळीच्या तर कोणाकडे पूर्वीच्या पितळीच्या गाळण्यादेखील असतात. प्लॅस्टिकच्या चहाच्या गाळण्या रस्त्यावर माल विकणाऱ्यांकडे दहा ते पन्नास रुपयांपर्यंत अगदी सहज मिळतात. ज्यांना स्टीलच्या जाळीचे छिद्र चहाचा बारीक चोथा नीट गाळायला सक्षम नाहीत, असं वाटतं आणि जास्त किंमत गाळणीसाठी देणं ज्यांना शक्य नाही, असे बरेच लोक या प्लॅस्टिकच्या गाळण्या वापरतात. प्लॅस्टिकच्या गाळणीवर गरम पदार्थ ओतायला नकोसं वाटणारे अनेक लोक असतात, ते स्टीलची गाळणी वापरणं पसंद करतात.
चहाच्या गाळणीत केवळ चहाच गाळला जाईल, असं नसतं. काहीही धुतल्यावर जास्तीचं पाणी काढून टाकायला ही गाळणी वापरली जाते. सरबत, ज्यूस, सूप गाळायलाही ती वापरली जाते. व्यवस्थित अशी धातूची चहाची नीटशी गाळणी महागात महाग जरी घेतली तरी तीस- पन्नास- शंभर रुपयांत मिळते. तरीही लोक चहाच्या गाळणीत इतकी कंजुसी करतात की देव जाणे? आपल्याच घरातल्या चहाच्या गाळण्यांचा एक सर्व्हे करू. काळपट पडलेल्या- जाळी प्लॅस्टिकची असो की स्टीलची, तिला छिद्रं पडलेल्या, तारेचे तुकडे बाहेर आलेल्या, वाकड्या, तिरप्या, अर्ध्या तुटक्या अशा गाळण्या लोक वापरत असतात. जे आजही फडक्याने चहा गाळतात, त्यांचे फडकी बघा किती कळकट, गलिच्छ असतात.
हेही वाचा… स्टेअरिंग हाती आलं, पण घुसमट थांबली नाही
गाळणी स्वच्छ करण्यासाठी ती गॅसवर जाळणे, हा अनेक घरी दुपारचा किंवा सुट्टीचा उद्योग असतो. बरं, चटकन जाळून बाजूला करतील, असं देखील नाही. गॅस सुरू ठेवून इतर कामं करत करत हे काम करतात. तोवर जाळ्या जास्त तापून अशाही खराबच होऊन जातात. गाळणी असते वीस, पन्नास रुपयांची. गॅसवर तापवत बसून त्याची घाण काढताना बारीक काळसर भुगा गॅसवर पडतो. त्याने गॅसचे बर्नर खराब होते, ते वेगळेच. त्यात सगळा आसमंत त्या घाणेरड्या वासाने भरून जातो. ते करण्यासाठी इतका गॅस वाया घालवतात की नवीन गाळणी त्या वेळात आणि पैशांत येईल. अत्यंत हलक्या प्लॅस्टिकच्या गाळण्या जेव्हा लोक वापरतात, तेव्हा त्यांचे रंगीत हँडल्स घाण झालेले असतात. तुटलेले असतात. अगदी गाळायचा भागच तेवढा उरलेला असतो- जो कपावर बसतदेखील नाही, धरून ठेवावा लागतो! गाळायचा असलेला नवीन गाळणीचा पांढरा स्वच्छ भाग तपकिरी-काळसर पडलेला असतो. तरी ते वापरत राहतात.
हेही वाचा… नातेसंबंध: ‘नो’ मीन्स ‘नो’ म्हणायलाच हवं…
चहाच्या गाळणीच्या नेटकेपणावरून माणसं जोखावी, इतका गचाळपणा सर्व स्तरातील लोक या विषयात करत असतात. चहा करून झाला की लगेच त्यातला गाळलेला चोथा वेगळा काढून ती विसळून घासायला टाकली तरी अनेक वर्षे ती तितकीच स्वच्छ राहते. अधूनमधून एखाद्या टूथब्रशने घासून त्यातले काळे डाग/ कण निघून जातात. फारच काळसर असेल तर गरम पाण्यात खायचा सोडा, व्हिनेगर असं मिश्रण करून त्यात जरावेळ गाळण्या, चिमटे वगैरे भिजवून स्वच्छ निघू शकतात. मुख्य म्हणजे, वापर झाला की लगेचच त्यातला चोथा बाजूला करून कमीत कमी पाण्यात विसळल्याने गाळण्या भरपूर टिकतात आणि स्वच्छ राहतात. घरात भांडी घासायला मदतनीस असतील तरी त्यांनासुद्धा गाळण्या घासायला टाकताना त्यातला चोथा बाजूला करून त्या घासायला देणं, ताट-वाट्यांमधलं खरकटं वेळीच बाजूला करून मग ते दुसऱ्याला आवरायला देणं, हा मूलभूत सेन्स आहे. त्याने त्यांचं काम तर सुकर होतंच. परंतु तुमच्या घरातल्या वस्तूदेखील स्वच्छ राहतात आणि भरपूर टिकतात. कमीतकमी साबण, रसायनं आणि पाणी वापरून चकचकीत दिसतात.
हेही वाचा… ‘ब्लॅक फेमिनिझम’ म्हणजे काय ? ‘एफजीएम’च्या घटना आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर का घडतात ?
बघा बरं तुमच्या घरातल्या गाळण्या आणि ठरवा काय ते! हो, घरातल्या, खासकरून स्वयंपाक घरातल्या वस्तूंची साफसफाई, नेटकेपणा ही काही केवळ घरातल्या स्त्रियांची जबाबदारी नाही. स्त्री असो की पुरुष, सर्वांना स्वयंपाक घराची आवराआवर, स्वतःचं पोट भरण्याइतका स्वयंपाक हा त्याची आवड असो वा नसो, करता आलाच पाहिजे. ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे. पर्यावरण वाचवा वगैरे अनेक मुद्दे असे घरातूनच सुरू होतात. आपण किती साबण, पाणी, रसायनं साफसफाईसाठी वापरतो ते बघू. सहजच केलेल्या एखाद्या कृतीतून, बदललेल्या सवयीतून वस्तू दीर्घकाळ नेटक्या राहू शकतात, हे सर्वांनी शिकण्यासारखं आहेच. यालाच तर शाश्वत जीवनशैली म्हणतात. ती स्त्रियांची मक्तेदारी नाही. आपल्याच घरातल्या पुरुषांनादेखील याची जाणीव करून देणं, हे ही एक महत्त्वाचं काम आहेच. एक चहाची गाळणी जेंडर रोल्सपासून ते शाश्वत विकास इथपर्यंत भूमिका निभावू शकते. आहे की नाही गंमत?
prachi333@hotmail.com