दिल्लीतील स्वाती मालिवाल प्रकरण गेल्या काही दिवासंपासून प्रचंड गाजतंय. दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्यावर १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे सहायक बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर स्वाती मालिवाल यांनी तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वाती मालिवाल यांच्यावरही आरोप होत आहेत. भाजपाला हाताशी धरून स्वाती मालिवाल आपची प्रतिमा खराब करू पाहत आहेत, असा आरोप आपकडून केला जातोय. यावर स्वाती मालिवाल यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी निर्भया प्रकरणाचाही उल्लेख केला. त्या एएनआय या वृत्तासंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

काही वर्षांपूर्वी दिल्लीतच निर्भया बलात्कार प्रकरण झालं. दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरू झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. याच प्रकरणाचा स्वाती मालिवाल यांनी आता दाखला दिला आहे.

हेही वाचा >> जाणून घ्या काय आहे निर्भया प्रकरण ?

व्हिक्टिम शेमिंग प्रत्येकीबरोबर होतं

स्वाती मालिवाल म्हणाल्या, “मी निर्भयाच्या आईला भेटले होते. त्या मला म्हणाल्या होत्या की बरं झालं की माझी मुलगी आता या जगात नाहीय. न्याय मिळण्याचा संघर्ष तरी तिला पाहावा लागत नाहीय. निर्भयालाही विचारलं गेलं होतं की तू रिक्षाने का गेली नाहीस? बसने का गेली? दिवसा का गेली नाहीस? रात्री का गेलीस? तो मुलगा कोण होता? अशा पद्धतीने पीडित शेमिंगची (Victim Shaming) गोष्ट प्रत्येक मुलीबरोबर होते.

यावेळी स्वाती मालिवाल यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचंही खंडन केलं आहे. त्या म्हणाल्या की, “आता काहींचे प्रश्न असे आहेत की मी सीसीटव्ही फुटेजमध्ये सरळ चालतेय. एडीटेड व्हिडीओमध्ये आरामात बसले आहे. तुमच्याबरोबर जेव्हा मारहाण होते तेव्हा आपण प्रत्युत्तर करतोच. तुम्हाला कोणी गोळी मारली तर तुम्ही जीव वाचवण्याकरता धावायचा प्रयत्न करताच.”

“माध्यमातून येणाऱ्या वृत्तांनुसार पोलीस अजूनही मूळ सीसीटीव्ही फुटेजपर्यंत पोहोचलेच नाहीत. जखम ताजी असते तेव्हा माणूस धावून सुद्धा जातो आणि फ्रॅक्चर झाला तरीही तो धावतो. ती जखम शांत होते तेव्हा दुखणं वाढतं. यापेक्षा वाईट व्हिक्टिम शेमिंग दुसरं काय असू शकतं? दिल्लीच्या एक महिला मंत्री म्हणाल्या की (मारहाणीत) माझे कपडे फाटलेच नव्हते, हिचं डोकंही फुटलं नाही. याचीच कमी राहिली होती. मी एफआयआरमध्ये म्हटलंच नाही की माझे कपडे फाटले किंवा माझ्या डोक्यावर मार लागला. माझ्याबरोबर जे झालं तेच मी एफआयआरमध्ये म्हटलंय”, असंही त्या म्हणाल्या.

“ज्या मुलीने कायम इतर मुलींना लढण्यासाठी बळ दिलं तिलाच सर्वांसमोर खोटं पाडण्यात आलं आहे. मग अशा आरोपांखाली मी कशी जगू”, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्वाती मालिवाल हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. याची न्यायालयीन चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्यता समोर येईल. पण व्हिक्टिम शेमिंगचा हा प्रकार आपल्याकडे नवा नाही. याआधीही अनेक प्रकरणात पीडितेलाच उलटसुटल प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.