– डॉ. जिनल पटेल. आहारतज्ज्ञ

नवरात्रोत्सवात अनेक घरांमध्ये घट बसतात, देवींचे आगमन होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक भक्तगण भक्तीभावाने उपवास करतात. उपवास करताना काही चूक झाल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या उपवासाचे काही फायदे व तोटे देखील आहेत.

उपवास केल्याने आपले शरीर डिटॉक्स होते मात्र उपवासा दरम्यान जर आपण निष्काळजीपणा केला तर मात्र प्रकृती ढासळू शकते.
योग्य पध्दतीने उपवास न केल्यास असे होतात दुष्परिणाम

  • उपवासादरम्यान फलाआहार करताना काहीवेळा आपण खूप गोड पदार्थ किंवा फळं खातो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
  • उपवासात पुरेसे पाणी प्यायले नाही तर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
  • या दिवसांत रिकाम्या पोटी झोपत असाल तर झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला डोकेदुखी आणि तणाव जाणवू शकतो.
  • अनेकदा उपवासाच्या नावाखाली आपण जास्त खाऊन घेतो, ज्यामुळे जास्त कॅलरीमुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.
  • उपवासात अनेकदा आपण खूप कमी पाणी पितो, त्याचा मूत्रपिंडावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन) होऊ शकतात. या समस्येपासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी प्यायला हवे, जेणेकरून शरीरात कॅल्शियम साचणार नाही.
  • उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) असलेल्या लोकांना उपवासामुळे काही त्रास होऊ शकतात. जसे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा घटणे, तसेच रक्तदाब जास्त किंवा कमी होणे.
  • उपवासादरम्यान बराच वेळ काहीही न खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवू शकताे. विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार आहेत, त्यांच्यात रक्तशर्करेत चढउतार होऊ शकतात. काही वेळा हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखर कमी होण्याचा धोकादेखील निर्माण होतो.
  • उपवास सोडताना तळकट, मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येतो. गॅस, ॲसिडिटी, अपचन अशा तक्रारी सामान्य होतात. पाणी कमी प्यायल्यास डिहायड्रेशन होऊन डोकेदुखी, चक्कर येणे व तोंड कोरडे पडणे यँसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • सतत हलकाच आहार घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वांचा पुरवठा होत नाही. प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता भासू शकते. याचा दीर्घकाळ परिणाम झाल्यास अशक्तपणा वाढतो. त्याचप्रमाणे, उपाशी राहिल्यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा, अस्वस्थता जाणवू शकते.

त्यामुळे उपवास करताना कुठलाही अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. उपाशी न राहता वेळेवर पचनास हलके, पण पौष्टिक पदार्थ खाणे, पुरेसे पाणी पिणे, तसेच तळकट आणि गोड पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. विशेषत: ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा.

थोडक्यात, नवरात्रीचा उपवास हा श्रद्धा आणि आत्मशिस्त यांचे प्रतीक असला तरी, तो योग्य पद्धतीने न केल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संयम, संतुलित आहार आणि पुरेशी काळजी घेतल्यास उपवासाचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

हेही वाचा

आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी या टिप्सचे पालन करा

– नवरात्रीच्या दिवसामध्ये ताज्या फळांचे सेवन करा. फळांमध्ये नैसर्गिक पाणी असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
– दिवसभरात भरपुर पाणी प्या. उपवासात नारळाचे पाणी, लिंबू पाणी, ताक अथवा काकडीचे सेवन करत राहा.
– बद्धकोष्ठतेपासून सुटका करून घेण्यासाठी दह्याचा उपयोग करा.
– जेवणाची आणि झोपण्याची वेळ निश्चित करून घ्या व त्या वेळेचे पालन करा.
– उपवास सोडल्यानंतर अचानक जड आणि तळकट अन्न खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस, ॲसिडिटी होऊ शकते.
– चक्कर येणे, थकवा, जास्त अशक्तपणा जाणवल्यास खुप कडक उपवास करणे टाळा.