फोर मोअर शॉट्स या वेबसिरीजच्या तिसऱ्या पर्वाची सुरूवात दोन वर्षानंतर झाली आहे. त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा मानवी गाग्रु, सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी आणि बानी साकारत आहेत. रोंगीता नंदीची ब्रेन चाईल्ड असलेल्या या सिरीजमध्ये चारही स्त्रिया आपापल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोंधळ, अशांतता यांना कशा सामोऱ्या जातात, याची झलक पहायला मिळते. तथ्य कथन आणि संबंधित व्यक्तिरेखांविषयी सांगताना संपूर्ण सिरीजमध्ये सेक्सचा अतिरेक दाखवल्याबद्दल अनेकांनी भुवया उंचावलेल्या आहेत. गेल्या दोन सिझनमध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा तसंच जोडीदारासोबत झालेले विसंवाद आणि त्यांच्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने या व्यक्तिरेखा बोलल्या आणि लोकप्रिय झाल्या.

आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!

‘इंडियन एक्स्प्रेस’शी या शोविषयी गप्पा मारण्यासाठी सिरीजच्या प्रमुख व्यक्तिरेखा आलेल्या असताना त्यांच्यासमोर शोबद्दल होणाऱ्या ट्रोलचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना कीर्ती कुल्हारी म्हणाली, की या शोमध्ये सेक्स आहे, हे खरं आहे. मात्र सगळ्या जगातच सेक्सचं प्रमाण हे अति आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. बाहेरच्या जगात जे आधीपासूनच आहे ते भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात प्रातिनिधिक स्वरूपात दिसतं, इतकंच. प्रत्येकाला प्रेक्षकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, याच नजरेतून आम्ही सगळ्या जणी ट्रोल करणं किंवा टीका करण्याकडे पाहातो. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं आम्ही स्वागतच करतो, असंही ती म्हणाली.

आणखी वाचा : Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

मुळातच सेक्स हा इथे कळीचा मुद्दा नाहीच. मुद्दा हा आहे की, यासाठी स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचा आणि आपल्या लैंगिकतेविषी उघडपणे बोलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे हा शो वेगळा आहे. शिवाय, याविषयावर सिनेमात काहीच कधी बोललं जात नाही. इतकंच कशाला, प्रत्यक्षात किती लोक मोकळेपणाने आपला लैंगिक प्राधान्यक्रम किंवा ऑरगॅझमबद्दल बोलतात. आयुष्यात कधीच ऑरगॅझम अनुभवलेला नाही अशा स्त्रियांची टक्केवारी ऐकून कदाचित तुम्हांलाही धक्का बसेल. सेक्स आणि स्त्रियांनी याविषयी उघडपणे न बोलणं याला रूढीप्रिय मानसिकता कारणीभूत आहे. असं बोलणं म्हणजे असभ्य लक्षण समजलं जातं, असं सयानी गुप्ता हिचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध : मैत्री… लग्नापूर्वी आणि नंतरची

सयानीच्या म्हणण्याला दुजोरा देत कीर्ती म्हणते, की इंडस्ट्रीमध्ये किंवा सर्वसाधारणपणे लैंगिकतेचा वापर उपरोधिकतेने, प्रवृत्त करण्यासाठी वगैरे केला जातो. पुरूषांच्याबाबतीत बोलताना हा मुद्दा कधीच चर्चेत येतच नाही किंवा शिताफीने टाळला तरी जातो. स्त्रियांच्यासंदर्भात तर तो उपस्थितच होत नाही.

आणखी वाचा : Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा

या वेबसिरीजमध्ये समलैंगिक असलेल्या उमंगची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रसिद्ध व्हीजे बानीनेही या यासंदर्भात मतं मांडली. सद्य घडामोडींबद्दल स्पष्टपणे बोलणाऱ्या महिलांची मतं आपल्या पुरूषप्रधान समाजाला रूचणारी नाहीत. स्त्रियांना कोणाशी आणि कुठे लैंगिक संबंध ठेवायचे आहेत आणि त्यांना काय हवे आहे, याबद्दल त्यांनी बोलणं तसंच महिलांनी हाती अधिकार घेणं आणि शॉटस् घेणं हेच त्यांना खटकतं. स्त्रियांनी अशाप्रकारे स्वतःबद्दल ठाम असणं याची पुरूषांना सवय नाही. पुरूषांना त्यांची इच्छा असतानाही स्त्रियांकडून नकार ऐकावा लागावा, इथेच खरी मेख आहे. परंतु बानीच्या मते स्त्रियांकडेही मतं, प्राधान्यक्रम आणि उपाय आहेत. आम्हांला स्वीकाराचा आणि नकाराचा अधिकार आहे. आमचीही मतं असल्यामुळे ती तुम्ही ऐकून घ्यायला हवीत. आमची दखल घेतली जाणं आणि आमचा आवाज ऐकला जाणं आवश्यक आहे.

आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर मोअर शॉट्स या सिरीजविषयी येणाऱ्या महिलांच्या प्रतिसादाबद्दल मानवी गाग्रु हिने आपला अनुभव सांगताना म्हटलं, की वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना जोडणारा हा शो बऱ्याचजणींना आवडतो. पहिल्या सिझनदरम्यान चांगला शो पहायला मिळत असल्याची कुजबूज होती. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये आपापल्या नवऱ्यांना या शोविषयी काय वाटतं याची पर्वा न करता स्त्रिया आपली मतं उघडपणे मांडायला लागलेल्या होत्या. आता तर तिसऱ्या पर्वाची त्या आतुरतेने वाट पहात असल्याचं आम्हांला कळतं आहे. त्या त्यांच्या कल्पनेतील आयुष्य आमच्या शोच्या माध्यमातून जगू पहात आहेत. असं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य तरी त्यांना नाही किंवा मग शोमध्ये दाखवलेल्या व्यक्तिरेखांच्या वयात तरी त्यांनी असं जीवन अनुभवलेलं नाही, असं त्यांना वाटतं. त्यामुळे हा शो लैंगिकता, सेक्स याहीपलिकडे बरंच काही सांगू पहातो, असं मानवी ठामपणे सांगते.