International Women’s day 2024: महिला या आजच्या असोत की भूतकाळातल्या, क्षेत्र कुठलेही असो, त्यांनी नेहमीच आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख सिद्ध केली आहे. महिलांनी गाजवलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे राजकारण. सध्या पुरुषप्रधान राजकारणात महिलांचे स्थान थोडे मागेच असल्याचे दिसते. तरीही काही स्त्रियांनी आपल्या जिद्दीने याच क्षेत्रात, याच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत आपले नाव इतिहासात अमर केले; त्या यादीत ज्या स्त्रीचे नाव सर्वप्रथम येते ती म्हणजे नागनिका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या राजवंशाने सर्वात आधी राज्य स्थापन केले ते राजघराणे म्हणजे सातवाहन होय. सातवाहन राजांनी आपल्या पराक्रमाने भारताच्या इतिहासात स्वतःची ओळख निर्माण केली. सातवाहनांचे राज्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश अशा मोठ्या भागावर पसरलेले होते. या काळात या घराण्याची सत्ता भारताच्या पश्चिम व पूर्व अशा दोन्ही किनारपट्टींवर होती. भारताच्या या किनारपट्टीवरूनच समुद्रमार्गे रोम व इतर देशांशी व्यापार सुरू होता. किंबहुना रोमन तथा इतर परदेशी प्रवासी आपल्या प्रवासवर्णनात सातवाहन राजवटीच्या समृद्धीचा गुणगौरव करताना दिसतात. त्यामुळेच महाराष्ट्राचा इतिहास या वंशाच्या इतिहासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

आणखी वाचा जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

प्राचीन भारतात अनेक स्त्रियांनी मोलाची कामगिरी केली, त्यात प्रथमस्थानी येते ती राणी नागनिका. नागनिका ही सातवाहन राजा सातकर्णी याची पत्नी होती, तर इतिहासातील प्रसिद्ध अशा वेदिश्री सातकर्णी याची माता. वेदिश्री सातकर्णी याच्या शिलालेखांमध्ये तिचा उल्लेख आवर्जून येतो. परंतु, राणी नागनिकेची ओळख इतकीच मर्यादित नाही. भारतीय इतिहासात ज्या काही मोजक्या स्त्रियांनी राजकारणासारख्या जटिल क्षेत्रात यशस्वी कामगिरी बजावली त्यांच्या यादीत ती अग्रेसर ठरते. नाणेघाट परिसरात असलेल्या लेणींमध्ये तिच्या पुत्राने दक्षिणापथपती (प्राचीन भारत दोन भागांत विभागला गेला होता; एक उत्तरापथ तर दुसरा दक्षिणापथ. नागनिकापुत्र वेदिश्री याच्या पुराभिलेखांमध्ये त्याचा गौरव हा दक्षिणापथपति म्हणून येतो. याचाच अर्थ संपूर्ण दक्षिण पथावर त्याचे राज्य होते) वेदिश्री याने कोरून घेतलेला शिलालेख आढळतो. या लेखाशिवाय सातवाहन राजवंशाविषयी माहिती देणारे अनेक लेख तेथे आहेत. आज जरी ते भग्नावस्थेत असले तरी समृद्ध अशा सातवाहन काळाविषयी मुबलक अशी माहिती देतात. या लेखांमुळे नागनिका किंवा नायनिका ही प्रथम सातवाहन राजा सातकर्णी याची पत्नी होती ही माहिती मिळते. तसेच नाणेघाटात दगडात कोरलेल्या सातवाहनकालीन शिल्पकृती आहेत. त्यात राजा सातकर्णी व राणी नागनिका यांचाही समावेश आहे. शिल्पकृतींच्या खाली ब्राह्मी लिपीत त्यांची नावे कोरलेली आहेत. राजा सातकर्णी याचे अकाली निधन झाल्यामुळे आपल्या मुलाला गादीवर बसवून राणी नागनिकेने राज्यकारभार चालविला. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात जवळपास २००० वर्षांपूर्वी एका मऱ्हाटी कन्येने आपल्या कर्तृत्वाने ४०० वर्षे चालणाऱ्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती, हे विलक्षण सत्य आज जागतिक महिला दिन साजरा करताना विसरून चालणार नाही.

आणखी वाचा जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

वेदिश्री याने कोरून घेतलेल्या लेखावरून नागनिकेच्या माहेरच्या वंशाविषयी माहिती मिळते. या लेखात नमूद केल्याप्रमाणे नागनिका ही अंगियकुलवर्धन कललायनामक महारथीची (संस्कृत)/ महारठीची (प्राकृत) कन्या होती. तर सातकर्णीची पत्नी व संपूर्ण दक्षिणापथावर राज्य करणाऱ्या वेदिश्री राजाची व श्रीमान सती (संस्कृत-शक्ती) याची माता होती. इथे विशेष लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, मराठी हा शब्द महारठी या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजेच मराठी भाषेला, तसेच भूमीला गेल्या हजारो वर्षांचा इतिहास आहे हे येथे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.अभ्यासकांनी नमूद केल्याप्रमाणे ‘निका’ हा शब्द त्या काळात स्त्रियांसाठी वापरला जात होता. त्यामुळे नागनिका राणी ही नागवंशीय असल्याची शक्यता वर्तवली जाते. पुरातत्त्वीय तसेच ऐतिहासिक अभ्यासाअंती महाराष्ट्राचे मूळ रहिवासी हे नागवंशीय असल्याचे काही अभ्यासक मानतात. महारथी हे सातवाहनांचे मांडलिक मानले जातात. सातवाहनांच्या राज्य स्थापनेपूर्वीपासून महारथींची सत्ता येथे असल्याचे कळते. सातवाहन वंशाने साम्राज्याच्या बळकटीसाठी महारथींसोबत रोटी-बेटी व्यवहार केला व यातूनच नागनिका व सातकर्णी यांचा विवाह झाल्याचे लक्षात येते. नागनिकेची महती सांगणाऱ्या अभिलेखात तिचा साध्वी म्हणून उल्लेख आढळतो. सातकर्णीच्या मृत्यूनंतरही तिने एका तपस्व्याप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत केले. किंबहुना राजा सातकर्णीसोबत तसेच स्वतंत्रपणेही अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्यात प्रमुख्याने राजसूय व अश्वमेध यज्ञांचा समावेश होतो. उपलब्ध असलेल्या पुराव्यांनुसार भारतीय इतिहासात स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी ती पहिली किंवा आद्य राणी होती.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International womens day the first marathi queen naganika minted coins in her own name 2000 years ago in indian history svs
First published on: 08-03-2023 at 14:41 IST