प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आवर्जून सापडणारे लिंबू फळ होय. लिंबू स्वादाने आंबट असूनही बहुगुणी व उपयोगी फळ आहे. मराठीमध्ये ‘लिंबू’, हिंदीमध्ये ‘निंबू’, संस्कृतमध्ये ‘निम्बुक’, इंग्रजीमध्ये ‘लाईम’, शास्त्रीय भाषेत ‘सायट्स असिडा’ (Citrus Acida) या नावाने प्रसिद्ध असलेले लिंबू ‘रुटेसी कुळातील आहे. गोलाकार आणि अंडाकृती या दोन प्रकारांत लिंबाची फळे पाहावयास मिळतात.

भारतामध्ये लिंबाची लागवड सर्व प्रदेशांमध्ये केली जाते. लिंबाचा रस रुचकर व पाचक असल्याने आमटी, भाजी, लोणचे, सरबत, मुरांबा अशा विविध आहारीय पदार्थांसाठी त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्येही अनेक औषधे निर्माण करताना लिंबाचा वापर करतात. लिंबाचे झाड उंच असून, या झाडाला वाकड्या तिकड्या घनदाट काटेरी फांद्या फुटतात, याची पाने आकाराने गोल असून, त्यांना लिंबासारखाच वास येतो. त्याची फुले पांढरी व सुगंधी असतात. कच्च्या लिंबाचा रंग हिरवा व पिकलेल्या लिंबाचा रंग पिवळा असतो. लिंबाचे कागदी, जंभेरी, संत्री, साधे, सरबती, इडलिंबू असे प्रमुख प्रकार आढळतात. आपण आहारामध्ये सहसा कागदी लिंबाचाच वापर करतो.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : लिंबू दीपक, पाचक, हृदय, रक्तपित्तशामक, ज्वरहारक व मूत्रजनन आहे. लिंबाची साल दीपक असून, पोटातील वायू दूर करणारी आहे. याच्या सालीमधून तेलही काढता येते. लिंबाच्या नैसर्गिक आंबटपणामुळे रक्त शुद्ध करण्याचे कार्य होते.

हेही वाचा – आहारवेद: औषधी गुणांचा हिंग

आधुनिक शास्त्रानुसार लिंबामध्ये प्रथिने, मेद, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम, ‘क’, ‘बी-६’ जीवनसत्त्वे ही पोषक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१. लिंबाच्या आंबट गुणधर्मामुळे ते जंतुनाशक, रुचिवर्धक व पचनशक्ती वाढविण्याचे कार्य करते.

२. लिंबू सेवन केल्याने तोंडास रुची निर्माण होऊन भूक चांगली लागते.

३. लिंबूरसामध्ये सायट्रिक आम्ल असल्यामुळे त्याच्या सेवनाने पोटातील रोगजंतू नाहीसे होतात.

४. लिंबू चवीने आंबट व खारट असले, तरी त्याच्या सेवनानंतर त्याचे रूपांतर क्षारामध्ये होते. त्यामुळे
रक्तामध्ये मिसळलेले विषारी आम्लतत्त्व नाहीसे करून रक्त शुद्ध करण्याचे कार्य ते करते.

५. मुखदुर्गंधी जाणवत असेल, तर गुलाबपाण्यात लिंबाचा रस टाकून गुळण्या कराव्यात. अशा गुळण्या केल्याने मुखदुर्गंधी तर दूर होतेच, पण त्याशिवाय हिरड्या बळकटसुद्धा होतात.

६. रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून घेतल्यास शरीरातील सर्व विषद्रव्यांचा निचरा होऊन शौचास साफ होते व वजनदेखील आटोक्यात राहते.

७. अन्नपचन सुरळीत होण्यासाठी जेवताना पाणी घ्यावयाचे असल्यास लिंबूरसमिश्रित पाणी घोट घोट प्यावे.

हेही वाचा – आहारवेद: सांधेदुखीसाठी आरामदायी मोहरी

८. फ्रीजमधील भाजीपाला ताजा व हिरवागार ठेवण्यासाठी त्यावर लिंबूरस शिपडावा.

९. केळी व सफरचंद चिरल्यावर जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी त्यावर दोन थेंब लिंबाचा रस टाकावा किंवा लिंबू त्यावर चोळावे. म्हणजे त्या फोडी काळ्या पडणार नाहीत.

१०. लिंबूरस वापरल्यानंतर त्याच्या साली सुकवून दळून ठेवाव्यात व शिकेकाईसोबत त्या सालींचे चूर्ण केस धुण्यासाठी वापरल्यास केसांमधील कोंडा नाहीसा होतो.

११. सौंदर्य वाढविण्यासाठीही लिंबाचा उपयोग होतो. लिंबाचा रस, चंदनाचे सूक्ष्म चूर्ण आणि दही एकत्रित करून लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन मुरुमे नाहीशी होतात.

१२. चेहऱ्याच्या नैसर्गिक ब्लीचिंगसाठी अर्धी वाटी थंड दुधामध्ये दोन चमचे लिंबूरस टाकून या मिश्रणामध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याच्या साहाय्याने चेहरा साफ करावा. याने काळवंडलेला चेहरा, मान स्वच्छ होऊन तजेलता दिसून येते.

१३. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी व चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबूरस, दूध व मध हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.

१४. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून लिंबूरस व खडीसाखर किंवा गूळ यांचे सरबत करून प्यावे.

१५. उपयोगात आणलेल्या लिंबाच्या साली उकळून त्याने काचेची, पितळेची, तांब्याची भांडी घासल्यास ती स्वच्छ निघतात.

१६. बिन दुधाच्या कोऱ्या चहामध्ये लिंबूरस टाकून तो प्यायल्यास डोकेदुखी त्वरित थांबते.

१७. आवळा पावडर, पुदिना, तुळस, आले, गूळ व लिंबूरस यांचा आयुर्वेदिक चहा करून प्यायल्याने पचनशक्ती वाढून शरीर व मन उत्साही होते.

हेही वाचा – आहारवेद: खोकल्यावर गुणकारी मिरे

सावधानता :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबूरस हा प्रमाणातच सेवन करावा. जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त वाढून डोकेदुखी, उलटी, मळमळ हा त्रास उद्भवू शकतो. पित्तप्रकृती असलेल्या व्यक्तींनी सहसा लिंबूरस घेणे टाळावे. लिंबाऐवजी पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी आवळ्याचा वापर करावा.