सरकारी योजना, विशेष मदत असं सगळं असलं तरीही योगेश्वरीचे प्रचंड कष्ट, चिकाटी आणि जिद्द ही तिची खरी शस्त्रं होती. त्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिनं अवकाशात उडण्यासाठीचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्याची हिंमतही दाखवली.
‘ मूर्ती लहान पण कीर्ती महान’, हे तामिळनाडूच्या योगेश्वरीबद्दल अगदी खरं आहे. तिच्या उंचीमुळे तिला आणि तिच्या आईवडिलांना आतापर्यंत अनेकांचे असंख्य टोमणे ऐकायला लागले होते. पण तिला मिळालेल्या यशामुळे त्या सगळ्यांची तोंडं तर बंद झालीच, पण तिच्या आईवडिलांची मानही अभिमानाने उंचावली आहे. योगेश्वरीची कामगिरीच तशी आहे. योगेश्वरीने JEE ची advanced पहिल्याच प्रयत्नात पास करून थेट IIT पवई, मुंबईत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं खासगी कोचिंग न लावता योगेश्वरीनं हे यश मिळवलं आहे.
तामिळनाडूच्या विरुधनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात योगेश्वरीचं घर आहे. तिचे वडील एका चहाच्या दुकानात काम करतात तर आई फटाक्यांच्या फॅक्टरीत रोजंदारीने कामाला जाते. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अत्यंत गुणी योगेश्वरीची उंची खूप कमी म्हणजे फक्त तीन फूट आहे. त्यावरून तिला आतापर्यंत खूप त्रासही सहन करावा लागला आहे. पण तिच्या यशाच्या वाटेत तिची परिस्थिती किंवा तिची उंची हे काहीही आड आलं नाही.
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थिनी असलेल्या योगेश्वरीसाठी JEE पास होण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यात तिचं शालेय शिक्षण तामिळ भाषेतून झालं आहे. त्यामुळे सुरुवातीला तिला प्रत्येक गोष्ट समजणं अवघड गेलं. पण प्रचंड मेहनत आणि जिद्द, चिकाटीने तिनं हे यश खेचून आणलं आहे. विशेष म्हणजे योगेश्वरीला विज्ञान विषय आवडायचा. पण आठवीपर्यंत IIT किंवा JEE बद्दल तिला माहितीही नव्हती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर केलेल्या ‘नान मुधवलन’ आणि ‘कल्लूरी कनवु’ या दोन योजनांच्या सत्रात ती सहभागी झाली. त्याच विशेष शिबिरात तिला आयआयटीबद्दल माहिती समजली. IIT मध्ये जाण्यासाठी JEE – Mains आणि Advanced परीक्षा द्याव्या लागतात हे तिला समजल्यावर तिनं त्याची जोरदार तयारी सुरू केली बारावीनंतर ही परीक्षा द्यावी लागते. योगेश्वरीनं त्यासाठी जीव तोडून मेहनत केली आणि त्याचं फळही तिला मिळालं. ती सरकारनं आयोजित केलेल्या JEE- Advanced कोचिंग शिबिरात सहभागी झाली होती. या ४० दिवसांच्या शिबिराने तिचे आयुष्यच बदलले. त्यातून तिला नेमका अभ्यास कसा करायचा याची दिशा मिळाली. विरुधनगरचे जिल्हा कलेक्टर व्ही.पी. जयसीलन यांचेही तिला IIT मधल्या प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.
“ मला अगदी सातवीत असल्यापासून विज्ञानात विशेष गोडी वाटायला लागली होती. पण तेव्हा मी डॉक्टर होण्याचा विचार करत होते. बारावीत असताना मला शिबिरातून एरोस्पेस इंजिनिअरिंगबदद्ल समजलं. मी IIT मध्ये जायच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली,” असं योगेश्वरीनं सांगितलं. तिनं जिद्दीनं प्रत्येक अडचणीवर मात केली. प्रत्येक गोष्ट समजून घेतली.
योगेश्वरीला शिकण्याची खूप आवड आहे. पण ती शाळेत कधीच अगदी पहिली वगैरे आली नव्हती. उलट तिला बारावीत ४५० पेक्षाही कमी गुण मिळाले म्हणून तिच्या आईचा ओरडाही खावा लागला होता. योगेश्वरीचा एक भाऊ बीकॉम करत आहे, तर दुसरा शारीरिक शिक्षण विषयात पदवी घेत आहे. आपल्या दोन्ही भावांकडे बघून आपल्याला काहीतरी मोठं करायची प्रेरणा मिळाली असं योगेश्वरीने सांगितलं. बारावीत कमी मार्क पडले तरीही योगेश्वरीनं JEE त उत्तम कामगिरी करण्याचं आव्हान स्वत:साठी ठेवलं होतं, जे तिनं जिद्दीनं पूर्ण केलं. तिचा निकाल हाती आला तेव्हा आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि तिच्या रागाचं रुपांतर अभिमानात झालं होतं. ‘नान मुधवलन’ योजनेअंतर्गत तामिळनाडू राज्यातून JEE (Advanced) च्या विशेष कोचिंगसाठी एकूण २३०जणांची निवड झाली होती. त्यातील एक योगेश्वरी आहे. तिला ‘कॉफी वुईथ कलेक्टर’ सारख्या कार्यक्रमामध्येही ती सहभागी झाली. त्याचाही आपल्याला खूप फायदा झाल्याचं योगेश्वरी सांगते. सरकारी शाळांमधील मुलांसाठी तामिळनाडू सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे आपल्या स्वप्नांना पंख मिळाले आणि जिल्हाधिकारी जयसीलन यांच्यामुळे त्याला बळ मिळालं असं योगेश्वरीचं म्हणणं आहे. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्नं मोठी बघितली पाहिजे असं प्रोत्साहन जयसीलन यांनी विद्यार्थ्यांना दिली. योगेश्वरीला IIT-JEE ची तयारी करण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहन दिलं.
सरकारी योजना, विशेष मदत असं सगळं असलं तरीही योगेश्वरीचे प्रचंड कष्ट, चिकाटी आणि जिद्द ही तिची खरी शस्त्रं होती. त्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिनं अवकाशात उडण्यासाठीचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्याची हिंमतही दाखवली. योगेश्वरीच्या स्वप्नपूर्तीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे, आता तिला एरोस्पेस तंत्रज्ञानात तिच्या आदर्श कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्ससारखी आकाशात उंच भरारी घ्यायची आहे.