डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
मणिपूर चक्रामध्ये असलेल्या चंद्रघंट या देवीस्वरूपाचे पूजन नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी केले जाते. देवीकवचातील चंद्रघंटा या नावाची दखल संस्कृतमधल्या कोशांनीही घेतलेली नाही. परंतु जनमानसामध्ये मात्र ही परिचित आहे. तिचा सध्या प्रसिद्ध असलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे –
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युतात।
प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता।
(आपल्याच शरीरापासून उत्पन्न झालेल्या श्रेष्ठ प्राण्यांवर आरूढ झालेली, भयंकर रागीट असलेली, अनेक शस्त्रास्त्रे हातात धारण करणारी चंद्रघंटा या नावाने प्रसिद्ध असलेली ही देवी माझ्यावर कृपा करो.)
चंद्र हा शब्द चंद् या क्रियापदापासून तयार झाला आहे. आह्लादक चमकणारा तो चंद्र. चन्द्राः आपः म्हणजे चमकणारे पाणी. याच शब्दात किंचित् वर्णबदल केला की अर्थ बदलतो. चण्ड म्हणजे प्रखर. चंद्रघंटा देवीच्या स्वरूपात ही दोन्ही रूपे दिसतात. ती दिसायला चंद्राप्रमाणे आकर्षक आहे. पण चण्डकोपादेखील आहे. कोप म्हणजे राग. ती रागावली की खूप रागावते, तिचा राग खूप असतो, प्रचंड असतो, भीतिदायक असतो.
देवी कवचामधली नवदुर्गेची रूपे ही पार्वतीशी संबंधित आहेत. शंकर आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतो, त्याचप्रमाणे पार्वतीच्या मस्तकावरही चंद्रकोर आहे. म्हणूनच तिचे वर्णन सौंदर्यलहरीमध्ये ‘कुटिलशशिचूडालमुकुटम्’ (चंद्रकोरीचा मुकुट केशरचनेवर धारण करणारी’) असा केला आहे. काहीवेळा शिरोभागी चंद्रकोर आणि तिच्याखाली घंटाकृती मुकुट असाही दाखवतात. यातूनच चंद्रघंटा हे नाव आकारले असावे.
चंद्र हा शब्द नावात असलेल्या काही देवींची मंदिरे आढळतात. कुषाण काळामध्ये चंद्रदेवी नावाची देवीही दिसते. नंतर नवव्या-दहाव्या शतकात चंद्रलाम्बा परमेश्वरी नावाची चोलांची कुलदेवी कर्नाटकातील संनती या गावी आहे. चंद्रलाम्बा देवीची अनेक मंदिरे आहेत. ही देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि दुर्गा या अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या तीन शक्तींपासून ही देवी निर्माण झाली असे स्कंदपुराणामध्ये आलेल्या चन्द्रलाम्बा माहात्म्यामध्ये आहे.
चंद्रघंटा या नावामधला घंटा शब्द काय असावा याचा उलगडा काही लौकिक कथांमधून केलेला दिसतो. इंद्राने वज्र दिले असे प्रचलित असले तरी चंद्रघंटा नावाची यथार्थता स्पष्ट करण्यासाठी इंद्राने तिला घंटा दिली अशी लौकिक कथा येते. इंद्राचे वज्र हे गदेसारखे, पण अनेक कंगोरे किंवा कोन असलेले असते. ते अयस्मय म्हणजे धातूपासून तयार केलेले असते. घंटा आणि वज्र यात साम्य निश्चितच नाही. तथापि, नावाचा नेमका अर्थ लावायचा प्रयत्न या कथेत केलेला दिसतो.
दुसऱ्या एका लौकिक कथेमध्ये जतूकासुराचा ( वटवाघूळरूपी असुरांचा) वध करण्यासाठी ती जात असता तिने चंद्र मस्तकी धारण केला. म्हणून तिचे नाव चंद्रघंटा आहे असे समर्थन केलेले दिसते.
आणखी एक कथाही सांगितली जाते. पार्वतीशी विवाह करण्यासाठी शिव त्याच्या नेहमीच्या भयंकर स्वरूपात आला. अंगाला भस्म फासले होते, गळ्याभोवती नाग होते, कमरेला नुकत्याच मारलेल्या हत्तीचे कातडे. भुतेखेते असलेल्या वरातीत हे नवरदेव हिमालयावर पोहोचले. पार्वतीची आई मेना तर मूर्च्छित झाली.
मग पार्वतीनेही वधू पक्षाच्या सुरक्षेसाठी चंद्रघंटेचे रूप धारण केले. ही देवी दिसायला सुंदर, गौर वर्णी होतीच. तिच्या मस्तकी चंद्रकोर होती. तथापि, ती रागीटही होती. पार्वतीचे हे रूप पाहून शिवानेही आपले रूप बदलले. त्याने अंगाला फासलेले भस्म गोरोचनेमध्ये बदलले. गळ्यातील नागांचे हार झाले. गजचर्माचे रेशमी वस्त्र झाले. भूतप्रेतगणही नेहमीच्या जिवंत माणसांसारखी दिसू लागले. आणि मग सप्तर्षी आणि देवतांच्या उपस्थितीत शिवपार्वती विवाह संपन्न झाला.
शिवाने आपले स्वरूप विवाहासाठी प्रस्थान करताना बदलले या कथनाला शिवपुराणाचा आधार आहे. कालिदासानेही कुमार संबंधांमध्ये शिवाच्या या कल्याणसुंदर मूर्तीचे ( कल्याण म्हणजे विवाह) सुरेख वर्णन केले आहे. परंतु चंद्रघंटेची कथा मात्र तिथे येत नाही. त्यामुळे, चंद्रघंटेच्या स्वरूपोत्पत्तीच्या या कथांना पौराणिक आधार असावा की निव्वळ जनमानसात जपलेल्या या कथा देवीकवचातील एका श्लोकात दिलेल्या नावांच्या अनुषंगाने अभिव्यक्त झाल्यात हे समजत नाही.
चंद्रघंटेची मंदिरेही वाराणसी, जयपूर इ. ठिकाणी आहेत असे समजते. चंद्रघंटा ही देवी पार्वतीचे रूप आहे हे आपण पाहिलेच. पहिल्या दिवशी हिमालयाची कन्या म्हणून तिचे वर्णन, दुसऱ्या दिवशी तपस्विनी पार्वती आणि तिसऱ्या दिवशी विवाहासाठी वधू म्हणून तयार झालेली पार्वती लोकमानसाला दिसली. विवाहोत्सुक वधू नेहमीच आकर्षक असते, आल्हादायक असते. ती चंद्राप्रमाणे सौम्य आणि प्रसन्न असते. म्हणून तिच्या नावात चंद्र असेल. ही देवी सुवर्णाप्रमाणे तेजस्वी वर्ण असलेली असून तिला दहा हात असतात. आठ हातांमध्ये आयुधे असतात. निर्मितीचे आणि सौंदर्याचे प्रतीक असलेले कमळ एका हातात आणि लोकांना मी तुमच्या पाठीशी आहे, भिऊ नका असे सांगणाऱ्या अभयमुद्रेत एक हात असतो.
विवाहोत्सुक किंवा विवाहित स्त्रीला आत्मसन्मानाने कसे जगावे हे चंद्रघंटा शिकवते. ती सौंदर्यवती आहे. ब्रह्मचारिणी अवस्थेतून ती बाहेर पडली आहे. आपले सौंदर्य अलंकारादींनी वाढवते आहे. आपल्या पतीलाही तापस आणि तामस वेशामधून बाहेर काढते आणि उत्तम वेश परिधान करायला लावते. पण ती अन्याय सहन करत नाही.
ती कधी वाघावर आरूढ होते तर कधी वृकवाहिनी असते, लांडग्यावर आरूढ होते. स्वजनांसाठी ती आल्हाददायक असली तरी अन्याय करणाऱ्यांच्या बाबतीत कठोर आहे, भयंकर आहे. हुंडा दिला नाही म्हणून विवाहानंतर अनेक मुलींना आत्महत्या करायला प्रवृत्त केले जाते. किंबहुना अनेक प्रकारच्या छुप्या छळाचा बळी व्हावे लागते.
मुलींच्या आयुष्याला ध्येय असेल, त्या ध्येयाचा त्यांना ध्यास लागला असेल तर फक्त सुंदर दिसण्यामध्ये त्या मुली गुंतून पडणार नाहीत. एकत्र कुटुंबात राहताना आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी तर या मुली घेतातच. पण जर कुणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर त्यांना जाब विचारण्याची धमक त्यांच्यामध्ये हवी. सौंदर्य आणि संपत्ती आवश्यकच आहे, पण ते आत्मसन्मानाशी तोल राखून.