“अजित, बघ ना तू तरी तिला समजावून सांग. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून संसार मोडायला निघाली ही.”
“ एवढी तेवढी गोष्ट? आशिष माझी खूप मोठी प्रतारणा केली आहेस तू. तुला ही क्षुल्लक गोष्ट वाटते? अजित अरे, त्यानं काय केलंय हे त्याला कळतं नाहीये का? तुझ्या मित्राला तूच आता समजावून सांग.”
“असं कोणतं महापाप केलंय मी? रेवती माझी कलीग आहे. आमच्या दोघांच्या वैचारिक तारा जुळतात, ऑफिसमध्ये आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतो, एकमेकांशी आम्ही छान गप्पा मारतो, एकमेकांशी काही भावनिक गोष्टीही शेअर करतो, आमच्यात कोणतेही ‘तसले’ रिलेशन नाहीत. आम्ही दोघेही फक्त सोलमेट आहोत. यात मी तन्वीची कोणती प्रतारणा केली? आणि संसारात मी माझ्या कोणत्या कर्तव्याला चुकलो आहे? तिला काही कमी पडतंय का? मग माझ्या प्रत्येक गोष्टीत तिनं संशय कशाला घ्यायचा? सतत माझ्यावर पाळत का ठेवायची? माझा मोबाईल, मेल का चेक करत राहायचं?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आयुष्यात प्रत्येकाला सगळं ‘बेस्ट’च हवं असतं, पण…

तन्वी आणि आशिष दोघांना आज अजितनं बोलवून घेतलं होतं. तो आशिषचा चांगला मित्र होता. गेल्या दोन महिन्यांपासून तन्वी एक वर्षाच्या सोनूला घेऊन माहेरी जाऊन राहिली होती. आशीषची सहकारी रेवती वरून दोघांची भांडणं सुरु होती आणि आता तू नोकरी बदल आणि रेवतीशी कायमस्वरूपी संपर्क तोडून टाक, तरच मी तुझ्यासोबत राहीन अन्यथा आपण दोघंही विभक्त होऊ, असं तन्वीचं म्हणणं होतं. दोघांना समजावून सांगण्यासाठी अजितनं मध्यस्थी करायचं ठरवलं पण दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.
“अजित अरे, माझ्यापेक्षाही जास्त वेळ तो रेवती सोबत घालवतो. तिच्यासोबत छान गप्पा मारतो, तिच्याशी हसून खेळून बोलतो, तिच्या मेसेजला उत्तर देताना ‘आय लव्ह यू’ असेही म्हणतो, तरीही मी गप्प बसायचं? ते काही नाही त्यानं नोकरी बदलली पाहिजे आणि हे रेवती प्रकरण थांबवलंच पाहिजे तरच मी पुन्हा त्याच्यासोबत राहायला जाईन.”

आणखी वाचा : अगं उर्मिला, किती खरं बोललीस!

“अरे,पण हिला काय अडचण आहे? एकाच ऑफिसमध्ये असल्याने आम्ही अधिक वेळ एकमेकांसोबत असणारच, तिनं एखादं चांगलं काम केलं तर तिला मी ‘आय लव्ह यू’ म्हणतो, पण त्याला वेगळा अर्थ लावण्याचं काम तन्वी करते आहे, स्वतः डोक्यात राग घालून माहेरी निघून गेली आणि माझ्या बाळालाही माझ्यापासून दूर केलंय, रेवतीचं आणि माझं भावनिक नातं समजून घेण्याची प्रगल्भता तिच्याकडे नाहीच, मी नोकरी बदलणार नाही, तन्वीनं या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.”
दोघांचे वाद संपतच नव्हते. अजितनं दोघांनाही शांत केलं.
“अजित, मान्य आहे की तुझं आणि रेवतीचं तसं कोणतंच नातं नाही, पण ती तुझी सोलमेट आहे हे तू मान्य करतोस आणि त्यामुळंच तन्वीला आपण परिपूर्ण जोडीदार नाही, असं वाटायला लागतं, तिच्या प्रेमात कोणीतरी वाटेकरी आहे हे तिला नको आहे. बायका आपल्या नवऱ्याच्या बाबतीत खूप पझेसिव्ह असतात. सर्वांपेक्षाही आपल्या जोडीदाराचं आपल्यावर प्रेम असावं असं त्यांना वाटत असतं आणि त्यात कोणतीही स्त्री, अगदी त्याची आई, बहीणसुद्धा वाटेकरी नको, असं मनोमन वाटत असतं त्यामुळं तुझं आणि रेवतीचं हे भावनिक नातं ती कशी मान्य करेल? तिला तू पैशाने, कर्तव्याने काहीच कमी करत नाहीस, पण तिच्याही भावनिक, मानसिक गरजा आहेत ना, त्याचा तू का विचार करत नाहीस? आता तुला एक मूल झालेलं आहे, तू तन्वीला आणि बाळाला अधिक वेळ द्यायला हवास. ज्या नात्यामुळं संसारात अडचणी निर्माण होतात ते नातं आपल्यासाठी कितीही चांगलं असलं तरी ते दूर ठेवावं लागतं.आईवडिलांसोबत पत्नीचं सूत जुळलं नाही तर संसारासाठी आईवडिलांपासून विभक्त होऊन स्वतंत्र संसार करणारी कितीतरी मुलं आहेतच ना. म्हणूनच तुझं आणि रेवतीचं भावनिक नातं तन्वीनं मान्य करावं हा अट्टाहास तू सोडून दे आणि तुमच्या नात्याला अधिक वेळ दे.”

आणखी वाचा : इंग्लंडमध्ये आता रजोनिवृत्तीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे; महिलांना दिलासा!

“आणि तन्वी, तू ही त्याच्यावर सतत संशय घेऊ नकोस. त्याच्या प्रत्येक गोष्टीत घुसखोरी करू नकोस. तू अशीच वागत राहिलीस तर तो केवळ तुला बरं वाटावं म्हणून तुझ्याशी खोटं बोलत राहील आणि लपवाछपवी करताना गोष्टी अधिक बिघडत राहतील.‘नोकरी सोड’, ‘एकतर ती किंवा मी’ ,‘माझ्याच म्हणण्यानुसार वाग,’ अशा प्रकारचा अट्टाहास सोडून दे, त्याला थोडा वेळ दे. आणि तू असं लांब राहून हा प्रश्न मिटणारच नाही, तू त्याच्या सोबत राहायला हवंस आणि त्याचीही मानसिकता समजून घ्यायला हवी.हळूहळू परिस्थिती बदलेल.”
अजीतच्या बोलण्यामुळे ‘सोलमेट’ हे नातं आपल्यासाठी कितीही चांगलं असलं तरी आपल्या वैवाहिक नात्याला ते कसं धोकादायक आहे हे आशिषच्या लक्षात आलं आणि तन्वीलाही आपली चूक कळली.
(smitajoshi606@gmail.com)
(लेखिका विवाह समुपदेशक आहेत.)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship marriage counselling is soulmate disturbing the marriage bonding vp
First published on: 23-12-2022 at 15:46 IST