फुलझाडांमुळे, वेलींमुळे, शोभिवंत पानांमुळे परसबागेची शोभा वाढते, हे खरेच. पण उद्यानतज्ज्ञांची लाडकी, बागेची शोभा वाढवणारी आणखी एक देखणी वनस्पती म्हणजे बांबू. बांबू हे गवत आहे हे तुम्हाला माहीत आहे? पोएसी या कुटुंबाचा बांबू सदस्य आहे. हे महाकाय गवत म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. जगभरात निसर्गत: बांबूचे असंख्य प्रकार आढळतात. भारतात उत्तर पूर्वेचा भाग, सातपुडा, सह्य़ाद्रीच्या भागात बांबूची विशाल बेटे आढळतात. चीन, जपान येथेही बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. बांबूच्या अंगी असलेल्या अनेक गुणांमुळे त्याचे बाजारमूल्य खूप आहे. त्यामुळे बांबूची व्यावसायिक तत्त्वावरही लागवड होते.

बांबूच्या एखाद्या रोपानेसुद्धा बागेत वेगळेच चैतन्य येते. कारण त्याचा लोभस आकार, निमुळती पोपटी हिरवी पाने, नाजूक काडय़ांच्या फांद्या अन् खोडाच्या आकाराचे, खोडाच्या रंगाचे वैविध्य! हिरवे, पिवळे, काळ्या रेघांचे, गर्द काळपट हिरवे. अशा विविध रंगांत बांबू आढळतात. नाजूक, सडपातळ खोडापासून दोन्ही हातात मावणार नाहीत असे जाडजूड बांबूही आढळतात. काही फुगीर खोडाचे ‘बुद्धाज बेली’ बांबू असतात. दोन पेरांमधील पोकळी हे बांबूचे वैशिष्ट्य पण काही बांबू भरीवही असतात. पानांच्या रंगातही हिरव्या रंगांच्या खूप छटा आढळतात. काही हिरवी, काही पोपटी तर काही पांढऱ्या, हिरव्या पट्टय़ांची, व्हेरिगेटेड बांबू, पिवळा बांबू, बुद्धाज बेली बांबू बागेत छान दिसतो. नाजूक काडय़ा व नाजूक पानांचे ‘बांबू ग्रास’ ही सुंदर दिसते.

हेही वाचा… पीरियड्सवरून होतेय तुमची ऑफिसमध्ये टिंगल?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांबू लावण्याआधी त्याची माहिती करून या बांबूच्या जमिनीतील खोडातून (रायझोम) नवीन कोंब फुटतात. काही बांबूचे फुटवे एकमेकालगत येऊन बांबूचे बेट तयार होते, तर काही प्रकारात खोडं जमिनीत लांब पळतात अन् कोंब फुटतात. वेगाने जमीन व्यापतात अन् बांबूचे विस्तीर्ण वन तयार होते. कोंब वेगाने वाढतात. काही बांबू एका दिवसात तीन फूटही वाढतात. अत्यंत वेगाने वाढणारी वनस्पती अशीच बांबूची ओळख आहे. बांबूचा फुलोरा खूप वर्षांनी येतो. प्रचंड बिया निर्माण होतात. या बियांची रचना इतकी कलात्मक असते की निसर्गापुढे नतमस्तक व्हावे, प्रेरणा घेण्यासारखे सुंदर डिझाइन असते. फुलल्यावर बांबूचे बेट मरते.

हेही वाचा… ‘लिव्ह इन’ आणि बलात्काराच्या गुन्ह्याची गुंतागुंत!

बागेत बांबू लावताना आडोसा हवा असेल, तर तीन फुटांवर एकेक रोप लावून भिंत करता येते. पिवळ्या बांबूची रोप गोलाकार लावून बेटही करता येते. व्हेरिगेटेड बांबूची बुटकी भिंत छान होते अथवा कुंडीतही छान वाढतो. ‘बुद्धाज बेली’ ही कुंडीतच लावावा, कुंडीत तीन भाग माती व एक भाग कोकोपीथ घालून रोप लावावे. फारशी देखभाल लागत नाही. पाणी मात्र रोज हवे. घराच्या गच्चीत, बाल्कनीत, कार्यालय, हॉटेल वा गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी बांबू लावून कुंड्या ठेवल्यास प्रसन्न हिरवाई मिळते. पाण्याची जागा, कृत्रिम धबधबा असेल तर त्याच्या कडेला बांबू ग्रास छान दिसते. जमिनीत लावता येते. माझ्याकडे गेली दहा वर्षे कुंडीत पिवळे बांबू छान वाढले आहेत. बांबू जमिनीत वाढल्यास फार वाढण्याचा धोका असतो. शहरी जीवनशैलीत ते त्रासदायक होते. वाढलेले बांबू कापण्यास व अतिरिक्त वाढ रोखण्यास खूप कष्ट व पैसा लागतो. शेतजमीन असेल तर जमिनीत लावावेत, मग खूप उपयोग करता येतात.

हेही वाचा… स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ?

बांबूच्या अंगी असलेले काठिण्य हे त्याचे वैशिष्ट्य. पोलादाहूनही तो कठीण म्हणूनच त्यापासून बांधकाम साहित्य, टाइल्स, पूल, शिड्या, फर्निचर, टोपल्या बनवतात. झाडू, बोरू, टूथपीक, उदबत्ती काड्या अक्षरश: हजारो वस्तू बनवतात. शतकानुशतके बांबूचा लगदा आपण कागद बनवण्यासाठी वापरतो आहोत. आसाम भागात खूप कारखाने आहेत. आसाम, सिक्कीमकडील भागात बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी, लोणचं करतात. भाजी छान लागते. त्या भागात हा ‘कल्पवृक्ष’ आहे. श. म. केतकर यांनी बांबूवर खूप संशोधन करून पर्यावरणपूरक उपयोग सुचवले व पुस्तकही लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांबूचे आपल्या जीवनात खूप उपयोग आहेत. पण ज्याने कुणी बांबूच्या वनातला सूर ऐकून पहिला पावा वाजवला असेल त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. कोवळ्या बांबूपासून बासरी निर्माण करणारे अनाम हात खरे कलाकार. बांबूच्या पोकळीत हलकेच फुंकर घालून सप्तसूर निर्माण करणाऱ्या बन्सीधर कृष्णास अन् त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करणाऱ्या बासरीवादकांना प्रणाम.