लष्करी कारवाईदरम्यान तोफांच्या माऱ्याने नाही तर मलेरियाने आपण जायबंदी झाल्याचा गंभीर प्रसंग गमतीशीरपणे मांडताना मणि हजारिका लिहितात, “जे काम तोफांना जमले नाही ते क्षुल्लकशा डासाने करून दाखवलं!” भूतानच्या लष्करी रूग्णालयामध्ये त्यांना शुद्ध आल्यानंतर लक्षात आलं की, ‘जीव वाचवून पळताना तहान लागली म्हणून केळीची पानं चुरगळून प्यायलेल्या पाण्यामुळे मलेरियाची लागण झालेली आहे’. बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा या अलगतावादी संघटनेने भूतानच्या दिशेला असलेल्या आसामच्या बक्सा जिल्ह्यातील टेकडीवर आपले मुख्यालय उभारले होते… त्या मुख्यालयावर भूतानी सैन्य तोफांचा मारा करीत टेकडीवर चाल करून येत होते. उल्फा या अलगतावादी संघटनेच्या पहिल्या महिला लढाऊ प्रशिक्षक मणि हजारिका यांचं आत्मकथन अलिकडेच प्रकाशित झालं असून त्यात हे वर्णन आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

२००३ साली एकेदिवशी अचानक टेकडीवर असलेल्या मुख्यालयावर तोफगोळे आदळायला लागले…, हजारिका पुढे सांगतात, परिस्थितीचा अंदाज यायला काही क्षण पुरले. त्यासुमारास आमच्या मुख्यालय आणि इतर कॅम्पच्या ठिकाणी एकूण ४८ महिला आणि २० मुलं होती. त्या सगळ्यांच्याच जीवनमरणाचा प्रश्न होता. शिवाय आमच्या पुरूष सहकाऱ्यांना लढण्यासाठी पुरेसा वेळही मिळणं गरजेचं होतं. म्हणून शेवटी मनाचा हिय्या करून महिला व मुले असे सर्वजण बाहेर पडलो. परंतु जंगलामध्ये भूतान लष्कराने आम्हांला वेढल्याचं लक्षात आलं. या विळख्यातून सहीसलामत सुटायचं असेल तर काहीतरी शक्कल लढवावी लागणार होती. सोबतच्या लहान मुलांना मी सांगितलं, की जेवढ्या मोठ्या आवाजात त्यांना रडणं जमत असेल तेवढ्या मोठ्या आवाजात रडा. झालं… मुलांनी अगदी तस्संच केलं. त्या आवाजामुळे तोफांचा मारा थांबला. आमची युक्ती कामी आली. सैनिकांनी नंतर उल्फाच्या महिला कार्यकर्त्या आणि मुलांना त्यांच्या लष्करी रूग्णालयात नेलं. तिथून पुढे त्या सर्वांना आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतातील सुरक्षा दलाच्या हवाली केलं जाणार होतं.

आणखी वाचा : जीन्सचा खिसा हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही…

भूतानमध्ये लपलेल्या आसामी उल्फाच्या अलगतावाद्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी झालेल्या कारवाईचं अतिशय रंजक वर्णन मणि हजारिका त्यांच्या ‘लाईट डाऊन’ या पुस्तकात करतात. बालवाचकांना नजरेसमोर ठेवून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कथनात्म स्वरूपात बहुभाषक उपक्रमांतर्गत प्रकाशित झालेल्या सहा पुस्तकांमध्ये मणि हजारिका यांचे हे पुस्तक मुलांच्या आकर्षणाचा विषय ठरते आहे.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

उल्फाच्या १९८९ साली स्थापन झालेल्या महिला लढाऊ गटाच्या मणि हजारिका पहिल्यावहिल्या सदस्या. त्यांनी आपला क्रांतीकारी जीवनप्रवास द रिड्स फॅक्टरीने प्रकाशित केलेल्या ‘लाईट डाऊन’ या पुस्तकामध्ये वर्णन केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ते(एआय)ला कथाकथनाची जोड देत बहुभाषिक उपक्रमांतर्गत आसामी भाषेत त्यांनी आपल्या आठवणी जागवल्या आहेत. त्या सांगतात, ‘वीस वर्षांपूर्वीच्या क्रांतीकारी जगण्याच्या आठवणी जाग्या करण्यासाठी माझ्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागला. क्रांतीमधील माझ्याबरोबरचे अनेक सशस्त्र कॉम्रेड्स आणि ठिकाणं यांचं विस्मरण झाल्यामुळे त्याबद्दल लिहू शकलेले नाही’. नोव्हेंबर १९९० साली बजरंग ऑपरेशनदरम्यान हजारिका लष्कराविरूद्ध झालेल्या कारवाईत उल्फाच्या पहिल्या महिला लढाऊ प्रशिक्षक झाल्या. काही गोष्टी विसरल्या असल्या तरीही २००३ च्या कारवाईत बेपत्ता झालेल्या आशांता बागफुकान, बेनिंग राम्भा आणि राबिन निओग या उल्फाच्या तीन लढवय्यांना मात्र त्या विसरलेल्या नाहीत. भूतानमधील लष्कराच्या रूग्णालयात हजारिका दाखल असताना त्यांच्या कानात ही मंडळी काहीतरी सांगत होती. त्यावेळी ‘आसामच्या भारतीय लष्कराकडे सुपूर्द न होता रेडक्रॉस किंवा कोणत्याही मानवाधिकार समितीकडे शरण जा’, असा सल्ला ते मला देत होते’, असंही त्यांनी सांगितलं. लष्कराने बंदी केल्यानंतरसुद्धा जगण्याच्या शाश्वतीसाठी त्यांनी केलेले प्रयोग, सुरक्षा दलाच्या नोंदीकरता घेतलेले टोपणनाव अशी खुमासदार वर्णनं या पुस्तकात आहेत.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

बालसाहित्यावर लक्ष केंद्रित करून आसामी, बंगाली, इंग्रजी आणि हिंदी अशा चार भाषांतून हजारिका यांचे आत्मकथन तयार करण्यात आल्याची माहिती ‘द रिड्झ फॅक्टरी’चे प्रादेशिक व्यवस्थापकीय संपादक पंकज कुमार दत्त यांनी दिली. “महिलांना त्यांच्या कथा मांडण्यासाठी हे प्रकाशन जसं व्यासपीठ आहे तसंच चळवळीच्या क्षेत्रातील महिलांची भूमिकादेखील दुर्लक्षून चालणार नाही. आमच्या सहापैकी तीन पुस्तकांचा विषय महिलाकेंद्री आहे. त्यात नोबिन बुरागोहेन हिचे “आहोम जुगॉर नारी” यात आसाममधील सहाशे वर्षांच्या आहोम राजवटीत पुरूषांपेक्षा महिलांचे योगदान किती मोलाचे आहे, याविषयी सांगण्यात आले आहे”, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. या सहा पुस्तकांमधे पुरस्कार विजेत्या आसामी लेखिका रिटा चौधरी यांच्या तीन पुस्तकांचा समावेश आहे.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : लीना मोगरे – अनुभवच माझे मेन्टॉर्स

“कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनच्या स्क्रीनवर खिळून राहिलेल्या मुलांना पुन्हा एकदा वाचनाकडे आकर्षून घेण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन आकर्षक चित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही पुस्तकं निव्वळ नफा कमावण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेली नाहीत”, असं द रिड्झ फॅक्टरीचे प्रमुख संगीतकार आणि प्रकाशक अभिरूक पटवारी याप्रसंगी म्हणाले.

(शब्दांकन : साक्षी सावे)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulfa activist narrates the incident of attack on the camp what guns could not a mosquito could vp
First published on: 23-11-2022 at 20:29 IST