तुफान पावसात माझ्यासह मुलीसह धावतधावत लोकल पकडली तेव्हा तिनंही धावतच लोकल पकडली होती. तुफान पावसामुळे गर्दी कमी त्यामुळे सर्वांनाचं बसायला जागा मिळाली, तीही समोरच येऊन बसली. पंचविशीची उत्साही तरुणी…तजेलदार चेहरा. भिरभिरणारी नजरं. तितक्यात दोन लहान मुलं आली, चिक्की विकणारी… डब्यात बहुधा चिक्की कुणीच घेतली नाही. नाराज होऊन एक जण बाजूच्या सिटवर रेलला आणि दुसऱ्याला म्हणाला, आज असंच घरी परत जायचं… पैसे बिलकुल नाही मिळणार.दुसरा म्हणाला, हो ना दादा,लयं पाऊस हायं…

हे सारं पाहणाऱ्या तिनं त्यांना बोलावलं. पिशवीतल्या चिक्कींचे किती होतील विचारलं. अडिचशे म्हंटल्यावर तेवढे पैसे काढून त्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाली डब्यात वाटा सगळ्यांना फुकट. फुकट असं प्रश्नार्थक विचारत ती मुलं लागली देखील चिक्की वाटायला. लोकांना वाटलं लुटायचा या मुलांचा नवा उद्योग… नाही म्हणत नाकारली, पैसे मिळणार नाहीत, असं खडसावलंदेखील… पण मुलं म्हणाली ,तुम्हाला फुकट, पैसे ताईनं दिले. काहींनी मुलांच्या हातात तरी पाच-दहा रुपये कोंबले. दोघे परत आले तिला म्हणाले, हो पैसे तुझे लोकांनी दिले. तू तर आम्हाला आधीच दिलेस.. ती म्हणाली,हे तुम्हाला मिळाले तुमच्या खावूसाठी… नाहीस स्टेशन आले… आम्ही उतरलो…

आणखी वाचा : मेहनतीचे दुसरे नाव…टेनिससम्राज्ञी सेरेना!

रात्री 11 च्या सुमारास मी आणि भैरवी नाहूरला स्टेशनवर आलो तेव्हा ती समोरच होती. तेव्हा ती समोरच होती. भांडूपहून आलेली ट्रेन थांबली तेव्हा कडेवर एक मूल असलेली गजरे वाली उतरली. शेवटचे चार- पाच गजरे शिल्लक असावेत. तिनं गजरेवालीला विचारलं,कितीला दिलेस. पन्नासला चार ती म्हणाली. तिनं 50 रुपये काढले तिला दिले तेव्हा तिची नजर दोन शिल्लक राहिलेल्या चाफ्यांवर पडली. तिनं विचारलं हो कितीला गं? तिनं ती चाफ्याची फूल गजऱ्याच्या पुडीत घातली आणि म्हणाली ही फुकट! ती तरुणी म्हणाली अगं मी देते पैसे त्याचे पण !

तर गजरेवाली म्हणाली.. अगं ताई, 50 सांगितले की बायका 20 पासून सुरुवात करतात. तू 50 दिलेस काढून म्हणून तुला फुकट! असं म्हणून गजरेवाली समोर आलेली गाडी पकडून निघूनहीगेली. सीएसएमटी ट्रेन आली आम्ही चढलो आणि बसायला जागा मिळाली तीही पुन्हा समोरासमोर. या ट्राऊझर घातलेल्या मुलीला भैरवी म्हणाली,तुला आवडतात का ग गजरे? ती म्हणाली, छे, ट्राऊझरवर गजरा? नो,वे! मग घरच्यांसाठी का? – इति भैरवी. … तर ती म्हणाली , छे गं. 11 वाजलेले , कडेवर मुलं घेऊन ती किती काळ विकत बसणार? म्हणून घेतले. तुला हवेत का?

आणखी वाचा : करिअर-घर बॅलन्स : “आमचं स्टारपण उंबरठ्याबाहेर ठेवून घरात येतो”: निवेदिता सराफ

भैरवी म्हणाली, अगं तू सकाळी पण चिक्की घेतलीस आणि आता गजरे. दोन्ही वेळेस मी आणि बाबा… आम्ही होतो समोरच! अगं आणि तुझं नाव सांग की… हा संवाद होईतोवर कांजूरमार्ग आलं होतं. उतरता उतरता ती म्हणाली, अगं चांगुलपणाला कुठं नाव असतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vinayak.parab@expressindia.com