Women Health tips: आजच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे झाले आहे. विशेषत: वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खासकरून महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वयाच्या ४० व्या वर्षांनंतर असे लक्षात आले आहे की, महिलांना अनेक आजारांनी घेरायला सुरुवात होते. सांधेदुखी, पोट खराब होणे, वजन वाढणे आणि अशा अनेक समस्या आहेत, ज्या वयाच्या या टप्प्यावर येताच सुरू होतात. अशा वेळी महिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वयाच्या ४० व्या वर्षी महिलांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात, जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४० वर्षांनंतर महिलांना उद्भवू शकतात ‘या’ आरोग्य समस्या

१. मुतखडा

पुरुषांप्रमाणे महिलांनाही मुतखडा म्हणजेच किडनीची समस्या भेडसावू लागली आहे. वाढलेला लठ्ठपणा, कमी झालेली शारीरिक हालचाल, उच्च रक्तदाब आणि शरीरात कॅल्शियमचे कमी झालेले शोषण यामुळेही मुतखडे होऊ शकतात. सामान्यतः असे मानले जाते की, मुतखडा पुरुषांमध्ये सामान्य आहे. परंतु, स्त्रियांमध्येदेखील हे दिसून येते. पाठीत तीव्र वेदना, लघवीत रक्त येणे, ताप आणि थंडी वाजून येणे, उलट्या होणे, लघवीला दुर्गंधी येणे आणि लघवी करताना जळजळ होणे ही मुतखड्याची काही धोक्याची चिन्हे आहेत.

२. संधिवात

शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला ‘आर्थराइटिस’ किंवा संधिवात म्हणतात. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा हा आजार मानला जातो. बहुतेक महिलांना ४० वर्षांनंतर संधिवाताचा त्रास सुरू होतो. हाडांची घनता कमी झाल्यामुळे सांध्यांच्या भागात वेदना, कडकपणा आणि विकृती जाणवते.

(हे ही वाचा: Women Health: महिलांनी तिशी-चाळिशीदरम्यान कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात? जाणून घ्या…)

३. मधुमेह

आजकाल तरुणांमध्येही मधुमेहाची लागण दिसून येत असली तरी वयाच्या चाळिशीनंतर महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. थकवा, प्रचंड तहान, लघवी वाढणे, अंधूक दिसणे, वजन कमी होणे, हिरड्या मऊ पडणे ही महिलांमधील मधुमेहाची काही लक्षणे आहेत.

४. ऑस्टिओपोरोसिस

चाळिशीच्या दरम्यान आणि नंतर हाडांची घनता कमी होते. बदलत्या हार्मोन्समुळे शरीराच्या रचनेवरही खूप परिणाम होतो. स्त्रियांना नेहमी त्यांच्या कॅल्शियमचे सेवन आणि व्हिटॅमिन डीच्या पातळीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून हाडांच्या आरोग्यास त्रास होणार नाही. सांध्यातील तीव्र वेदना, ठिसूळ हाडे ही हाडांच्या आरोग्याची काही लक्षणे आहेत.

५. युरिन इन्फेक्शन

युरिन इन्फेक्शनचा त्रास महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. युरिन करताना जळजळ होणे, ओटीपोट आणि कंबर दुखणे, युरिनचा रंग जास्त पिवळा होणे, सारखं युरिन आल्यासारखे वाटणे, युरिन अगदी कमी प्रमाणात होणे, थकवा येणे ही युरिन इन्फेक्शनची लक्षणे आहेत.

६. उच्च रक्तदाब

महिलांची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत त्याची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. उच्च रक्तदाब सुरू होण्यामागे अस्वास्थ्यकर जीवनशैली हा एक प्रमुख घटक असला, तरी वय हा देखील एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे.

७. लठ्ठपणा

आजच्या काळात लठ्ठपणा आणि वाढते वजन ही धोक्याची घंटा बनली आहे, ज्याच्या सर्वाधिक बळी महिलाच आहेत. महिलांचे शरीर अनेक बदलांमधून जात असते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे विविध हार्मोन्स आणि मासिक पाळीत होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. गर्भधारणेनंतर इतर अनेक घटकदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

८. स्तनाचा कर्करोग

महिलांमध्ये तर स्तनाचा कर्करोग दिवसेंदिवस वाढत आहे. ४० वर्षांनंतर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हा आजार वाढत चालला आहे. निष्काळजीपणा आणि आजाराची लक्षणे वेळेवर न तपासणे हे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमुख कारण आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens health tips eight common health challenges for women over 40 pdb
First published on: 15-03-2024 at 17:37 IST