अपेक्षांचे प्रचंड ओझे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर आहे. १९८३ आणि २०११च्या विश्वविजेत्या भारतीय संघाने आता तिसऱ्यांदा जगज्जेतेपदाचा मान मिळवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. १९७५च्या विश्वचषकात भारतीय संघ फक्त हजेरी लावून आला होता, परंतु हळूहळू या संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली पकड घट्ट केली. १९८३च्या विश्वविजेतेपदानेच भारतात क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने रूढ झाला, नव्हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला. कपिलदेव त्या ऐतिहासिक यशाचा शिल्पकार होता. कपिलने आपल्या पराक्रमाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. कलात्मक आणि पाठय़पुस्तकी क्रिकेटला तिलांजली देत कपिलने आपल्या मुक्तछंदी फटकेबाजी आणि हुकमी आऊटस्विंगरने भारताला सुवर्णकाळ दाखवला. ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्करने सर्वाना आपल्या फलंदाजीची मोहिनी घातली. भारतीय क्रिकेटची हीच ज्योत मग सचिन तेंडुलकरने जवळपास २४ वष्रे वाहिली. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनीही गेल्या दशकात आपले योगदान दिले. त्यामुळेच भारतीय संघ २००३मध्ये अंतिम फेरी गाठू शकला. मग २०११मध्ये घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना भारताने अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद काबीज करीत सचिनचे स्वप्न साकारले. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भारताने अनेक चढउतारांचा सामना केला. सचिनने १९९२पासून सहा विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यंदाच्या विश्वचषकात प्रथमच सचिन नसेल.
विश्वचषकाच्या पहिल्यावहिल्या सामन्याचा मान एस. वेंकटराघवनच्या नेतृत्वाखालील भारताला मिळाला. डेनिस एमिसच्या १३७ धावांच्या बळावर इंग्लंडने ४ बाद ३३४ धावा उभारल्या. परंतु भारताने ६० षटके खेळून जेमतेम ३ बाद १२३ धावा केल्याने इंग्लंडला २०२ धावांनी दिमाखात विजय साजरा करता आला. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी सुनील गावस्करने (१७४ चेंडूंत एका चौकारासह ३६ धावा) याच सामन्यात नोंदवली. गावस्करच्या कासवछाप फलंदाजीवर बरीच टीका झाली. मग भारताने गावस्कर व फारुक इंजिनीयर यांच्या अर्धशतकांच्या बळावर दुबळ्या ईस्ट आफ्रिकेवर आरामात विजय मिळवला. त्यानंतर उपान्त्य फेरी गाठण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा साखळीतील अखेरचा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु तो किवींनी ४ विकेट व १.१ षटके राखून जिंकल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. १९७९च्या विश्वचषकात भारताची साखळीतच पाटी कोरी राहिली होती. विश्वविजेत्या वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेने भारताला सहज हरवले. या स्पध्रेत भारताला एकाही सामन्यात दोनशेचा टप्पा ओलांडता आला नव्हता.
१९८३च्या विश्वचषकात भारताकडून माफक अपेक्षा करण्यात येत होत्या. साखळीत झिम्बाब्वे, विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी दोन सामने होते. भारताने यशपाल शर्माच्या खेळीच्या बळावर सलामीला विंडीजला हरवून क्रिकेटजगताला धक्का दिला. मग भारताने दुबळ्या झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला तो संदीप पाटीलच्या अर्धशतकाच्या बळावर. मग ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांनी भारतावर दणदणीत विजय मिळवले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना कपिलने १३८ चेंडूंत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ वादळी खेळी साकारून सर्वाचे लक्ष वेधले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळीतील अखेरचा सामना ११८ धावांनी जिंकून भारताने उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले. मदन लाल आणि रॉजन बिन्नी यांनी प्रत्येकी चार बळी घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. उपान्त्य फेरीत यशपाल, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडवर सहा विकेट राखून विजय मिळवला. मग अंतिम सामन्यात विंडीजने भारताचा डाव फक्त १८३ धावांत गुंडाळला. यात के. श्रीकांतचे सर्वाधिक ३८ धावांचे योगदान होते. नंतर भारतीय गोलंदाजांनी विंडीजची ६ बाद ७६ अशी अवस्था केली आणि फक्त १४० धावांत त्यांचा डाव कोसळला. अमरनाथने २६ धावा आणि १२ धावांत ३ बळी असे अष्टपैलुत्व सिद्ध केले. कपिलने लॉर्ड्सच्या गॅलरीत भारताचे जगज्जेतेपद उंचावून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.
कपिलच्या नेतृत्वाखाली १९८७मध्ये घरच्या मैदानावर भारताने पुन्हा जगज्जेतेपदाचे स्वप्न पाहिले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या अ-गटात भारताने सहापैकी पाच सामने जिंकले, तर एक सामना एका धावेने गमावला. श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, गावस्कर, नवज्योतसिंग सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन, रवी शास्त्री आणि कपिलदेव यांनी भारताच्या ताकदीचा प्रत्यय घडवला. परंतु उपान्त्य फेरीत इंग्लंडने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. चेतन शर्माने या विश्वचषकात ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवली, तर त्याच सामन्यात गावस्करला आपले पहिले एकदिवसीय शतक साकारता आले. गावस्करच्या कारकीर्दीतील हा अखेरचा विश्वचषक होता. १९९२च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघांविरुद्ध सामने जिंकले, तर पाच सामने गमावले. त्यामुळे साखळीत सातव्या क्रमांकावर भारताची घसरण झाली. १९९६मध्ये भारताने सहयजमानपद भूषवले. सचिन, अझरुद्दीन, अजय जडेजा, सिद्धू आणि संजय मांजरेकर ही भारताच्या फलंदाजीची तर अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, मनोज प्रभाकर, वेंकटपती राजू ही भारताच्या गोलंदाजीची बलस्थाने होती. गटसाखळीत भारताने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करले, तर विंडीज, झिम्बाब्वे, केनियाला पराभूत करीत आगेकूच केली. उपान्त्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार वसिम अक्रमने दुखापतीमुळे माघार घेतली. मग सिद्धूच्या ९३ धावांमुळे भारताने पाकिस्तानला हरवले. या पराभवाचे पाकिस्तानमध्ये मोठे पडसाद उमटले. सरकारकडून या पराभवाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मग ईडन गार्डन्सवर उपान्त्य फेरीतील सामन्यात श्रीलंकेने २५१ धावांचे आव्हान उभे केले. सचिनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने १ बाद ९८ अशी दमदार सुरुवात केली, परंतु काही काळात भारताची फलंदाजी कोसळली आणि ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली असताना क्रिकेटरसिकांनी हुल्लडबाजी करीत सामना थांबवला. अखेर या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. सचिनने या स्पध्रेत ८७.१६च्या सरासरीने ५२३ धावा केल्या.
१९९९च्या विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेकडून हार पत्करली. मग वडिलांच्या निधनामुळे मायदेशी आलेला सचिन पुन्हा विश्वचषकासाठी इंग्लंडला आला. केनियाविरुद्ध १४० धावांची खेळी आपल्या वडिलांना समर्पित करून त्याने भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. मग भारताने श्रीलंका आणि इंग्लंडला हरवून सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिलमध्ये युद्धजन्य परिस्थिती चालू असताना भारताने मँचेस्टर येथे पाकिस्तानला ४७ धावांनी पराभूत केले. व्यंकटेश प्रसादने या सामन्यात ५ बळी घेतले, परंतु अन्य सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे आव्हान सुपर सिक्समध्ये संपुष्टात आले.
२००३च्या विश्वचषकात भारताने ११ पैकी फक्त दोन सामने गमावले आणि ते दोन्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. सचिन, द्रविड, गांगुली असे धडाकेबाज फलंदाज आणि जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळेची प्रभावी गोलंदाजी तर युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग ही नवी गुणवत्ता यांचा सुंदर मिलाफ भारताच्या कामगिरीत दिसून आला. दुबळ्या हॉलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा डाव २०४ धावांत गडगडला, परंतु तरीही ६८ धावांची विजयी सलामी दिली. मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा डाव फक्त १२५ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय संघाच्या ढासळत्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. खेळाडूंच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. त्यानंतर मात्र भारताची कामगिरी अनपेक्षितपणे बहरली. भारताने झिम्बाब्वे, नाम्बिया, इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवून दिमाखात सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. सुपर सिक्समध्ये भारताने केनिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत उपान्त्य फेरी गाठली. या स्पध्रेत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या केनियाला आरामात हरवून मग भारताने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. वाँडर्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम मुकाबल्यात रिकी पाँटिंगच्या घणाघाती शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३६० धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु भारताचा डाव मात्र २३४ धावांत आटोपला आणि जगज्जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले. या विश्वचषकात सर्वाधिक ६७५ धावा काढणारा सचिन स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला.
कॅरेबियन बेटांवरील २००७चा विश्वचषक म्हणजे भारतासाठी एक दु:स्वप्न होते. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने हरवल्यामुळे भारतीय संघाला खडबडून जाग आली. मग नवख्या बम्र्युडाविरुद्ध भारताने ५ बाद ४१३ धावांचा डोंगर उभारून सहज विजय मिळवला. मग गटातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या विश्वचषकाचे तीव्र पडसाद भारतात उमटले. काही खेळाडूंच्या घरांवर हल्ले झाले, तर बंगळुरू व मुंबईत क्रिकेटरसिकांनी निदर्शने केली. कुंबळेने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला, तर प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी पदाचा राजीनामा दिला.
२०११च्या विश्वचषकात यजमान भारताला आधीपासून संभाव्य विजेत्यांच्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. अनुभवी सचिन, सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युसूफ पठाण, सुरेश रैना अशी भारताची दमदार फलंदाजीची फळी होती. झहीर, आशीष नेहरा आणि हरभजन सिंग असा अनुभवी मारा होता. भारताला बांगलादेश, द. आफ्रिका, इंग्लंड, विंडीज, हॉलंड आणि आर्यलडसोबत ब-गटात स्थान देण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात सेहवाग (१७५) आणि कोहली (१००*) यांच्या शतकांच्या बळावर भारताने ४ बाद ३७० धावांचा डोंगर उभारला आणि ८७ धावांनी दमदार विजय मिळवला. मग बंगळुरूला इंग्लंडचा सामना टाय झाला. या सामन्यात सचिनने शतक साकारले. मग भारताने दुबळ्या आर्यलड आणि हॉलंडला हरवले. त्यानंतर नागपूरला सचिनने शतक ठोकले, परंतु नंतर भारताची फलंदाजीची फळी कोसळली. विश्वचषकातील पहिला पराभव भारताच्या पदरी पडला. चेन्नईत विंडीजविरुद्धच्या साखळीतील अखेरच्या सामन्यात युवराजच्या शतकाच्या बळावर भारताने ८० धावांनी विजय मिळवला आणि गटउपविजेत्याच्या थाटात उपान्त्यपूर्व फेरी गाठली. अहमदाबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारताने लीलया पेलत उपान्त्यपूर्व फेरी जिंकली. मोहालीला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या उपान्त्य सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. वहाब रियाझ (५/४६) टिच्चून गोलंदाजी करीत असतानाही भारताने ९ बाद २६० धावा केल्या. सचिनची (८५) खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. मग २ एप्रिल २०११ या दिवशी भारताने श्रीलंकेला हरवून विश्वविजेतेपद प्राप्त केले. महेला जयवर्धनेच्या शतकाच्या बळावर लंकेने ६ बाद २७४ धावांचे आव्हान उभारले होते. सेहवाग, सचिन झटपट तंबूत परतल्यामुळे भारताची २ बाद ३१ अशी अवस्था झाली. परंतु गंभीर आणि धोनीच्या जबाबदारीपूर्ण खेळींच्या बळावर भारताने श्रीलंकेचे लक्ष्य काबीज केले व दुसऱ्यांदा विश्वविजेतपद जिंकण्याची किमया साधली. धोनी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सचिनने (४८२) स्पध्रेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक नोंदवल्या. झहीरने (२१) स्पध्रेत सर्वाधिक बळी मिळवले. युवराजने ३६२ धावा आणि १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करीत संपूर्ण स्पध्रेवर आपली छाप पाडली आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला.

अपेक्षित कामगिरी
ब-गटात भारतासह पाकिस्तान, द. आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, आर्यलड, वेस्ट इंडिज, आर्यलड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. त्यामुळे गटविजेत्याच्या अविर्भावात भारतीय संघ बाद फेरीत पोहोचू शकेल. भारताला उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारणे या संघाला कठीण जाणार नाही. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. विश्वचषकात पाकिस्तानला कधीही भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही, हा इतिहास भारताच्या बाजूने असेल.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
धोनी हा भारतीय संघाचा हुकमी एक्का आहे, याचा प्रत्यय त्याने मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात घडवला आहे. त्या विश्वविजेत्या संघातील धोनी, आर. अश्विन, सुरेश रैना आणि विराट कोहली असे फक्त चार खेळाडू सध्या भारतीय संघात आहेत. या संघातील अनेक जण किमान ५० एकदिवसीय सामनेही खेळलेले नाहीत. कोहली हा जगातील एक सर्वोत्तम फलंदाज भारतीय संघात आहे. अजिंक्य रहाणे परदेशी खेळपट्टय़ांवर आत्मविश्वासाने खेळतो. रवींद्र जडेजा आणि अश्विन यांचा मधल्या षटकांमध्ये वापर करण्यात धोनी तरबेज आहे. परंतु वेगवान गोलंदाजी ही भारतीय संघाची समस्या आहे. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीकडून भारताच्या खूप अपेक्षा आहेत.
भारत (ब-गट)
क्रमवारीतील स्थान :
सहभाग : १९७५ ते २०१५ सर्व
जेतेपद : १९८३, २०११
उपविजेतेपद : २००३
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.
प्रशिक्षक : डंकन फ्लेचर
साखळीतील सामने
१६ फेब्रुवारी : वि. पाकिस्तान
२२ फेब्रुवारी : वि. दक्षिण आफ्रिका
२८ फेब्रुवारी : वि. संयुक्त अरब अमिराती
६ मार्च : वि. वेस्ट इंडिज
१० मार्च : वि. आर्यलड
१४ मार्च : वि. झिम्बाब्वे
संकलन : प्रशांत केणी