सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रसारभारतीचा विश्वचषकातील भारताचे सामने प्रक्षेपित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामनेही दूरदर्शनवर पाहता येणार आहेत. रंजन गोगोई आणि प्रफुल्ल सी. पंत यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
विश्वचषकाचे प्रसारण हक्क ‘स्टार स्पोर्ट्स’ समूहाकडे आहेत. प्रसारभारतीला थेट प्रक्षेपणाचे अधिकार मिळाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अशी भूूमिका घेत स्टार समूहाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने स्टार समूहाच्या बाजूने निर्णय देताना प्रसारभारतीला विश्वचषक सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास मज्जाव केला होता.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला. याप्रकरणी पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे. या विषयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्टार समूह, बीसीसीआय आणि प्रसारभारती यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. विश्वचषकाच्या प्रसारणासाठी प्रसारभारतीने नवीन वाहिनी सुरू करावी असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र तांत्रिक कारणास्तव नवीन वाहिनी सुरू करणे शक्य नसल्याचे प्रसारभारतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. या परिस्थितीत प्रसारभारतीला थेट प्रसारणाचे अधिकार देण्याचा न्यायालयाने घेतला आहे.
खाजगी वाहिनीवर विश्वचषक पाहण्यासाठी चाहत्यांच्या खिशाला भरुदड पडत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केबलच्या माध्यमातून विश्वचषक पाहणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.