|| कुलवंतसिंग कोहली

मी जिने चढून आमच्या घरी चाललो होतो, तोच एक माणूस जिने उतरून खाली येत होता. त्याच्याबरोबर आणखी दोन माणसं होती. मला पाहताच तो चपापला. त्यांनी नजर वळवली व ते भराभरा उतरून निघून गेले.

मी तसाच खाली उतरलो आणि आमच्या मॅनेजरला आवाज दिला, ‘‘भूषण, हा माणूस आपल्या इथं कसा आला? आणि त्यातही तो वर रूम्सकडे कसा गेला?’’

मला माहिती होतं की, ती व्यक्ती बदनाम होती. ती सिनेमात येऊ पाहणाऱ्या स्त्रियांची दलाल होती. अशा प्रकारचा माणूस ‘प्रीतम’मध्ये येऊ नये याची मी दक्षता घेतली होती. त्याला मी जेवायलाही येऊ देत नसे. मग तो थेट आमच्या रूम्सपर्यंत गेला कसा? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळीच घंटा घणघणली.

आम्ही त्यावेळी ‘प्रीतम’च्या तिसऱ्या मजल्यावर राहायला आलो होतो. जिन्याच्या एका बाजूला आमचा फ्लॅट आणि दुसऱ्या बाजूला ‘प्रीतम’च्या रूम्स अशी रचना होती.

मी त्या काळात हॉटेलच्या गल्ल्यावर बसत असे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकावर माझे लक्ष असे. त्यातही प्रीतमच्या धोरणाप्रमाणे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या व्यक्तींकडे निव्वळ ग्राहक म्हणून पाहत नसू, तर ती व्यक्ती आमच्या कुटुंबाची सदस्य आहे असंच समजत असू. परिणामी जवळपास ९९ टक्के ग्राहकांना मी व्यक्तिगतरीत्या ओळखत होतो. त्यांची सुख-दु:खं आमची होती. मी माझ्या ग्राहकांच्या हिताची काळजी घ्यायला सर्वतोपरी बांधलेला होतो. म्हणूनच मला त्या माणसाला आमच्या येथे पाहून धक्का बसला.

भूषण मला म्हणाला, ‘‘सर, चौकशी करून लगेच सांगतो.’’ त्या काळात सीसीटीव्ही वगरे नव्हते. आमच्या रजिस्टरमध्ये नोंद व्हायची आणि मगच बाहेरच्या व्यक्तीला आत प्रवेश मिळायचा. भूषणने रजिस्टर तपासलं तर ती व्यक्ती खोटय़ा नावानं आमच्या एका रूममध्ये गेल्याची नोंद आढळली. ‘‘त्या रूममध्ये दोन मुली आपल्या वडिलांसोबत उतरल्या आहेत,’’ असंही तो म्हणाला. ‘‘मुली चांगल्या होत्या. आणि वडिलांबरोबर आल्या आहेत म्हणून त्यांना रूम दिली,’’ अशी पुस्तीही त्यानं जोडली.

मी मग कॅश काऊंटरवरच थांबून राहिलो. थोडय़ा वेळानं त्या मुलींचे वडील हॉटेलबाहेर पडताना दिसले. अतिशय कुरूप माणूस होता तो. त्याचा वरचा ओठ फाटलेला होता. मी वर गेलो. ‘प्रीतम’चा मालक या नात्यानं मी त्या मुली ज्या रूममध्ये राहत होत्या त्या रूममध्ये गेलो. एकीनं दार उघडलं. मी माझी ओळख सांगितली आणि त्यांना काही त्रास नाही ना, वगरे साधीशी चौकशी केली. त्या मुली नितांतसुंदर होत्या. जणू चित्रपटाच्या हिरॉइन्सच!

मी मग माझ्या घरी आलो. माझ्या आईला आणि पत्नीला बोलावलं. त्यांना माझ्या मनातली शंका सांगितली. ‘‘त्या दोन्ही मुली कोणत्याही दृष्टिकोनातून त्या माणसाच्या सख्ख्या मुली वाटत नाहीत,’’ असं मी त्यांना म्हणालो. कोण येतंय, कोण जातंय, यावर बीजीचं सतत लक्ष असायचं. ती अतिशय धोरणी होती. तिनं एक युक्ती करायचं ठरवलं. तिनं माझी सर्वात धाकटी मुलगी डॉलीला (ती तेव्हा तीन-चार वर्षांची होती.) त्या मुलींच्या रूमवर पाठवलं. त्या दोघी डॉलीला बघून खूश झाल्या. डॉलीबरोबर खेळू लागल्या. खेळता खेळता डॉली त्यांना घेऊन आमच्या घरी आली. बीजीनं त्या दोघींचं स्वागत केलं. आम्ही पंजाबी मंडळी स्वागत करताना कधीही हात राखून स्वागत करत नाही. त्या मुलीही पंजाबी होत्या. त्यांना बीजीचं वागणं खूप आवडलं. माझ्या पत्नीनं त्यांना खाऊपिऊ घातलं आणि हळूहळू त्यांच्याकडून माहिती काढून घेतली. त्यांचे वडील म्हणून ओळख सांगणारा तो माणूस त्यांचा बाप नव्हता, तर तो त्यांचा शिक्षक होता. या मुली उत्तरेकडच्या एका राज्याच्या राज्यपालांच्या कम्प्ट्रोलरच्या मुली होत्या. त्या दोघींना चित्रपटांचं खूप वेड होतं. या वेडातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एक शिक्षक नेमला होता. त्या शिक्षकानं या मुलींची कमजोरी बरोबर ओळखली. त्यांना तो सांगत असे- ‘‘मी मीनाकुमारीला ओळखतो. तिच्याबरोबर मी जेवलो आहे. मधुबाला माझ्या चांगल्या परिचयाची आहे. मी तुम्हाला मुंबईत घेऊन गेलो तर आठ दिवसांत चित्रपटाची हिरॉइन बनवीन.’’ तर- या मुली त्याच्या थापांवर भुलल्या आणि त्याच्याबरोबर घरातले पसे, दागिने इत्यादी घेऊन पळून मुंबईत आल्या आणि नेमक्या ‘प्रीतम’मध्ये उतरल्या.

मुंबई ही कोणत्याही काळात मायानगरीच होती. मुंबईवर भाळणारी माणसं ही मुंबईचं भलंच करतात असं नाही, तर ते तिला बदनामही करतात. या मायानगरीला सर्वार्थानं बदनाम करणाऱ्या लोकांपकी ‘तो’ माणूस होता. त्या मुली हे सारं सांगत असताना मी घरातच होतो. बीजी व पत्नीनं मला तिथं बोलावून घेतलं. मला सर्व सांगितलं. तोवर त्या मुलींच्या लक्षात आलं होतं- त्यांच्याकडून कोणती चूक घडलीय ते! मी त्या दोघींनाही समाजावलं की, ‘‘ज्या माणसानं तुम्हाला इथं मुंबईत हिरॉइन करतो असं सांगितलंय, तो एक दलाल आहे. तुमच्यासारख्या भोळ्याभाबडय़ा मुलींना ही माणसं फसवतात आणि वाईट मार्गाला लावतात. मी चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तुम्ही म्हणाल तर मी तुमची मोठय़ा दिग्दर्शकांशी ओळख करून देईन. परंतु हे क्षेत्र तुमच्यासारख्या मुलींसाठी नाही.’’

त्या दोघींनाही माझं म्हणणं पटलं. त्यांचे वडील ज्या राज्यातील सेवक होते, त्या राज्याचे एक मंत्री हे माझे काका होते. मी त्यांना लाइटनिंग फोन लावला. त्या काळात फोन लागणं हे एक दिव्यच होतं. लाइटनिंग कॉल लावल्यामुळे मला दोन तासांत काकांशी संपर्क साधता आला. काकांनी चौकशी करून उद्या कळवतो असं सांगितलं. त्या दिवशी त्या मुलींचा तो शिक्षक हॉटेलवर येणार नव्हता. मी सावधगिरीचा उपाय म्हणून त्या दोघींना आमच्या घरीच झोपायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच काकांनी फोन केला व म्हणाले की, ‘‘तुझी माहिती बरोबर आहे. कम्प्ट्रोलरच्या मुली घरातून नाहीशा झाल्या आहेत. त्या धक्क्यानं त्याला हृदयविकाराचा झटका आलाय व तो रुग्णालयात आहे. तू त्या मुलींना तुझ्याच ताब्यात ठेव. मी त्यांच्या कोणातरी नातेवाईकांना तुझ्याकडे पाठवतो. त्यांच्या ताब्यात त्या मुलींना दे.’’

मी ‘हो’ म्हणालो.

त्या दोघींनाही मी त्यांच्या घरी काय घडलंय, ते सांगितलं. त्यांना अतिशय वाईट वाटलंच; पण अपराध्यागतही वाटू लागलं. दुपारी तो ‘तथाकथित’ शिक्षक आला. रूममध्ये मुली नाहीत हे बघून त्याला धक्काच बसला. चौकशी करायला तो काऊंटरवर आला आणि त्यानं घाबऱ्याघुबऱ्या आवाजात मला विचारलं, ‘‘माझ्या मुली कुठे बाहेर गेल्या आहेत का?’’ मी ‘नाही’ म्हणालो. तो जरा इकडे तिकडे फिरून आला. पुन्हा त्यानं माझ्याकडे चौकशी केली. त्यानंतर ‘‘चला, आपण त्यांना शोधू,’’ असं म्हणत मी त्याला घेऊन वर आमच्या घरी गेलो. घरात पापाजी होते. बीजी होती. माझं कुटुंब होतं. आणि काही सुरक्षारक्षकांनाही मी बाहेर थांबण्याची सूचना दिली होती. त्याला घेऊन मी घरात शिरलो व मुलींना म्हणालो, ‘‘तुमचे वडील आले आहेत.’’ त्या दोघींना बघून त्यानं सुटकेचा नि:श्वास टाकला. ‘‘चलो बेटियों, तुम्हाला ऑडिशनसाठी जायचंय.’’ असं तो म्हणाला.

त्यावर उसळून त्यातली मोठी मुलगी जोरात ओरडली, ‘‘कसली बेटी आणि कसली ऑडिशन? तू आमचा बाप तर नाहीसच, पण शिक्षकही नाहीस. थांब, तुला आता बघते.’’ त्याच्या लक्षात आलं, की काहीतरी गडबड झालीय. आपलं बिंग फुटलंय. त्या मुलीनं पायातलं जोडा काढून हातात घेतला व त्याला बडवायला सुरुवात केली. ती चिडून म्हणत होती, ‘‘हा काही आमचा बाप नाही. आमचा याचा काही संबंध नाही. यानं आम्हाला खोटी आशा दाखवून फसवलं.’’ मग दुसरीनं पायातली चप्पल काढली व त्याला तावातावाने मारू लागली आणि म्हणाली, ‘‘पापाजी, याने आमच्याशी काय गेम केला ते आत्तापर्यंत सांगितलं नाही. तो दुसरा माणूस आम्हाला हिरॉइन करणार होता आणि आमच्या या बापानं- म्हणजे शिक्षकानं आम्हाला सांगितलं होतं, की हिरॉइन झाल्यावर दोघींनी एकेक रात्र माझ्यासोबत काढायची आहे.’’ तिच्या डोळ्यांतून प्रचंड संतापानं अश्रू वाहत होते आणि हातून राग व्यक्त होत होता. आम्ही त्यांना थांबवण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. त्यांचा राग बाहेर येणं गरजेचं होतं आणि अशा व्यक्तींना धडाही मिळणं आवश्यक होतं. दोघी आलटून पालटून त्याला मारत होत्या. त्याचा चेहरा पूर्णपणे सुजला होता. तोवर संध्याकाळ झाली होती.

त्या दिवशी बसाखी होती. आम्हाला रंगभवनात कार्यक्रमाला जायला हवं होतं. पापाजी म्हणाले, ‘‘याला आपण एका खुर्चीला बांधून ठेवू या आणि उद्या पोलिसांच्या ताब्यात देऊ या.’’ आमच्या सुरक्षारक्षकांनी त्याला खुर्चीत करकचून बांधून ठेवला. त्या दोघींनाही सोबत घेऊन आम्ही बसाखीला गेलो. रात्री उशिरा घरी परतलो तर जिथं त्या माणसाला बांधून ठेवला होता तिथून हा माणूस गायब! आम्ही हादरलो. अवतीभवती सगळीकडे शोधलं. पण नाही दिसला. यानं उडीबिडी मारून जीव तर दिला नसेल ना, अशीही शंका मनात आली. नंतर पापाजी म्हणाले, ‘‘अरे, त्याच्या हाताला एवढं करकचून बांधलं होतं, की त्याचं रक्त साकळत होतं. त्यानं मला हाक मारून ही गोष्ट सांगितली. मग मी त्याचे हात थोडे सल केले. त्यामुळेच कदाचित त्यानं हात सोडवून घेतले असावेत आणि तो पळून गेला असावा.’’

आमच्या घरासमोर मुंबईचे एक डी. सी. पी. राहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सर्व हकिकत सांगितली आणि आता काय करावं, असं त्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘‘त्या मुलींनी तक्रार केली तर आपण कारवाई करू या. पण ही गोष्ट जर षट्कर्णी व्हायला नको असेल तर झालं गेलं विसरून जा. त्या मुलींना घरी पाठवून द्या.’’

काही दिवस त्या दोघी आमच्या घरीच राहिल्या. त्यांचे एक नातेवाईक त्यांना घ्यायला येतील, असा काकांचा फोन आला होता. ते नातेवाईक आमच्याकडे आले. ते मिलिटरीमन होते. त्यांच्या गळ्यात पडून त्या मुली खूप रडल्या. ‘आमचं चुकलं,’ असं म्हणाल्या. त्यांनीही त्यांची समजूत घातली. त्या दोघींना घेऊन ते परत जायला निघाले तेव्हा त्या कणखर माणसाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्यांनी पापाजींना, बीजीला व मला खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘रागावू नका, पण या मुली तुमच्या हॉटेलात इतके दिवस राहिल्या, तुम्ही त्यांचं घरच्यासारखं केलंत. त्याची किंमत नाही होणार. पण या ब्लँक चेकवर आपण हवी ती रक्कम घालावी अशी माझी विनंती आहे.’’

पापाजींनी त्या दोघींना जवळ घेतलं आणि म्हणाले, ‘‘या दोघी वाचल्या, आपल्या कुटुंबात परतल्या, यातच आम्हाला सारं काही मिळालं.’’

त्यानंतर त्या दोघींनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांची चांगल्या घरात लग्नं झाली. दोघीही आमच्या संपर्कात अनेक वष्रे होत्या. त्यांच्या पतींना, मुलाबाळांना घेऊन त्या आमच्याकडे येत असत. हक्काने माहेरपण भोगून जात असत. बीजी होती तोवर हा सिलसिला सुरू होता. आता अनेक वष्रे झाली त्यांची खबरबात नाही. परंतु जिथं कुठं त्या असतील तिथं सुखात व आत्मसन्मानानं जगत असतील.

मी चित्रपटाच्या दुनियेशी खूप जवळून निगडित होतो. अनेक स्टार्स जवळून पाहिले. त्यांचं स्टारपण पाहिलं. त्यांच्या मिजाशी पाहिल्या आणि त्यांच्यातील नम्रताही पाहिली. परंतु एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे ही मोहनगरी आहे. तिचे स्वत:चे नियम आहेत. हे नियम सर्वसामान्यांच्या नीतिमत्तेच्या नियमांत बसत नाहीत. इथं हिरॉइन बनायला दहा हजार मुली येत असतील तर त्यातील फक्त एक हिरॉइन बनते. बाकीच्या ९,९९९ मुलींचं काय होत असेल, ते देव जाणे! त्यांच्या नशिबात खाईच असते. मी चित्रपट वितरणाच्या व्यवसायातही होतो. ‘पाकिजा’सारख्या अप्रतिम कलाकृतीचं जागतिक वितरण आमच्याकडे होतं. ‘द बर्निग ट्रेन’सारख्या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी आम्ही वित्तपुरवठाही केला होता. परंतु याच नीतिमत्तेच्या मुद्दय़ावरून मी चित्रपट वितरणापासून दूर झालो. त्याविषयी नंतर सांगेनच.

आज जेव्हा या मुलींच्या प्रसंगाकडे मागे वळून पाहतो तेव्हा आश्चर्य वाटतं. कोण कुठल्या त्या मुली! त्या प्रीतममध्ये येतात काय, तो डँबिस माणूस नेमका मलाच दिसतो काय, मी त्याचा शोध घेतो काय, आणि त्या मुली या दुर्धर प्रसंगातून वाचतात काय! ईश्वरी लीला.. दुसरं काय!!

एवढं मात्र खरं, की परमेश्वरानं मानवतेची सेवा करायला हा मानवजन्म दिला आहे. ती सेवा करण्याची संधी मला परमेश्वरानं नेहमी दिली. आणि मी पुढे जाऊन ती संधी स्वीकारलीही!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर