कन्हैयाकुमार वाट्टेल ते बोलला तरी त्याचे वय बघता ते समजू शकते, पण ज्येष्ठांनीही तितकीच विवेकशून्यता दाखवणे हास्यास्पद आणि लाजिरवाणे आहे..
चुका करण्याची एकही संधी आपण कशी वाया जाऊ देत नाही, हे सिद्ध करण्यात मोदी सरकारलाही आनंद वाटत असल्याने त्यांनी कन्हैयाकुमाराचा सुमार मुद्दा सहज मोठा होऊ दिला.
अलीकडे सत्ताधाऱ्यांस अवघड मुद्दय़ांना बगल देत सोप्या प्रश्नांना हात घालण्याची चटक लागली आहे. पाकिस्तानचे काही करू शकत नसेल तर निदान याकूब मेमन यांस फासावर लटकवणे वा आíथक प्रगती करणे दुष्प्राप्य असेल तर राष्ट्रवादाचा उन्माद तयार करणे ही याची ताजी काही उदाहरणे. यातील ताजी भर म्हणजे कन्हैयाकुमार. या निमित्ताने आपले राजकारण आणि राजकारणी यांचे चिमुकलेकरणही किती झपाटय़ाने सुरू आहे हे समोर आले. हे राजकारणी आणि त्यांचे पक्ष गेली काही वष्रे सक्षम कार्यक्रमाअभावी दिवाळखोरीकडे वाटचाल करू लागले आहेत, हे जाणवत होतेच. परंतु त्यांचा प्रवास दिवाळखोरीच्या बरोबरीने बाल्यावस्थेकडेही तितक्याच झपाटय़ाने सुरू आहे, हे ठसठशीतपणे समोर यावयाचे होते. आता तीही अवस्था गेली असून बाल्यावस्थेकडून हे राजकीय पक्ष चिमुकलेकरणास लागले आहेत. कन्हैयाकुमार तेच दाखवून देतो. तो वाटेल ते बोलतो काय आणि त्याच्या नादी लागण्यासाठी आपापली िशगे मोडून राजकीय नेते वासरांच्या कळपात शिरतात काय! सारेच हास्यास्पद आणि लाजिरवाणे. या महाविद्यालयीन तरुणाच्या ठायी विवेकाचा अभाव असल्यास ते समजण्यासारखेच. तो त्याच्या वयाचा दोष. परंतु त्याच्या निमित्ताने ज्येष्ठांनीही तितकीच विवेकशून्यता दाखवावी यांस काय म्हणावे? वास्तवात अपेक्षा ही की चार पावसाळे जास्ती पाहिलेल्या, काळ्याचे पांढरे झालेल्या राजकीय ज्येष्ठांनी तरुणांस मार्गदर्शन करून राष्ट्रीय प्रवाहात आणणे. परंतु सांप्रत काळी उलटेच होताना दिसते. ज्येष्ठांनी तरुणांचे बोट धरण्याऐवजी हे तरुणच राजकारण्यांचे बखोट धरून त्यांना आपल्या मर्जीनुसार नाचवू लागले आहेत. हे असे होणे यात तरुणांचा गौरव असेल वा नसेलही. परंतु ज्येष्ठांचे अवमूल्यन आहे, हे मात्र निश्चित. पण हे असे झाले म्हणून त्यासाठी तरुणांना दोष देता येणार नाही. जे काही सुरू आहे त्यास ज्येष्ठ म्हणवून घेणाऱ्यांच्या आकलनशक्तीचे अपंगत्व आणि आंधळेपण कारणीभूत आहे. तेव्हा याचा समाचार घेणे आवश्यक ठरते.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तीन आठवडय़ांपूर्वी जे काही घडले त्यातून एकमेकांतील अविवेक प्रदर्शनाची अहमहमिका सुरू झाली. या विश्वविद्यालयात डाव्यांचे प्राबल्य आहे. मध्यंतरीचा काही काळ वगळता उजव्या भाजपप्रणीत अ. भा. विद्यार्थी परिषदेस तेथे पाय रोवता आलेला नाही. परंतु केंद्रात भाजपच्या नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून अभाविपस एक ऊर्जाकेंद्र मिळाले असून आपण आता म्हणेल ते करू शकतो, असे या विद्यार्थी संघटनेस वाटू लागले आहे. सत्तेची ऊब आली की सर्वाचेच असे होते. जास्त बौद्धिके कानावरून गेली म्हणून सत्तेचा मोह सुटतो असे नाही. तेव्हा भाजप सत्तेवर आल्यानंतर ठिकठिकाणी अभाविपचा जोर वाढला. त्यामुळे जेएनयू विद्यापीठातही डाव्यांच्या विद्यार्थी संघटना आणि अभाविप समोरासमोर ठाकली. त्यातून डाव्यांच्या संघटनेने काश्मिरी दहशतवादी अफझल गुरू याचा फाशी दिन ‘साजरा’ केल्याने राष्ट्रप्रेमावर एकमेव दावा सांगणाऱ्या अभाविप, भाजप आदींचे पित्त खवळले. वास्तविक याच अफझल गुरूस हुतात्मा ठरवणाऱ्या पीडीपी पक्षाशी काश्मिरात शय्यासोबत करताना भाजपस राष्ट्रप्रेम आडवे येत नाही आणि त्यामुळे अभाविपही खवळत नाही. परंतु जेएनयूत गुरूस्मृती जपल्या म्हणून अभाविपसह भाजपच्या पंडिता स्मृती इराणी यांच्यासह सगळ्यांचाच राष्ट्रवाद उफाळून आला. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही अशा वेळी पंडिता स्मृती इराणी यांच्या मदतीस धावून आपल्यातील राष्ट्रवादाचे देशास दर्शन दिले. मग तो सिद्ध करण्यासाठी या सर्वानी जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यास तुरुंगात डांबले. तेदेखील गंभीर अशा राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली. वास्तविक राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केलेले असतानाही या मंडळींना आपली राष्ट्रप्रेमदर्शनाची उबळ काही आवरली नाही आणि पुढचे रामायण घडले. दरम्यान, न्यायासाठी झगडण्याचा दावा करणाऱ्या काळ्या कोटधारींनी आपणही किती अन्याय्य वागू शकते हे दाखवून दिले. हे जे काही सुरू होते त्यावर संसदेत आणि बाहेरही अद्वातद्वा बोलून सर्वानी जमेल तितके आपल्या बौद्धिक पातळीचे दर्शन घडवले. अशा तऱ्हेने कन्हैयाकुमार हेच जणू राष्ट्रासमोरील सर्वात गहन आव्हान असे चित्र निर्माण होत सारा देश गोकुळ बनला. येथवरच सारे थांबले असते तर एक वेळ त्याकडे काणाडोळा करता आला असता. पण नाही.
अखेर अपेक्षेप्रमाणे कान्हा तुरुंगातून सुटला आणि सर्वाना जणू राजकारण करण्याचा आयताच मुद्दा मिळाला. डावे, समाजवादी आणि त्यांच्या कडेकडेने राजकारण करणाऱ्या काँग्रेसला या कन्हैयाशस्त्राने नरेंद्र मोदी सरकारला घायाळ करण्याची स्वप्ने पडू लागली. मोदी सरकार कधी चुका करेल याची वाट पाहण्याखेरीज अन्य कोणताही सणसणीत असा राजकीय कार्यक्रम या पक्षांकडे नाही. त्यामुळे हा कन्हैयावतार आपल्याचा उद्धारासाठी आल्याचा आनंद विरोधकांना झाला. अर्थात चुका करण्याची एकही संधी आपण कशी वाया जाऊ देत नाही, हे सिद्ध करण्यात मोदी सरकारलाही आनंद वाटत असल्याने त्यांनी उदार अंत:करणाने कन्हैयाकुमाराचा सुमार मुद्दा सहज मोठा होऊ दिला. या कन्हैयाच्या नावे बोटे मोडणे, त्यांस पािठबा देणाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहणे म्हणजेच देशप्रेम सिद्ध करणे असा सोपा समज सत्ताधारी आणि समर्थकांनी करून घेतला. वास्तविक देशाच्या गृहमंत्र्याने दखल घ्यावी असे यात काहीही नव्हते. पठाणकोटचा हल्ला, हाफीज सईदला पाकिस्तान देत असलेले स्वातंत्र्य आणि संरक्षण आणि त्याविरोधात आपली असाहाय्यता या आघाडय़ांवर करण्यासारखे बरेच काही गृहमंत्र्यांना आहे. पण ते करण्याइतके अधिकार त्यांना मोदी यांनी दिले नसल्याने त्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. त्याच वेळी हे सगळे ज्याच्यामुळे घडले त्या कन्हैयास बलगाडीखालून चालणाऱ्या कुत्र्याप्रमाणे वाटू लागले. वरची बलगाडी जणू आपणच ओढीत आहोत, असा (गर)समज ज्याप्रमाणे दोन चाकांमधून चालणाऱ्या कुत्र्याचा होतो तसे या कन्हैयाकुमारचे झाले. राजकारणी त्यांच्या सोयीसाठी आपणास वापरीत आहेत हे लक्षात न घेता आपणच राजकारणाच्या केंद्रस्थानी आहोत असे त्याच्या मनाने घेतले. त्यामुळे झाले असे की एरवी ज्याची कोणी दखलही घेतली नसती त्या कन्हैयाची सुटका आणि त्यानंतरचे त्याचे मौलिक चिंतन हा सर्वोच्च टीआरपीचा विषय झाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने ठोकलेले भाषण हे त्यास तरुणपणीच लागलेल्या टीआरपी नशेचे उत्तम उदाहरण. आपण जणू काही नवे राजकीय तत्त्वज्ञानच मांडत आहोत या थाटात हा कन्हैया काहीही बरळत गेला. या त्याच्या विचारपरिप्लुत भाषणात त्याने भांडवलशाहीवरही काही दुगाण्या झाडल्या. वास्तविक ही भांडवलशाही आहे म्हणून या आणि अशा कन्हैयाकुमारांचे बरे चालले आहे. ज्या भांडवलशाहीच्या विरोधात हा कन्हैया बरळला ती नष्ट केल्याचा दावा करणाऱ्या रशिया आदी देशांत काय सुरू आहे, हे या कुमारास माहीत असावयास हवे. जेथे खासगी भांडवलदार नसतात तेथे सरकार भांडवलदाराच्या भूमिकेत शिरते आणि अशी सरकारी भांडवलशाही अधिक असहिष्णू असते हे भांडवलशाही नष्ट करण्याचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या रशिया आणि चीनमध्ये पाहावयास मिळते. तिआनानमेन चौकात जे काही घडले तो फार जुना इतिहास नाही. तेव्हा भांडवलशाहीविरोधातली कालबाह्य़ पोपटपंची तरुण कन्हैयाने करण्याने त्याच्यातील आकलनशक्तीचा अभाव समोर येतो.
अशा तऱ्हेने सध्याचा राजकीय संघर्ष हा दोन कमअस्सल समजूतवाल्यांतील संघर्ष आहे. एका बाजूला आहेत कन्हैयाला डोक्यावर घेऊन नाचणारे आणि दुसरीकडे आहेत त्यास शत्रू मानून पायदळी तुडवू पाहणारे. या दोन टोकांच्या भूमिकांत भले होणार आहे ते फक्त कन्हैयाचे. एरवी दुर्लक्ष करण्याच्या योग्यतेच्या या तरुणाचा अकारण आकर्षक राजकीय नेता होणार असून प. बंगाल आदी राज्यांतील आगामी निवडणुकांत स्वातंत्र्य, समतेच्या बाता मारत तो हिरिरीने सामील झाल्यास आश्चर्य वाटू नये. प्रस्थापित राजकीय नेते आणि पक्ष यांना या कन्हैयाने राजकीयदृष्टय़ा विवस्त्र केले असून दे रे कान्हा, चोळी लुगडी.. असे म्हणावयाची वेळ त्यांच्यावर आली आहे. हा या राजकारणाचा पराभव आहे.