सुनंदा अर्थात तपस्विनी माताजी ही एका मराठा सरदाराची कन्या व झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची भाची.
१८५७ चा वणवा पेटल्याचे वृत्त समजल्यावर कीर्तने, प्रवचने करीत गावोगाव ती हिंडू लागली. तिला मिळणाऱ्या धनातून ती शस्त्रे विकत घेऊन वाटू लागली. साधूंचे छापामार पथक तिने बांधले. साधूंच्या टोळ्यांद्वारे ती इंग्रजांच्या छोटय़ा छोटय़ा छावण्यांवर हल्ला चढवे. तिथून ती नेपाळला गेली. नेपाळमध्ये तिने मंदिरे बांधली. मंदिरातील धर्मचर्चेतून ती क्रांतीचा संदेश देत राहिली. पुढे कलकत्त्याला पोहोचली. तिथे फक्त मुलींसाठी ‘महाकाली संस्कृत पाठशाले’ची स्थापना केली. प्रथम महाराष्ट्र व बंगाल व पुढे नेपाळ व बंगाल यांच्यामध्ये क्रांतिकारकांचे संबंध जोडण्याचे काम तिने केले. सुनंदाचा राणी तपस्विनी ते माताजीं पर्यंतचा हा प्रवास.
बंड १८५७ चे. हा शब्द कानी पडला तरी पहिली आठवण येते ती झाशीवाल्या राणी लक्ष्मीबाईची. वासुकाका जोशी यांच्या चरित्रातील नेपाळ प्रकरणातील माहितीवरून ‘माताजी’ या संस्कृत पाठशालेच्या संस्थापिकेबद्दल माहिती मिळाली. या कर्नाटकातील एका छोटय़ा संस्थानातील बालविधवा राणीने इंग्रजांविरुद्ध पद्धतशीर उठाव कसा केला याची कहाणी समजली. अधिक शोध घेतला तेव्हा ही ‘माताजी’ एका मराठा सरदाराची कन्या व झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची भाची, असे कळले.
शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांच्याकडे तंजावर प्रांत होता. हा प्रांत जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून व्यंकोजीराजांबरोबर अनेक छोटे-मोठे सरदार गेले.. ते तिथेच स्थायिक झाले. त्यातलेच एक सरदार पुढे बेलूरचे किल्लेदार व अधिपती झाले. या घराण्यातील नारायण राव या अधिपतीला सुनंदा नावाची एकुलती एक कन्या होती. त्या वेळच्या रीतीप्रमाणे सुनंदाचे लग्न आठव्या वर्षीच झाले व लग्न म्हणजे काय हे समजण्यापूर्वी वयाला दहा वर्षे पूर्ण होत नाहीत तोच तिला वैधव्य आले. सुनंदा सुंदर तर होतीच, पण तिची बुद्धीही कुशाग्र होती. इतक्या लहान वयात आपल्या एकुलत्या एक, सुंदर व सुशील मुलीवरील दैवाचा हा आघात नारायणरावांना सहन होणे शक्य नव्हते. जनरीतीप्रमाणे तिचे केशवपन झाले नसले तरी ब्राह्मण विधवांना त्या काळी जे व्रतस्थ जीवन जगावे लागले ते सुनंदेलाही पाळणे आवश्यक होते. पहाटे उठून पूजा, ध्यान, आणि मातृशक्तीची आराधना, दुपारी संस्कृत भाषेचा अभ्यास, पुराणे, उपनिषदे यांचा अभ्यास तर संध्याकाळी योगसाधना, घोडेस्वारी, शस्त्रास्त्रे वापरण्याचे शिक्षण असा तिचा दिनक्रम असे. तिच्या दिनक्रमातील सर्व विषय विधवेला निषिद्ध होते. सुनंदा राजकन्या व राज्याची वारस असल्यामुळे तिच्या या दिनक्रमास लोक आक्षेप घेत नव्हते, अगदी धर्ममरतडही. सुनंदा जसजशी तारुण्यात येऊ लागली, तसतशी तिच्या मनात इंग्रजांच्या सत्तेबद्दल चीड उत्पन्न होऊ लागली. सुनंदाच्या मनात ही जी इंग्रजी सत्तेबद्दलची चीड वाढत होती व त्या विरुद्ध काही करावयाचे होते म्हणून ती लष्करी शिक्षण घेते, हे नारायणरावांच्या लक्षातच आले नाही. आपली मुलगी स्वत:चा जीव रमवते व आनंदी राहते हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
नारायणरावांच्या मृत्यूनंतर सुनंदाचे अवघे जीवनच बदलले. त्यांच्या कारभाराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. त्या वेळी तिचे वय १६/१७ वर्षांचे असावे. इंग्रजांच्या जुलूम-जबरदस्तीच्या कथा तिच्या कानावर येत. आपल्या संस्थानातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये हीच तिची इच्छा होती. तिने बेलूरच्या किल्ल्याची डागडुजी सुरू केली. आपल्या छोटय़ा लष्करात भरती सुरू केली. सैनिकांना कवायती शिक्षण सुरू केले. इतकेच नव्हे, तर स्वत: जातीने हजर राहून शिक्षण कसे दिले व घेतले जातेय याची पाहणी ती करे. तिला एकच ध्यास होता; तंजावरातून व मराठा राज्यातून इंग्रजांची हकालपट्टी करणे. तिच्या या तयारीच्या बातम्या हळूहळू कर्नाटकच्या गव्हर्नपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. ‘एक विधवा हिंदू ब्राह्मण बाई, करून करून काय करणार? चार दिवस कैदेत ठेवली की येईल ताळ्यावर’ असा गोड गैरसमज इंग्रजांनी करून घेतला. तिला व तिच्या प्रजेला धाक बसावा म्हणून सुनंदाला कैद करून त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. कैदेत असताना शस्त्रास्त्रांचे शिक्षण व तिचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू राहिला. योगासने चालू ठेवून शरीराचा काटकपणा चालू राहील याची तिने काळजी घेतली.
सुनंदाबद्दलची माहिती रोजच्या रोज अधिकाऱ्यांना मिळत असे. सुनंदा निरुपद्रवी आहे व ईश्वरभक्तीतच पूर्ण दिवस घालवते असे सातत्याने कळत राहिल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना आपला अंदाज खरा ठरला म्हणून खूप समाधान वाटले. आता या नख नसलेल्या वाघिणीला इतमामाने पोसण्यापेक्षा दंड भरून सोडून द्यावे, असे अधिकाऱ्यांना वाटले. इकडे सुनंदाने सुटकेनंतर आपण काय करायचे याची रूपरेषा आखून मनाशी पक्की केली होती. सुटल्यावर परत घरी आपल्या संस्थानात न जाता सुनंदाने नैमिषारण्याचा रस्ता धरला. आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करावयाचा आहे व आपण नैमिषारण्यातील आचार्य गौरीशंकर यांचे शिष्यत्व घेण्यासाठी जात आहोत असे तिने जाहीर केले. इंग्रज अधिकाऱ्यांना वाटले, ‘आणले की नाही राणीचे डोके ठिकाणावर?’ सुनंदाचा विचार मात्र निराळाच होता. आपण तपस्वी जीवन जगत आहोत, हे जाणून इंग्रज आपल्या वाटेला जाणार नाहीत याची तिला खात्री होती. या जीवनामुळे श्रद्धाळू आम जनतेच्या ती जवळ येणार होती. प्रवचने, भक्तांच्या भेटी, यातून तिला हवा तो संदेश ती जनतेपर्यंत पोहोचवू शकणार होती. सुनंदा प्रथम शक्तीची उपासना करीत असे. नैमिषारण्यात ती शक्तीबरोबरच शिवाचीही उपासना करू लागली. शिवलिंगावर बेल वाहता-वाहता ती गंभीर स्वरात तांडव स्तोत्राचाही पाठ म्हणू लागली. अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्यांचे उपास्य दैवत म्हणजे शिव व शक्ती; सुनंदा या विचारसरणीला घेऊन पुढील योजनांना आकार देऊ लागली.
हळूहळू तिची महती अरण्याबाहेरही पसरली. ती मूळची राणी म्हणून लोक तिला ‘राणी तपस्विनी’ म्हणू लागले. आपल्या मागे राणी ही उपाधी लागली तर इंग्रजांचे लक्ष परत आपल्याकडे वळण्याची शक्यता सुनंदाने लक्षात घेतली. भक्तांना आपण राणी नसून, तुम्हा सर्वाची ‘माता’ आहे असे सांगितले. लोक तिला माता तपस्विनी म्हणू लागले. आपल्या भक्तांना ती अध्यात्माबरोबरच देशभक्तीचाही उपदेश देऊ लागली. साधूंचा तिने एक मोठा गट बांधला. फकीर व साधू यांना कुठेच जाण्यास अटकाव नसे. हे साधू लोकांना सांगत, ‘‘या इंग्रजांनी आपला देश गिळंकृत केला. धर्मभ्रष्ट करत आहेत ते आपल्याला. तेव्हा, ‘लोक हो जागे व्हा. तुम्हाला गंगाआई व माता तपस्विनीची शपथ आहे. इंग्रजांना हाकलून द्यायला तयार व्हा.’ या साधूंना कमळाच्या माध्यमातून संदेश पोहोचविण्याची मूळ कल्पना व प्रेरणा माता तपस्विनीची होती.
१८५७ चा वणवा पेटल्याचे वृत्त समजल्यावर माता तपस्विनीने अरण्य सोडले. कीर्तने, प्रवचने करीत गावोगाव ती हिंडू लागली. तिला मिळणाऱ्या धनातून ती शस्त्रे विकत घेऊन वाटू लागली. माता तपस्विनीला मानणाऱ्या साधू-बैराग्यांची तिचा क्रांतीचा संदेश पसरविण्यात मोठीच मदत झाली. कमळ व भाकरी याचा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्याची योजना माता तपस्विनींचीच होती, असे डॉ. आशाराणी व्होरा यांचे संशोधन आहे. साधूंचे छापामार पथक बांधले. घोडय़ावरून सगळ्या व्यवस्थेचे ती निरीक्षण करी. साधूंच्या टोळ्यांद्वारे ती इंग्रजांच्या छोटय़ा छोटय़ा छावण्यावर हल्ला चढवे. त्यांच्या कफनीत शस्त्रे दडवलेली असत. माता तपस्विनीने छापा पथके बनविली, पण त्यांना संघटित करायला तिला वेळ मिळाला नाही. त्यामुळे इंग्रजांना त्यांना गाठणं सहज शक्य झालं. त्यांनी त्यांना पकडून हालहाल करून मारले. या साधूंची सूत्रधार सुनंदा आहे हे चाणाक्ष इंग्रजांच्या लक्षात आले व त्यांनी तिचा शोध सुरू केला.
वेश बदलून गावोगावी हिंडणाऱ्या माता तपस्विनीला लोक जिवाच्या आकांताने सुरक्षित जागेत पोहोचवीत. बंड थंड होत गेले. मात्र माता तपस्विनी भूमिगत झाल्यामुळे व लोकांचा तिला भक्कम पाठिंबा असल्यामुळे इंग्रजांना सापडली नाही. बेगम हसरू महल या १८५७ च्या उत्तरेतील नायिकेप्रमाणे तीही नेपाळला गेली. पण बेगमसारखी ती पुढे स्वस्थ राहिली नाही. तिच्याबरोबर स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या क्रांतिकारकांशी तिचे संपर्क चालू राहिले. नेपाळमध्ये तिने मंदिरे बांधली. मंदिरातील धर्मचर्चेतून ती क्रांतीचा संदेश देत राहिली. तिला संरक्षण देणाऱ्या नेपाळ नरेशांचा खून झाला. त्यानंतर तिने मायदेशी येण्याचा निर्णय घेतला.
तपस्विनी कलकत्त्याला पोहोचली. तिथे फक्त मुलींसाठी तिने ‘महाकाली संस्कृत पाठशालेची’ स्थापना केली. लोकमान्य टिळक व पुणे चित्रशाळेचे संचालक वासुकाका जोशी या दोघांनी पाठशाळेला भेट दिली. त्यांची माताजींशी ओळख झाल्यावर त्या टिळकांशी मराठीत बोलू लागल्या. टिळकांनी त्याबद्दल विचारले असता माताजीने बेलूर ते नेपाळ व सुनंदा ते माता तपस्विनी व आता माताजी हा आपला प्रवास कसा झाला तेही सांगितले. टिळकांना नेपाळला पशुपतिनाथाच्या दर्शनास जायचे होते. त्यांना नेपाळला जाण्याचा परवाना मिळाला नाही. माताजींची नेपाळच्या राजकीय वर्तुळात ओळख व वजन होते. ती मदतही मिळणार होती पण लोकमान्यांच्या नेपाळ-भेटीला सरकारने खो घातला.
पुण्याला परतल्यावर टिळकांनी नाटककार खाडिलकर यांना विटांचा कारखाना काढण्याचे निमित्त करून नेपाळला पाठविले. तपस्विनीच्या ओळखीवरून खाडिलकरांनी नेपाळचे सेनापती चंद्रसमशेरसिंग यांच्या मदतीने व जर्मन क्रुप्स कंपनीच्या साहाय्याने कारखाना सुरू केला. प्रत्यक्षात त्यात विटांऐवजी बंदुका व हत्यारे बनत. नेपाळ-बंगाल सीमेवरून ती बंगालमध्ये पोहोचली जात. माताजींमुळे खाडिलकरांचे नेपाळच्या उच्चपदस्थांशी चांगले संबंध जोडले गेले. पण एका फितूर सहकाऱ्याने ही बातमी इंग्रजांना दिली. कारखाना जप्त झाला. कारखाना उभारण्याचे श्रेय माताजींचे. ते त्यांचेच साकारत चाललेले स्वप्न होते. खाडिलकरांना सरकारने खूप त्रास दिला. पण कारखान्यामागच्या सूत्रधार माताजीच आहेत हे त्यांच्या तोंडून बाहेर पडले नाही. तिचा इंग्रजांना संशयही आला नाही. मनाने खचलेल्या अवस्थेत त्यांनी पाठशाळेचे काम चालू ठेवले. अशा रीतीने प्रथम महाराष्ट्र व बंगाल व पुढे नेपाळ व बंगाल यांच्यामध्ये क्रांतिकारकांचे संबंध जोडण्याचे महत्त्वाचे काम माताजींचे होते.
आपल्याच लोकांच्या फंदफितुरीमुळे प्रत्येक वेळी शेवटच्या घटकेला फसत गेले, याचे तिला दु:ख होई. विश्वासघात झाल्यामुळेच क्रांतिकारकांच्या योजना निष्फळ होत गेल्या. नाहीतर, हजारो साधू-बैरागी देशभर शस्त्रे घेऊन फिरत असताना यश न मिळणे अशक्यच होते.
‘मुलींची संस्कृत पाठशाला’ कौतुकाने पाहायला गेलेले लोकमान्य व वासुकाका जोशी यांची अचानकपणे भेट ‘माताजीं’शी झाली व त्यांच्याच तोंडून १८५७ च्या अनेक गोष्टी त्यांना कळल्या. त्यांचा वंगभंगाच्या चळवळीतही सक्रिय सहभाग होता. या चळवळीच्या वेळी त्या वृद्धापकाळामुळे खूप थकली होती. तरीही तिचा उत्साह तरुणालाही लाजविणारा होता. परदेशी वस्तूंवर बहिष्कार आंदोलनाची प्रेरणा तिने साधूंच्या माध्यमातूनच बंगाली जनतेला दिली.
माताजी ऊर्फ माता तपस्विनी यांनी १८५७ च्या उठावातील दक्षिणेकडचे नेतृत्व लक्षात घेता त्यांचा जन्म १८४०च्या सुमारास असावा असे वाटते. अध्यात्माचे अध्ययन व अध्यापन करता करता आयुष्यभर क्रांतीचा संदेश  पोहोचविला. उठावानंतरही क्रांतीची पणती मिणमिणती ठेवण्याचे काम सुनंदा राणी ऊर्फ माता तपस्विनीने केले. लोकमान्यांची व तिची भेट झाली नसती तर तिच्या या अचाट कामाबद्दलची माहिती मिळालीच नसती. अखेर १९०७ मध्ये कलकत्त्यामध्ये वृद्धापकाळ व थकलेले मन यामुळे ही क्रांतिज्योत मालवली.
gawankar.rohini@gmail.com