जयललितांचे निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन

सर्व रेशनकार्डधारकांना विनामूल्य भ्रमणध्वनी आणि १०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देतानाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी, सत्तेवर आल्यास सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याच्याच दिवशी जयललिता यांनी येथे जाहीर सभेतच जाहीरनामा प्रसिद्ध केला.

जाहीरनाम्यात विविध क्षेत्रांचा अंतर्भाव असलेल्या अनेक लोकप्रिय उपाययोजनांचा समावेश आहे. अभाअद्रमुक पुन्हा सत्तेवर आल्यास सर्व रेशनकार्डधारकांना विनामूल्य भ्रमणध्वी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्या म्हणाल्या. व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून घरातील किमान एका सदस्याला विविध योजनांद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. सध्याच्या मोजणी पद्धतीवर आधारित प्रत्येक घरात १०० युनिट वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, त्याचा लाभ ७८ लाख ग्राहकांना होईल, त्यांना वीजबिल भरण्याची गरजच राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना सुरू ठेवण्यात येईल आणि त्यासमवेत मोफत इंटरनेट जोडणीही देण्यात येईल, असे जयललिता यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले. मातृत्व योजनेसाठी देण्यात येणारे आर्थिक साहाय्य १२ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.