दिल्लीत एका जर्मन महिलेला पाहुन ३२ वर्षीय तरूणानं हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाला अटक केली आहे. पीडित महिला जर्मनीची राहणारी असून ती सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून पीएचडी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुरूवारी दुपारी २.४५ च्या सुमारास जर्मनीची ही महिला आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडली होती, मात्र रस्त्यात तिच्याकडे एक पुरूष विचित्र नजरेनं बघत असल्याचं तिला लक्षात आलं, त्यामुळे त्याला हटकण्यासाठी ती पुढे झाली आणि त्याचवेळी या तरूणानं स्वतःच्या ट्राऊझरमध्ये हात घालून हस्तमैथुन करायला सुरूवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जर्मन महिला गोंधळून गेली आणि तिनं आरडाओरडा सुरू केला. तसंच या महिलेनं या तरूणाला पकडण्याचाही प्रयत्न केला मात्र तो त्याच्या कारमध्ये बसून पसार झाला.

यानंतर या महिलेनं त्या तरूणाच्या कारचा फोटो काढला आणि पोलिसात धाव घेतली. या फोटोत दिसणाऱ्या कारच्या नंबरप्लेटवरून दिल्ली पोलिसांनी या तरूणाला शोधलं आणि अटक केली. या विकृत तरूणाला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकारानंतर दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतही अशाच प्रकारच्या दोन ते तीन घटना उघडकीस आल्या होत्या. लोकल ट्रेन आणि तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूण मुलींसमोर दोन तरूण हस्तमैथुन करत असल्याचं निदर्शनास आलं होतं. पश्चिम रेल्वेमार्गावर झालेल्या या प्रकारात तर अश्लील चाळे करणाऱ्या तरूणानं मुलीला बलात्काराचीही धमकी दिली होती. तर तपोवन एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता.

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारापासून दिल्लीत घडणाऱ्या अशा घटनांना वाचा फुटायला सुरूवात झाली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या शहरात असे अश्लील चाळ्यांचे प्रकार याआधी घडल्याचं प्रमाण कमी होतं मात्र आता या घटना दिल्लीप्रमाणेच मुंबईतही वाढू लागल्या आहेत.

दिल्लीमध्ये झालेली घटना महिला अजूनही किती असुरक्षित आहेत हे वास्तव अधोरेखित करणारी आहे. तर मुंबईत महिलांचा लोकल प्रवासही अशा आणि इतर संकटांमध्ये सापडला आहे. अश्लील चाळे करणाऱ्या, बलात्काऱ्यांना, विनयभंग करणाऱ्यांना जोवर कठोर शिक्षा केली जात नाही तोवर अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार नाही. निदान आता तरी अशा घटनांमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी महिला वर्गाकडून होते आहे.